सोमवार, १३ जानेवारी, २०१४

मकर संक्रांत ........



मकर संक्रांत म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण धनुर्मास म्हणजे काय ते पाहू. डिसेंबर महिन्यात ज्या दिवशी सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा पासूनचा पुढचा महिना हा धनुर्मास म्हंटला जातो. मास म्हणजे महिना. धनु रास ही गुरुची रास आहे. गुरु म्हणजे देवांचा गुरु. अशा राशीत सूर्य भगवान. म्हणजे अर्थातच खूप महत्व असणारच या काळाला. याचाच बोलीभाषेतला, किंवा अपभ्रंश झालेला उच्चार म्हणजे धुंधुरमास. या काळात नद्यांमध्ये पवित्र स्नान करायची पद्धत आहे. उद्धेश हाच की आपण माणूस आहोत. प्राणी नाही, त्यामुळे आपला कल हा घड्ण्याकडे असावा बिघडण्याकडे नको. वैष्णव म्हणून जे ओळखले जातात किंवा विष्णूच्या भक्तांसाठी हा काल फार महत्वाचा मानला जातो. कारण गुरु आणि सूर्य हे दोन्ही श्री विष्णू अवतार मानले गेले आहेत. इतर खानपानाचे जे प्रकार या काळात आहेत ते व्रताची आठवण करून देण्यासाठी, मनाची, शरीराची शुद्धता वाढवण्यासाठी आहेत. ज्यांना जमते त्यांनी ते अवश्य करावे. आपली पृथ्वी ही सरळ नसून तिचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध थोडेसे म्हणजे साडेतेवीस अंशात कललेले असतात. 

 त्यामुळेच आपल्या पृथ्वीवर विविध ऋतू होत असतात. आणि संपूर्ण वर्षभर उन्हाळा किंवा हिवाळा रहात नाही. ज्यावेळेस उत्तर गोलार्ध सूर्यासमोर असतो त्यावेळेस तिथे सूर्यकिरण सरळ रेषेत पडतात.
तुलनेने सूर्य जवळ असतो त्यामुळे इथे उन्हाळा आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो किंवा जाणवतो. आणि ज्या वेळेस सूर्य दक्षिण गोलार्धाच्या जवळ असतो त्यावेळेस याच्या बरोब्बर उलटे म्हणजे उत्तर गोलार्धात हिवाळा आणि दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. आपला भारत देश उत्तर गोलार्धात आहे. मकर राशी जवळ येताना किंवा आपण त्याला मकर वृत्त म्हणूया पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यासमोर हळूहळू यायला लागतो. त्यामुळे आपण ज्याला थंडीचे दिवस म्हणतो तेव्हा लहान झालेला दिवस आता पुन्हा मोठा होऊ लागतो. सूर्यदेव जास्त वेळ क्षितिजावर थांबतात. त्यांचे किरण सरळ सरळ पृथ्वीला भेट देतात. आणि उत्तर पृथ्वी जास्त उबदार होऊ लागते. हीच आपली मकर संक्रांत. संक्रमण म्हणजे बदल.....हा आपला हिंदुंचा सण

 १४ जानेवारीलाच का येते मकर संक्रांत “इंग्रजी महिन्याप्रमाणे?” असा काही जणांचा प्रश्न असतो.
खरंतर या दोन्हीचा तसा काही संबंध नाहीये. पुढच्या वर्षी मकर संक्रांत १५ जानेवारीला येणार आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत येण्यास ३६५ दिवस, सहा तास, नऊ मिनिटे आणि दहा सेकंद इतका काल लागतो. बघा किती परफेक्शन आहे सूर्यदेवांचे !!!!!! म्हणूनच ग्रहांच्या या गती, गुरुत्वाकर्षण, आणि एकूण ग्रह तारयानच्या, अणूंच्या या चाललेल्या व्यापाराला, घडामोडींना “ऋत” असे म्हणतात. “ऋत” म्हणजे पूर्ण, न बदलणारे, अंतिम ईश्वरी सत्य. यामधे कधीही तिळमात्र बदल होत नाही. तो झाला तर सृष्टीचे सारे चक्र बिघडून जाईल. आपले जगणे अशक्य, अवघड होईल. आपण ज्या “सत्याच्या” गप्पा मारत असतो ते फक्त सत्य म्हणून ओळखले जाते. कारण ते भेसळयुक्त असते. पूर्ण सत्य नसते. असो. तर ग्रेगोरीअन कॅलेंडर प्रमाणे शतकपूर्तीच्या अंकाला चारशेंनी भाग जात नसेल तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर ४०० वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो. त्यामुळे दर वर्षी ९ मिनिटे दहा सेकंद हा काल साठत साठत दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एका दिवसाने पुढे जातो. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश ही खगोलीय घटना २१ डिसेंबरला होते. भारतातील बहुतेक सगळे सण हे चांद्रमासावर आधारलेले असल्याने त्याची सांगड आपोआप जानेवारी महिन्यातील १४ तारखेशी घातली गेली आहे. मकर संक्रमणाच्या दिवशी [Winter Soltice] वृत्तावर सूर्य बरोब्बर डोक्यावर असल्याचा अनुभव विशेषत: दक्षिण मादागास्कर, उत्तर ब्रिस्बेन, ब्राझील आणि साओ पावलो इथे येतो. सूर्याचा वार्षिक भासमान भ्रमणमार्ग आणि आपल्या आकाशाचं विषुववृत्त यांच्या मधला
कोन साडे तेवीस अंश आहे. या दोन्ही पाटल्या जिथे छेदतात त्यांना संपात बिंदू म्हंटले जाते. २१ मार्च रोजी सूर्य जिथे असतो त्याला वसंत संपात आणि २१ सप्टेंबरला सूर्य जिथे असतो त्याला शरद संपात असे म्हंटले जाते. या दोन्ही दिवसांना विषुवदिन [Equinox ] असे म्हंटले जाते. सूर्य त्याच्या या भासमान म्हणजे आपल्या ही भ्रमणकक्षा जशी भासते त्या .... मार्गावर प्रवास करताना कधीही साडेतेवीस अंश उत्तर अक्षवृत्ताच्या वर आणि साडेतेवीस अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या खाली जात नाही. या भासमान मार्गावर सूर्य मकर वृत्तावर येतो आणि काही काल तिथेच थांबल्या सारखा वाटतो.
हिवाळ्यात रोज दक्षिणेकडे सरकणाऱ्या सूर्यामुळे दिनमान कमी होते आणि रात्र मोठी होते. आणि अर्थातच त्यामुळे सूर्य प्रकाश तिरपा आणि कमी पडून थंडी वाढते. उत्तर ध्रुवावर तर अंधारच अंधार असतो. पृथ्वी आपल्या कललेल्या आसाने सूर्या भोवती लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत फिरत असते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सूर्या पासूनचे पृथ्वीचे अंतर सगळ्यात कमी म्हणजे ९ कोटी १५ लाख मैल असतं. पृथ्वीच्या या स्थितीला “उपसूर्य” असे म्हंटले जाते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हे अंतर ९ कोटी ४५ लाख मैल असतं, याला “अपसूर्य” असे म्हणतात. पृथ्वीच्या या कळलेल्या आसामुळेच हे सगळे शक्य होते.

 आता आपण याच्या धार्मिक, सामाजिक अंगाकडे बघू या .....


आपण मागे जसे वारंवार पाहिले आहे की हिंदू धर्मातील जवळपास सारे सण, उत्सव हे माणसाला
आध्यात्मिक मार्गावर, पारलौकिक जगाच्या पथावर अग्रेसर ठेवताना, त्याचे ऐहिक जीवन, लौकिक जगणे सुद्धा कसे आनंदमय होईल, सुखकारक होईल याचा अभ्यास करून ठरवले गेले आहेत. त्यात वस्त्रे, अन्न, आचार, विचार, उच्चार, मंत्र, यंत्र, तंत्र, मुद्रा, देवता, मूर्ती, परंपरा, नृत्य, नाट्य या साऱ्याचाच यात विचार केला गेला आहे.

 संक्रांतीला आपण मुख्यत्वे देतो घेतो ते तीळगुळ .......घरात पक्वान्न होते ते गुळपोळीचे .....का बरे?
बघा .आधीच्या या थंडीच्या काळात शरीरातील उब कमी झालेली असते. पोटात आग, उष्णता जास्त आणि बाहेर थंडी त्यामुळे त्वचा कोरडे पडायला लागते. इतकी की कधी कधी अंगाल खूप खाज सुटते. शरीरात तेलाची आवश्यकता वाढलेली असते. भूक खूप असते. तब्येत उत्तम असते. या काळात शरीर सुदृढ होते. या वाढत्या तेलाच्या मागणीची पूर्तता तिळाने केली जाऊ शकते. तीळ हे एक तैलबीज आहे. मुळात तिळेइल या शब्दावरूनच “तेल” हा शब्द आलेला आहे. तर हे तेल अंगाला लावा. तीळ खा ....म्हणजे शरीरातील तेलाची गरज भागेल. शरीराला आतून आणि बाहेरून भरपूर Calciam मिळेल. शरीर पुष्ट, ताकदवान होईल.

गुळामध्ये २१ प्रकारचे क्षार आहेत. शरीरातील मेंदूतील, हृदयातील आणि इतर ठिकाणचे विजेचे वहन
शरीरातील क्षारांमुळे होत असते. हे क्षार शरीरातील इतरही अनेक क्रियांना आवश्यक असतात. तसेच गुळात लोह असते. शाकाहारी व्यक्तींना लोह कमी मिळते. ते गुळातून भरून काढता येते. शिवाय यातील कर्बोदकांमुळे [ Carbohydrates ] शरीराला कामासाठी लागणारी उर्जा मिळते. बघा .....तिळगुळ देऊन तब्येत सुधारल्यावर समोरचा माणूस का बरं कडू बोलेल? आं? हाहाहा ......गोड बोलणारच ......घरात गुळाची पोळी केली जाते. यातही तीळ असतातच. केवळ मकर संक्रांतीला नव्हे तर एकूणच थंडीच्या या काळात काळ्या रंगाची वस्त्र परिधान केल्याने, वापरल्याने शरीरात उब टिकून रहाते. कारण काळा रंग प्रकाश आणि उष्णता शोषून घेतो. परावर्तीत करत नाही. पांढरा रंग प्रकाश परावर्तीत करतो. म्हणून या काळात काळी वस्त्रे वापरली जातात. मग स्त्रिया त्यात अजून गंमत म्हणून चंद्रखडीच्या डिझाईनच्या सुंदर साड्या नेसून सजतात. लोक एकमेकांना भेटून तिळगुळ देतात घेतात.....गोड बोला म्हणतात......आणि  बोलतात .....समाजातील सारे घटक एक होतात. मकर संक्रांतीच्या वेळी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात. ( आपणही पुरुषांनी गुलाल- बुक्का समारंभ साजरा करायला काही हरकत नाही ). एरव्ही आपण लोकांना बुक्का किंवा चुना लावत फिरत असतो त्यापेक्षा हे बरे .....हाहाहा....]. सुगडात [ छोटेमडके]  वेळण्या, बोळखी, सुपारी, उस, बोरे, गहू, कापूस, भुईमुगाच्या शेंगा, हळकुंडे आणि पैसे घालून हे सगळे “वायन” दान म्हणून दिले जाते. बघा इथे “दानधर्म” आला. आपल्याला एखादी गोष्ट लाभावी असे वाटत असेल तर त्यातील थोडे दान करा. मग त्याचा निर्भेळ आनंद मिळतो. आणि तसेही आपण देण्यासाठी बांधील आहोत. एक श्वास घेण्यापूर्वी एक श्वास आपल्याला सोडावा लागतो. शिवाय महिला दिवा, आरसा, कंगवा, रुमाल या आणि सध्याच्या काळाला अनुसरून दानच पण “लुटणे” या नावाने अनेक वस्तू दान देत
असतात आणि सगळ्या मिळून “आनंद लुटत” असतात. [राजकीय लोक सुद्धा वेगळ्या अर्थाने हल्ली या  “लुटीत” सहभागी व्हायला लागले आहेत. आत्ता हे लोकांना वस्तू वाटणार आणि निवडणुकीत मते  “लुटणार” ......हाहाहा.....असो....]....दिवस मोठा होत असल्याने आनंद साजरा करण्यासाठी पतंग उडवले जातात.

गुजराथमध्ये तर हा एक मोठा उत्सव आहे. चीनमधेही पतंग उडवणे हा एक मोठा प्रकार आहे.
दक्षिण भारतात पहिला दिवस “इंद्र पोंगल”, दुसरा दिवस “सूर्य पोंगल” आणि तिसरा दिवस “मट्ट” पोंगल म्हणून साजरा केला जातो. मट्ट पोंगल हा गाईचा पोंगल असतो.

 तर मित्रांनो .....तुम्हाला सर्वांना .....मकर संक्रमणाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि .......

तिळगुळ घ्या गोड बोला .....






लेखक.......
डॉ.हेमंत सहस्रबुद्धे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: