“गीता जयंती “
उर्ध्वमुलंम अध:शाखंम मश्वथम प्राहूरव्ययंम |
छन्दान्सी यस्य पर्णानी यत्स्य: वेद स वेदवित ||
(श्रीमद् भागवत गीता : अध्याय १५)
श्रीमद् भगवद् गीतेतील पंधराव्या अध्यायात ला हा पहिला श्लोक !
गीता जयंतीच्या निमित्ताने आमच्या शाळेत एक कार्यक्रम होत असे . मी साधारण सहावी किंवा सातवीत असेन. आमच्या बाईंनी आम्हा दोघा तीघान कडून पंधराव्या अध्यायातील काही श्लोक पाठ करून घेतले.
गीता जयंतीच्या दिवशी आदरणीय कवठळकर वकील प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासमोर आम्ही ते म्हणून दाखवले. वकील साहेबांनी नेमका मी म्हंटलेला श्लोक घेऊन, तो समजून सांगायला सुरुवात केली, त्यांचे समजून सांगणे फारच मजेशीर होतं. समजाऊन सांगताना त्यांनी केलेले हातवारे, चेहऱ्यांचे हावभाव पाहून आम्हाला खूप हसू येत होतं.
“उर्ध्वमुलंम” म्हणताना दोन्ही हात वर आकाशाकडे नेऊन, “अध:शाखंम” म्हणतांना ते हात झटकन खाली आणायचे . त्यांची ती लकब ,त्यांच्या छोट्या चळणी आकारमाना मुळे आम्हा मुलांना खूपच मजेशीर वाटायची आणि मग खूप हसू यायचं.
त्यांची नक्कल करून आम्ही मित्र नंतर आपसात खूप हसायचो . पण एक मात्र खरं, ते श्लोकाचा अर्थ पूर्ण तळमळी ने सांगत असत. ते आम्हाला मात्र अजिबात कळत नसे.
हा पन्नास वर्षांपूर्वीचा तो गीता जयंतीचा दिवस जशास तसा आठवला म्हणून लिहिलं.आज श्रीमद भगवत गीता हे पुस्तक हातात आलं. पंधरावा अध्यायात ला पहिला श्लोक समोर आला . त्यावर स्वामींचे विवेचन वाचलं.
श्लोकाचा अर्थ . (शब्दार्थ) ...........
असा एक वटवृक्ष आहे कि ज्याची मुळे वर आणि त्याच्या फांद्या , पारंभ्या जमिनी खाली आहे आणि वैदिक मंत्र ही त्याची पाने आहेत.
जो या वृक्षाला जाणतो तो वेदवेत्ता होय.
भावार्थ ............
या “प्राकृत जग” रुपी वृक्षाची “मुळे” वर आहेत आणि “शाखा म्हणजेच पारंब्या” खाली म्हणजे जमिनीत आहेत, असा हा वटवृक्ष , ते कसे?.......
ते बघू या !
तर, एखादा मनुष्य नदीच्या तीरावर उभा राहीला, तर पलीकडचे झाड त्याला नदीच्या पात्रात कसे दिसेल? ते “प्रतिबिंबित” झालेले झाड उलटे दिसेल, ज्याच्या शाखा खाली जमिनीत , आणि मुळे, वर आकाशा कडे .
हे प्राकृत जग “अध्यात्मिक जगाचे” प्रतिबिंब आहे. ते प्राकृत जगाची, म्हणजेच सत्याची फक्त छाया आहे.
छाया नेहमी भ्रामक असते. छायेत सत्यता वा वास्तविकता नाही. तिला पकडता येत नाही. पण या भ्रामक प्रतीबिंबा मुळे, “मूळ सत्य” अस्तित्वात आहे, एवढं निदान कळतं.
जसे ,वाळवंटात पाणी नाही,पण मृगजळा वरून असे समजतेच ना, की पाणी म्हणून एक वस्तू आहे. म्हणून या प्राकृत जगात पाणी नाही म्हणजे “सौख्य” नाही. आहे तो पाण्याचा म्हणजे “सौख्याचा भास”! परंतु अध्यात्मिक जगात “यथार्थ सौख्य -सुख” रुपी जल अवश्य आहे.
असे हे......
लेखन ----आनंद गोडबोले.
***************************
लेखन --- आनंद गोडबोले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा