शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

क्षण.......!!


क्षण!


एकदा एक माणुस मेला. आपण अगदी अकाली मेलो आहोत असेच त्याला वाटत होते. खरं तर अजुन खुप कांही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या. पण आता आपण जीवंतच नाही असं लक्षांत आल्यानंतर त्याचा नाईलाजच झाला. मात्र आता वर स्वर्गांत पोहोचलो आणि ईश्वराला भेटलो की "माझा असा अकाली मृत्यु कां झाला" हे आपण त्याला नक्की विचारायचेच असं त्यानं ठरविलं. आणी काय आश्चर्य! समोरुन देवच येतांना दिसला. त्याच्या हातांत एक मोठी बॅगदेखील होती. त्यांत काय असावे बरे? असा विचार करेपर्यंत देव समोर येवुन ठाकला. आणि माणसाला म्हणाला: "चल, तुझा येथला मुक्काम संपला. आता माझ्याबरोबर चल" त्या माणसाला थोडा धक्काच बसला कारण देवाला प्रश्न विचारण्याच्या आंतच देवाने आधीच मुद्द्यालाच हात घातला होता. पण वाद घालणार नाही तो माणुस कसला? माणुस देवाला म्हणाला:
"पण देवा, ईतक्या लवकर? अजुन खुप कांहीतरी करायचे माझे बेत आहेत."
देव तिकडे दुर्लक्ष करुन परत म्हणाला "हे, बघ, तुझ्या पृथ्वीवरील मुक्कामाची वेळ संपली आहे, चल, निघायला हवं" माणुस एक क्षणभर विसावला आणि त्याने विचारले" ठीक आहे देवा, पण एक विनंती आहे. मला जाणुन घ्यायची खुप उत्सुकता आहे की तुझ्या हातांत जी बॅग आहे त्यांत काय आहे? देव किंचित हंसला आणि म्हणाला:
"अरे त्यांत तुझ्याच चीजवस्तु आहेत."
माणूस: "काय माझ्या चीज वस्तु? म्हणजे माझे कपडे? पैसे? महत्वाचे कागदपत्र?"
देव: "अरे त्या वस्तु तुझ्या कधीच नव्हत्या, त्या पृथ्वीवरच्या होत्या"
माणूस: "मग, माझ्या आठवणी नक्की असतील त्यांत"
देव: "आठवणी? छे, त्या तुझ्या कधीच नव्हत्या. त्यावर वेळेची मालकी होती."
माणूस: "हां, हां, आता आठवलं! मला अगदी खात्रीनं वाटतं की माझी बुद्धीमत्ता आहे त्यांत?"
देव: "बुद्धीमत्ता? छे रे, बुद्धीमत्ता तर आपल्या सभोवतालच्या परिस्थिती -प्रमाणे आपण वापरतो त्यामुळे ती तुझ्या मालकीची कधीच नव्हती!" आता मात्र माणुस थोडा विचारांत पडला. पण त्या बॅगमध्ये काय आहे ह्याची ऊत्सुकता त्याला स्वस्थ बसु देईना, त्याचे प्रश्न विचारणे थांबलेच नाही.
माणुस: "अच्छा, तर मग त्यांत नक्की माझी मित्र मंडळी आणि कुटूंबीय असणार"
देव: "पृथ्वीवरील मुक्कामांत मित्र आणि कुटूंबीय तुला तुझ्या आयुष्याच्या मार्गावर भेटले, त्यांच्यावर त्या मार्गाची मालकी आहे तुझी नव्हे, ते कसे असतील बरे ह्यांत?"
माणूस: "नसु देत मित्र आणि कुटूंबीय. पण माझ्या आयुष्यभर ज्यांनी साथ दिली, ते म्हणजे माझी पत्नी आणि मुलगा त्या बॅगेमध्ये नक्कीच असायला पाहिजे"
देव: "तुझा विचार मी समजु शकतो, पण अरे ते देखील तुझे कधीच नव्हते, ते तुझ्या हृदयाच्या मालकीचे आहेत"
माणुस: "मग काय बरं असेल त्यांत? आता काय बरं ऊरलं? माझे शरीर?"
देव: "तुझे शरीर? अरे तेही तुझ्या मालकीचे कधीच नव्हते. ते तर केव्हांच आपल्या माहेरी गेलं आहे आणि पृथ्वीवरच्या मातीत विलीन झालं आहे. त्यावर त्या पृथ्वीवरच्या मातीची, धुळीची मालकी आहे."
माणुस: "हां, आत्ता फक्त एकच गोष्ट ऊरली आहे. आणि हे ऊत्तर बरोबर आहे असं मला वाटतं. त्यांत माझा आत्मा असेल"
देव: (किंचित स्मितहास्य करीत) )"तुझा आत्मा? अरे तो तर माझ्या मालकीचा आहे"
आता मात्र माणुस घाबरला. त्याची ऊत्सुकता पराकोटीला पोहोचली. आतां ह्यांत आहे तरी काय? असा विचार करीत घाबरत घाबरत त्याने देवाच्या हांतांतुन ती बॅग घाईघाईने घेतली आणि ऊघडली. पहातो ते काय? ती तर एकदम रिकामीच होती. त्याच्या डोळ्यांमधुन अश्रु ओघळु लागले. रडत रडत तो देवाला म्हणाला: "माझं संपुर्ण आयुष्य पृथ्वीवर गेलं, आणि माझ्याकडे कांहीच नव्हतं?"
देव म्हणाला: "अरे फक्त तुच नाही, कोणत्याही माणसाकडे कधीही कांहीही नसतं, तु पृथ्वीवर जन्माला आला तेव्हां रिकाम्या हाताने आलास, तुझं शरीर, तेही तुला तुझ्या आई वडीलांनी दिलं होतं. आता पृथ्वीवरुन जातांना देखील ते शरीर तुला तिथेच सोडून जावं लागतय! मात्र एक गोष्ट तुझ्याकडे नक्की आहे!"
माणसाचे डोळे चमकले. त्यांत एक आशेचा किरण दिसु लागला. मोठ्या अधिरतेने आणि ऊत्सुकतेने देवाला विचारले: " देवा, अरे, मी तुला एव्हढे प्रश्न विचारले त्यांतले एकही माझे नव्हते. मी काय बरं विचारायचं विसरलो तुला? असं आहे तरी काय माझ्याकडे?"
देव ऊत्तरला: "अरे तुझ्याकडे एकच गोष्ट नेहमी होती आणि ती म्हणजे आत्ताचा क्षण! तो तर नेहमी तुझ्याकडेच होता आणि तेव्हढीच एक गोष्ट तुझ्याकडॆ नेहमी असणार! म्हणुनच आला क्षण भाग्याचा असं म्हणतात! आयुष्य हे क्षणभंगुर आहे असंही म्हणतात. आहे तो क्षण कसा जगावा ह्याचा विसर माणसाला पडतो, आणि जे आपल्या मालकीचच नाही त्याच्या मागे तो नेहमी लागतो. शेवटी हातांत कांही येतच नाही. चल, आत्ताच्या ह्या क्षणाने भरलेली बॅग तु घे आणि माझ्याबरोबर पुढच्या प्रवासास सिद्ध हो!"
ईतकी वर्षे आयुष्याचा प्रवास करुनही आपल्याला हे साधे गणित कळले नाही ह्याचे त्या माणसाला खुप वाईट वाटले. त्याचे मन विषण्ण झाले. त्याने मान खाली घातली, आपली बॅग ऊचलली आणि हे साधं सत्य आपल्याला आख्या आयुष्यभर कसं कळलं नाही ह्या विचारांत मग्न होत तो देवामागुन चालु लागला! स्वर्गांत जरी तो चालत होता तरी पृथ्वीवर कुणीतरी म्हणत असलेल्या गीताचे शब्द आणि सूर त्याच्या कानावर पडत होते. डोळ्यांतुन सतत चाललेल्या अश्रुधारांमधुन स्वर्गाचा तो सुशोभित मार्ग त्याला अंधुक अंधुकच दिसत होता.


संपला इथला पाहुणचार
चार दिसांच्या मुक्कामाचा
सरला रे व्यवहार!! ध्रु!!

येथे उरतील सगे सोबती
आठवणीही येतील नेत्री
शोधीत बसतील तत्वज्ञानी
जीवनाचे रे सार!!!! ध्रु!!

चक्र कालचे आज चालते
नविन येथे काही नसते
आज तुझे रे दिवस संपले
मुक्कामाचे चार !!!! ध्रु!!

आला तेव्हां काय आणिले?
जातां इथले, इथे राहिले
अवनीवरच्या मुक्कामाचा
आज पूर्ण व्यवहार!!!!ध्रु!!


लेखक -----
शशिकांत पानट



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: