रविवार, ३० सप्टेंबर, २०१२

डेल्टा-१५ (९-११ च्या दिवशी घडलेली सत्यकथा)





आज दिनांक सप्टेंबर ११, २०१२. अकरा वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेची हकीकत एका फ़्लाईट-अटेंडंटकदूनच ऐका:
 
 
 
 



आज दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून  निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले. आम्हा फ़्लाईट अटेंडंटना प्रवासी मंडळींनी असेच करायला हवे असते. कारण बहुतेक प्रवासी बिचारे आपापल्या धंद्यासाठी प्रवास करीत असतात आणि कांही आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असतात. पण ते कुणीही असले तरी त्यांना हवी तशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. शिवाय ते असे सुस्तावले की आम्हा विमानांतल्या नोकर वर्गाला ईतर कामे आटपायची असतात त्याला संधी मिळते. ज्यांना आतापर्यंत ’ब्रेक" मिळाला नसेल तो त्यांना घ्यायचा असतो.
(होय, आम्ही प्रवासांत असलो तरी ख-या अर्थाने ’कामावर’ असतो नाही का, त्यामुळे नियमांप्रमणे प्रत्येक दोन तासांच्या ऊड्डाणानंतर आम्ही १५ मिनिटांची विश्रांती घेणे हे आवश्यक असते)
 
 
 

माझीही आता विश्रांतीची वेळ झाली होती. मी माझ्या सीटवर बसणार तेव्हढ्यांत मला काकपिटचा पडदा हललेला दिसला आणि मला ताबडतोब आंत जावून क्याप्टनला भेट असा निरोप मिळाला. असा निरोप मला नेहमीच मिळतो पण आज त्या निरोप देणा-या माझ्या सहाय्यकाच्या चेह-यावर ईतका
 
 
 
 

 

 
 

 


सीरीयस भाव होता की माझ्या मनांत क्षणार्धात शंका-कुशंकांची पाल चुक- चुकून गेली. अर्थात मी तांतडीने आंत गेलो. माझ्या हातांत एक प्रिंटेड मेसेज देण्यांत आला, क्याप्टनच्या चेह-यावर "All Business अशाच भावना होत्या. डेल्टाच्या अटलांटामधल्या मुख्य कार्यालयांतून आलेला तो मेसेज मी वाचला.

"All airways over the Continental United States are closed to commercial air traffic. Land ASAP at the nearest airport. Advise your destination"

 

त्या मेसेजविषयी एक चकार शब्दही कुणी काढला नाही. आलेली सुचना निमुटपणे, शिस्तशिर आणि कोणताही प्रतिप्रश्न न विचारता पाळणे एव्हढेच आमचे कर्तव्य होते. किंबहुना आम्हाला तसेच शिक्षण मिळाले होते. एव्हढे मात्र खरे की कांहीतरी भयंकर प्रकार घडत असला पाहिजे त्याशिवाय का अमेरिकेने सर्व देश विमान वाहातुकीसाठी असा अचानक आणि कोणतीही पूर्व सुचना न देता बंद केला? ते कांहीही असले तरी आता ह्या क्षणी आम्हाला जवळांत जवळ कोणता विमानतळ आहे, तो शोधून तेथे ऊतरायची परवानगी मागण्याचे सोपस्कार करणे आवश्यक होते. त्यानंतर केलेल्या आम्हा सा-यांच्या प्रयत्नानंतर कळले की अगदी जवळचा विमानतळ Gander-New Found land येथे आमचेपासून केवळ ४०० मैलच दूर आहे.
 
 
 

 

 

आम्ही ताबडतोब Canadian Traffic Controller शी संपर्क साधला. त्यांना आमचा मार्ग बदलला आहे ह्याची माहिती देवून Gandar  ला ऊतरण्याची परवानगी मागितली. कोणतेही प्रश्न न विचारता त्यांनी ती परवानगी ताबडतोब दिली. आम्हाला मोठे आश्चर्यच वाटले की त्यांनी एकही प्रश्न न विचारता अशी एकदम परवानगी दिलीच कशी? मात्र त्याचे ऊत्तर आम्हाला पूढील कांही क्षणांतच मिळाले. कारण आमच्या हेड आफिसहून दुसरा मेसेज आला की न्युयार्क भागांत कांही टेरोरिस्ट घटना घडत आहेत. आता आम्हाला पूर्ण ऊलगडा झाला आणि कल्पनाही आली की आमच्यावर काय ऒढवले आहे ते!



मी काकपिटच्या बाहेर आलो. सर्व प्रवासी मंडळी सुस्तावली होती. आणि शांतपणे नित्यकामांत वावरत होती. ह्या सर्व मंडळींना हे सारे कसे सांगावे असा विचार करीत होतो. खरे सांगितले असते तर जो गोंधळ ऊडाला असता त्याची कल्पनाच करवली जात नव्हती. बराच विचार करून त्यांच्याशी "खोटे" बोलायचे ठरविले. "विमानाच्या एका महत्वाच्या Instrument मध्ये बिघाड झाल्याने जवळच्या Gander ह्या विमानतळावर आपल्याला ऊतरल्याशिवाय तरणोपाय नाही.  विमानतळावर ऊतरतांच आम्ही अधिक माहिती कळवू" हे सारे ऐकल्यावर नाराजीचे अनेक उदगार ऐकायला आले. त्यांची परत परत क्षमा मागून आम्ही ते वातावरण निमवले. अशा प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. मात्र बहुतेक प्रवासी खूपच समजुतदार असल्याने सुदैवाने तेव्हढ्यांतच निभावले.

 

जवळ जवळ तासाभराने म्हणजे साधारणपणे दुपारी साडेबारा वाजता (EST)  आम्ही Gander ला ऊतरलो. बघतो तो काय, त्या छोट्याश्या विमानतळावर आमच्या आधी २० विमाने आधीच ऊतरली होती. आमचे विमान थांबताच प्रवाश्यांना खरे कारण सांगणे आवश्यक होतेच. आमच्या क्याप्टनने पीए सीस्टीमवर सुचना केली: "सभ्य स्त्री-गृहस्थहो, आपण ईतरही अनेक विमाने ह्या लहानश्या विमानतळावर ऊतरलेली पहात आहोत, त्या सा-यांनाच आपल्या विमानासारखे Instrument Problem आहेत की काय असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल, परंतू सत्य-स्थिती अशी आहे की आपण ऊतरलो त्याला दुसरेच कारण आहे." ह्यानंतर क्यापटनने आतापर्यंत झालेल्या सर्व घटनांची यादी वाचली. ती ऐकून प्रवाश्यांत संमिश्र विचार ऊठत होते. मात्र हे सारे आपल्या संरक्षणासाठीच चालले आहे ह्याची मनोमन जाणीव त्यांना येत होती.






 



 

अशा ह्या वातावरणांत आपण आता धांवपट्टीवरच कांही काळ थंबणर आहोत ही सुचना पण आम्ही केली. प्रवाश्यांची मनस्थिती हळू हळू तयार होत असावी. हे सारे अतिशय गैरसोयीचे होते तरीही ते आपल्या भल्यासाठी आहे ह्याची त्यांना जाणीव होत असावी त्यामुळे प्रवासी मंडळींकडून फारशी ऊग्र प्रतिक्रिया ऊमटली नाही. ते बिचारे निमूटपणे सारे सहन करीत होते. काहींनी आपापले सेल फोन लावून अमेरिकेत नेमके काय घडते आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र Out of Area  मुळे त्यांना सिग्नल मिळाला नाही. ज्यांना तो मिळाला ते फार तर कनेडीयन आपरेटरशी बोलू शकले. त्यांनी "सर्व सिग्नल मिळत नाहीत, परत प्रयत्न करीत राहा"  असा बहुधा ’पूर्व-नियोजित’ सल्ला दिला. क्यापटनला विमानाच्या रेडिओ वरून जेव्हढी माहिती मिळायची तेव्हढी आम्ही वेळोवेळी त्यांना स्पीकरवरून सांगत असू. पूढील तासा दोन तासांत विमानतळावर अजून ३२ विमाने ऊतरली आणि विमानांची संख्या ५२ वर पोहोचली तेव्हां मात्र सर्वांची मन:स्थिती फारच हेलावली. त्यातली २७ विमाने अमेरिकेची होती. अशा वेळी त्यांना धीर देण्यापलीकडे आम्ही कांही अधिक करू शकलो नाही. विमानतळावरील पोलिसांच्या गाड्या आमच्या विमानाला चकरा मारून जात होत्या मात्र विमानाखाली ऊतरायला परवानगी नव्हती. ’न्युयार्कला माणसे मरत आहेत निदान आपण येथे परक्या देशांत जमीनीवर आहोत, जीवंत आहोत, थोडा त्रास होत असला तरी हरकत नाही पण जीव तरी वाचला आह” असे सर्वांचे विचार असावेत. विमानाच्या कारीडरमधून फिरतांना प्रवासी असे कांहीसे बोलत असलेलेही मी ओझरते ऐकले होते.

 

संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. दुपारी साडेबारा वाजता ऊतरलेले आमचे विमान अजून धांवपट्टीवरच होते.




 



आता मात्र प्रवाश्यांच्या सहनशीलतेचा अंत होत होता. तशांत बातमी आली की ऊद्या सकाळी ११ वाजता आमच्या विमानाचा नंबर लागेल व आम्हाला खाली ऊतरायला मिळेल.

 

एकाच जागी गेले सहा तास बसून सर्वांचे अंग अगदी आंबून गेले होते. तशांत आता अजून१७ तास कसे बसणार? थोडी कुरकुर होतच होती. मात्र त्यातल्या कांही समंजस प्रवाश्यांनी ईतरांना धीर दिला आणि तशाही परिस्थितीत विमांनात रात्र कशी काढायची त्याची आम्ही तयारी (मानसिक देखील) केली. मधल्या वेळेत विमानतळावरील हापिसर येवून गेले. आम्हाला ताजे पाणी, औषधे तसेच तात्पुरत्या संडासाची व्यवस्था करून गेले. आमच्या विमानांत एक ३३ आठवडे ऊलटून गेलेली गरोदर स्त्री होती. तिची रात्री झोपायची व्यवस्था कांही प्रवाशांनी स्वत:ची गैरसोय होत असतांनाही केली. मानवतेचे ते मुर्तीमंत ऊदाहरण पाहून कित्येकांच्या डोळ्यांत अश्रु आले. अतिशय गैरसोयीने का होईना पण रात्र पार पडली.
 
 
 
 

 

विमानतळाने दिलेल्या वेळेप्रमाणे सकाळी बरोबर साडे दहा वाजतां तेथल्या 12th School of Convoy च्या बसेस आम्हाला घ्यायला आल्या. शेवटी विमान ऊतरल्यापासून जवळ जवळ २३ तासांनी आम्ही आमचे पाय जमीनीला लावले. त्यांनी आम्हाला विमानतळावर नेले. तेथे Immigration Custom हे सोपस्कार होवून आम्हा सर्वांना Red Cross मध्येही register करावे लागले. त्या वेळी आम्ही सर्व प्रवाश्यांना सांगितले की "ह्या गांवात आपली राहाण्याची तात्पुरती सोय केली जाणार आहे. पूढील सुचना मिळेपर्यंत आपण येथेच राहायचे आहे". बिचारे प्रवासी, निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय ते तरी काय करू शकणार होते?

 

 



 

आमचे विमान ज्या गांवांत ऊतरले होते (Gander) ते अतिशय लहानसे असे गांव होते. ह्या गांवाची लोकसंख्या फक्त १०,४०० होती. आणि आज ५२ विमानांतून १०,५०० प्रवासी आले होते. एका रात्रीत गांवाची लोकसंख्या दुप्पट होण्याचा त्या गांवाच्या आयुष्यांत हा "न भुतो, न भविष्यती" असा क्षण आला होता. परंतू जसे जसे आम्ही त्या लहानशा विमानतळावर आवश्यक असलेले सोपस्कार (Custom, Immigration, Red Cross Registration etc.) करू लागलो तसे एक प्रकर्षाने लक्षांत आले की सारे कांही एखाद्या पटाईतासारखे चालले होते. अतिशय शिस्तपूर्वक रीतिने प्रवासी आणि विमानाचे कर्मचारी ह्यांची यादी बनविली जात होती. आम्ही विमानाचे कर्मचारी म्हणून आम्हाला एका विमानतळाच्या नजिकच्या छोट्या हाटेलमध्ये ठेवले. तिथे गेल्यावर पहिली गोष्ट केली आणि ती म्हणजे आम्ही ताबडतोब टीव्ही लावला आणि न्युयार्कच्या त्या दुर्घटनेचे पहिले भयानक दर्शन घडले. आम्ही जरी ते दृश्य २४ तासांनी पहात होतो तरी दूरदर्शनाच्या माध्यमांतून हल्ला केव्हां आणि कसा झाला, मारेकरी कोण होते, वगैरे सर्व हकीकत परत परत दाखवित होते. शरीरावर एखादी खोलवर झालेली जखम पुन्हा पुन्हा ऊघडून जशा यातना होत होत्या तशा ते दृश्य पाहून होत होत्या. ते सारे पाहून रक्ताचा आणि रागाचा पारा वर चढत होता पण झाल्या गोष्टीला आता कांही ईलाज नव्हता.






 

त्या लहानशा गांवाने मात्र आमचा पाहूणचार ऊत्तम रीतिने केला. कोण कुठले आम्ही, परंतू त्यांनी जणू काही Thanksgiving च्याच सणाला आपले नातेवाईक आले आहेत की काय अशा पद्धतीने आमचे आगत स्वागत केले जात होते. आम्हाला मोठ्या अभिमानाने त्यांचा गांव दाखविला जात होता. जवळची ठिकाणे देखील दाखविली जात होती.

 

 तब्बल दोन दिवसांनी आम्हाला परत येण्याची परवानगी मिळाली. आम्ही सारे विमानतळावर भेटलो. साहाजिकच प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. तो ऐकल्यानंतर मात्र आम्ही सारेच आश्चर्य-चकित झालो. ह्या इवल्याश्या गांवाने आम्हां अनोळखी लोकांची जी बडदास्त ठेवली त्याला तुलनाच नव्हती.

 

आपल्या गांवामध्ये आमच्यासारखे असे आगंतुक पाहुणे येणार हे कळतांच जवळपासच्या म्हणजे ७५ किलोमीटरच्या परीसरांतील गांवे एकत्र आली. प्रत्येक गांवातले हायस्कुल बंद केले गेले. मीटींग हाल्स, लाजींग-बोर्डींगच्या जागा, आणि ईतर मोठ्या जागा प्रवाशांच्या राहण्यासाठी ऊपलब्ध करून दिल्या गेल्या. गांवातील लोकांनी असतील नसतील तेव्हढ्या गाद्या, ऊश्या, स्लीपींग ब्यागा आणविल्या आणि प्रवाशांना रात्रीच्या शांत झोपेची सोय करून दिली. हायस्कुलमधल्या प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम केले. आमच्या विमानांतील २४८ प्रवाशांची तर ४५ मैल दूर असलेल्या Lewisport नांवाच्या खेड्यांत व्यवस्था केली, एव्हढ्या लोकांना तेथे नेण्यासाठी स्वत:च्या खाजगी गाड्या वापरल्या. इतकेच नव्हे तर स्त्रि-प्रवाशांपैकी जर कांही स्त्रियांची इच्छा इतर स्त्रि-प्रवाशांबरोबरच राहावी अशी असली तर ती देखील व्यवस्था हंसतमुखाने केली. सर्व कुटूंब मिळून प्रवास करणा-या प्रवाशांना एकत्र ठेवले त्यांची ताटातूट केली नाही. खूप वयस्कर मंडळींची (Senior Citizens) काळजीपूर्वक रीतिने खाजगी कुटूंबांत व्यवस्था केली गेली.

हो, आणि ती गरोदर बाई आठवते ना? तिची व्यवस्था एका खाजगी घरांत तर केलीच केली, परंतू तसे करतांना ते घर २४ तास ऊघडे असणा-या हास्पीटलच्या जवळ आहे ह्याची देखील खात्री केली गेली. गांवातल्या एकुलत्या एका दांताच्या डाक्टरला आणि दोन जनरल नर्सेसना गरज लागेल त्या प्रमाणे सर्व प्रवासी त्या गांवात असे पर्यंत २४ तास सेवेसाठी हजर राहाण्याची व्यवस्था केली.



आणि एव्हढी ही सेवा कमी पडते आहे की काय म्हणून प्रवाशांना अमेरिकेत अथवा जगांत कुठेही दिवसांतून निदान एकदा तरी टेलीफोन करता येईल अशी व्यवस्था केली. दिवसभरांत प्रवासी नुसते बसून काय करणार म्हणून त्यांचे लहान लहान गृप करून त्यांना जवळ पासची ठिकाणे दाखविली गेली. जवळपासच्या लेकवर त्यांना पिकनिकला नेले. ज्यांना आवड आहे अशा लोकांना जवळच्या जंगलांत हायकिंगसाठीही नेले. गांवांतील बेक-या २४ तास चालू ठेवून प्रवाशांना २४ तास गरमागरम ब्रेड पुरविण्यांत आला. घरोघरी अन्न शिजविले गेले आणि आपल्याकडे भारतात भंडा-याच्या दिवशी ते सगळ्यांना वाढले जाते तसे वाढले गेले, ज्यांना तेही नको असेल, अशा लोकांना गांवातल्या मोजक्याच रेस्टारंटमध्ये आपल्या गाडीने नेवून जेवावयास घालण्यात आले, इतकेच नव्हे तर सर्व प्रवाशांचे कपडे विमानावरच राहिले असल्याने (आम्ही प्रवाशांना सामान विमानांतच ठेवायला सांगितले होते) त्यांच्या तात्पुरत्या कपडे धुण्याची व्यवस्था स्थानिक लांड्रीम्याटमध्ये मोफत करण्यांत आली, आता बोला!

 

प्रत्येक प्रवासी आपल्या डोळ्यांतले अश्रु आवरता आवरता ही सारी हकीकत सांगत होते. विमानतळ आता परतीची विमाने नेवू शकतील असे कळतांच त्या गांवात ऊतरलेले सर्व प्रवासी सुखरूपपणे विमानतळावर पोहोचवून देण्यांत आले तेव्हां कुठे त्या खेड्यातल्या मंडळींना हायसे वाटले.

 

विमानतळावर दहा हजार प्रवाशांनी एकदम गर्दी केल्यानंतरही अजिबात गोंधळ नव्हता. कोणता प्रवासी कोणत्या विमानांत, आणि ते विमान कोणत्या वेळेला निघणार ही माहिती तेथले गांवकरी विमानतळावरील स्थानिक हापिसरच्या मदतीने अतिशय आस्थेने आणि मोठ्या आदबीने अगदी अचूकतेने पुरवित होते.

 



हे सारेच माझ्या आकलनाबाहेर होते. माझ्याच नव्हे तर सा-या प्रवाशांच्याही आकलनाबाहेर होते. हे गांव ते किती लहान, त्यांत तरुण आणि कामे करणा-यांची संख्या ती किती परंतू कधी नव्हे त्या आपल्या गांवांत आलेल्या आमच्यासारख्या अतीथींना ह्या गावाने "अतिथी देवो भव" ह्या मंत्राने भारून टाकले होते. ह्या आमच्या नुकतीच ओळख झालेल्या मित्रांनी सेवाभाव ह्या एकाच जयघोषांत आख्खी गांव-पंढरी दुमदुमून टाकली होती. जणू अतिथींच्या रूपाने आपल्या गांवात गंगाच आली आहे आणि तिची सेवा करणे हे आपले आद्द्य कर्तव्य आहे अशा भावनेने त्यांनी सेवा तर केली होतीच परंतू पंढरीची वारी परततांना वारक-यांच्या डोळ्यांत जसे निरोपाचे अश्रु येतात तशाच अश्रुभरल्या नयनांनी आम्हाला निरोप द्यायला आले होते-पुन्हा कधीही न दिसणा-या आम्हाला निरोप द्यायला आले होते. कोण कुठले आम्ही-आम्हाला हृदयाशी कवटाळत होते, अश्रुंचा अभिषेक करीत होते. मानवतेच्या त्या एका सुक्ष्म तरीही अतूट अशा धाग्याने आम्ही बांधले गेलो होतो.

 

तीन दिवसापूर्वी आम्ही ह्याच विमानांतून ज्या मन:स्थितीत ऊतरलो होतो ती आणि आज त्याच विमानावर आम्ही परतलो ती ह्यांत जमीन अस्मानाचे अंतर होते. सर्व प्रवासी मिळालेल्या अनोख्या आनंदाने बेहोष झालेले होते, जणू एखाद्या अनामिक बेटावर सुटी घालवून परत फिरतांना असते तशी त्यांची मनोवृत्ती होती. त्यांच्या एका डोळ्यांत गांवच्या लोकांनी दिलेला आगळ्या वेगळ्या अनुभवाचा आनंद होता तर दुस-या डोळ्यांत कृतज्ञतेच्या पापण्या भिजविणारी मानवतेची एक निष्ठाही होती. त्या गांवच्या निरोप द्यायला आलेल्या शेकडो हातांना, अगदी शेवटचा हात दिसेपर्यंत आम्ही सर्वांनी निरोप दिला. आयुष्यांत परत कधीही न भेटणा-या त्या सर्वांना आमचं हृदय धडधडत का होईना पण निरोप देत होतं.

 



 

विमानाने धांवपट्टी सोडली, ते हात दूर एखाद्या ठिपक्यासारखे वाटून दिसेनासे झाले आणि आमच्यापैकी कांही मंडळींच्या मनाचा बांध फुटला, त्यांना भडभडून आलं. शेजारच्या सीटवर बसलेल्या मित्रांनी त्यांचं जमेल तेव्हढं सांत्वन केलं.

 

तेवढ्यांत एक अनपेक्षित घटना घडली. विमानांतला एक प्रवासी माझ्याकडे आला आणि म्हणाला: "मी जरा दोन मिनिटे पीए सिस्टीमवर बोलू कां?". विमान-कंपनीच्या पीए सिस्टीमवर खाजगी मंडळींना बोलायची परवानगी नाही हे माहित असून देखील मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. ह्या गुन्ह्यासाठी कदाचित माझी नोकरी देखील गेली असती. परंतू त्या क्षणी मी अशा साधक-बधक विचारांच्या पलीकडे वावरत होतो.

 

त्या माणसाने बोलायला सुरुवात केली. त्याच्या स्पष्ट आणि काहीशा खड्या आवाजांत त्याने सर्वांना गेल्या तीन दिवसांत त्या लहानशा खेड्यांतून मिळालेल्या ऊत्तम सेवेबद्दल आठवण करून दिली. कोणत्याही प्रकारच्या नात्याने बांधलेले नसतांनाही त्या गांवातील परक्या लोकांनी केवळ माणुसकीच्या नात्याने सर्वांना दिलेली वागणूक किती ऊत्तम होती हे सांगून तो पूढे सांगू लागला: ---" अशा माणुसकीच्या वागणुकीला, कृतज्ञतेला आपण योग्य ते प्रत्रुत्तर द्यायलाच हवे, म्हणजे आपणही त्यांच्यासाठी कांहीतरी केल्याचे समाधान आपल्याला मिळेल. तेव्हां माझ्या मनांत असा एक विचार आला आहे की आपण Delta 15 च्या नांवाखाली एक Trust Fund ऊघडू या.  त्या फ़ंडांतून आपल्याला ज्या विद्द्यार्थ्यांनी शाळा आणि अभ्यास बूडवून मदत केली त्यांच्यासाठी कालेजची शिक्षणाची, स्कालरशिपची व्यवस्था करू या." ह्या त्याच्या बोलण्याला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तेथल्या तेथे एक कागद फिरवून सर्व प्रवाशांनी १४,००० डालर्सपेक्षांही अधिक रक्कम जमा केली.



त्यानंतर दुसरी आश्चर्याची गोष्ट घडली आणि ती म्हणजे त्या व्यक्तीने तेव्हढ्याच रकमेची त्यांत भर घातली. तो माणुस व्हर्जिनीया राज्यांतला एक डाक्टर होता. त्याने त्या सर्व रकमेची जबाबदारी तर घेतलीच परंतु डेल्टा एयर लाईनीशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही योग्य ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करीन असे अश्वासन दिले. सुदैवाने त्याला योग्य तोच प्रतिसाद मिळाला.

 

आता जरी ह्या घटनेला दहा-अकरा वर्षे झाली असली तरी आतापर्यंत ह्या फंडांत दीड मिलियन डालर्स जमा झाले आहेत आणि आजतागायत त्या लहानशा गांवातल्या १३४ विद्द्यार्थ्यांना त्या रकमेतून कालेज शिक्षण दिले गेले आहे. त्यांचे आयुष्य घडविणारा बदल अगदी निश्चितपणे झाला आहे. आणि अजून तो होत राहील, कारण आजही इतक्या वर्षांनी देखील फंडांतली रक्कम वाढतेच आहे.

आज ९-११ च्या दहाव्या वर्धापनदिनी ही हकीकत तुम्हाला सांगतांना माझे मन त्या आठवणींनी आजही भरून येते. जगांत अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे, दु:ख्खाच्या वेळी धांवून येणारी माणसे आहेत, अश्रु पुसणारे हात अद्द्यपही शिल्लक आहेत. रोजच्या व्यवहारांत आपण वाचलेल्या बातम्या अथवा दूरदर्शनवर पाहिलेले फसवाफसवीचे प्रकार हे जगांत आहेत, परंतू ते मर्यादित आहेत. जगांत चांगुलपणा भरलेला आहे, मात्र त्याकडे डोळस नजरेने पाहाण्याची दृष्टी मात्र पाहिजे. संकटं पावसाच्या सरी सारखे एकामागून येत असतात पण पावसाबरोबर जसा मृदगंधही येत असतो तसच संकटांमधून आपल्याला बळकटपणा आणणारा हुंकार देखील येतो. आयुष्यांतल्या अधिक कठीण संकटांना तोंड द्यायला आपण तयार होतो, "आपण घडतो", हेही खरं आहे नाही का? किंबहुना संकटच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवितात.



साई बाबा एकदा असं म्हणाले होते की: "प्रार्थना करणा-या ओठांपेक्षां मदतीसाठी पूढे केलेला हात पवित्र असतो" आणि हे आम्ही सर्व प्रवाशांनी आयुष्यांत प्रत्यक्ष अनुभवले आहे.

 

Julia Fletcher Carney (1823-1908) American Teacher once said:

 

Little deeds of kindness

Little words of Love

Help to make  earth happy

Like the heaven above

 

 

पृथ्वीच्या पाठीवर एका ठिपक्यासारख्या असलेल्या त्या लहानशा गांवातील गांवक-यांनी त्यांना अगदी अपरिचित, अनोळखी अशा आमच्यासाठी त्या तीन दिवसांत ह्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला होता हे आयुष्यभर माझ्या आणि सह प्रवाशांच्या कायमचे लक्षांत राहील ह्यांत शंकाच नाही. ईश्वर त्यांना सुखी ठेवो!

 

--डॆल्टा १५ चा एक सुदैवी फ्लाइट अटेंडंट

 

 शशिकांत पानट

२ टिप्पण्या:

Pradnya म्हणाले...

very touching

mukund म्हणाले...

Relay no words to say.....all the people from the town may be from heaven.....