मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

आमची व्हिएतनामची सफर ( १२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर-२०१३ )













                            व्हिएतनाम




लॉस-एंजेलिसला राहाणारे आमचे मित्र श्री. गोखले ह्यांचा एक दिवस फोन आला की "आम्ही व्हिएतनामला जायचे ठरवित आहोत, येणार काय?" "बॉसला विचारुन कळवितो" असे त्यांना सांगुन मी माझ्या पत्नीशी बोललो. तिच्या अनेक (भंडावुन सोडणा-या) प्रश्नांची ऊत्तरे देतांना ’त्यापेक्षां गेलो नाही तर बरे’ असा सारासार विचार मी केला. ह्या घटनेवरुन मला असं वाटतं की कोलंबसाची बायको मराठी नसावी. अन्यथा जगाला अमेरिका हा देश सांपडलाच नसता. त्याची बायको मराठी असती तर तिने बहुधा कोलंबसाला अनेकविध प्रश्न विचारुन भंडावुन सोडले असते.
कुठे जायचे म्हणतां आहांत? (त्याचा "टोन" काय वेड बिड लागलय की काय तुम्हाला-अशा अर्थाचा)
(डोक्याकडे बोट दाखवुन) वरचा मजला ठीक आहे ना?
एकटे जाणार आहांत की अजुन कोणी (टोळभैरवही) आहेत?
परत केव्हां येणार आहांत? की आहे तुमची कोणीतरी तिकडे?
मी पण येते तुमच्याबरोबर.(म्हटला तर हा प्रश्न, पण खरं तर ती सुचनावजा आज्ञा होती.)
नाही गेलं तर चालणार नाही का? (पण तो बोलतांनाचा बोलण्याचा रोख-- (म्हणजे ’टोन’ हो--) "ह्यांना सारखं बाहेर जायचं असतं" असा.
गेलचं पाहिजे का? (ह्या ठिकाणी किंचित अगतिकता!)
घरची कामे सोडुन ह्या लष्कराच्या भाक-या थापायला सांगितलं आहे कुणी? (आवाज किंचित चढलेला-ज्याची मला संवय आहे!)


जवळ जवळ अशाच धर्तीच्या प्रश्नांना (विश्वास ठेवा अथवा ठेवु नका पण -समाधानकारक) ऊत्तरे देत मी शेवटी पत्नीला समजाविण्यांत यश मिळविले
खुंटा बळकट करण्यासाठी "हे नक्की ना?" अशी तिची परवानगी घेवुनच मी गोखल्यांना हंसत हंसत फोन केला " अरे वा! तुम्ही निमंत्रण दिले आणि आम्ही आलो नाही असे होईल तरी का?" माझ्या विनाकारण हंसण्याने आणी त्यांच्या "अरेच्च्या! मी सहज म्हणुन फोन केला, येतील असे वाटले नव्हते!" अशा कांहीशा भावना त्यांनी व्यक्त करण्याच्या आंतच मी फोन बंद केला. (ह्यामुळे मी किती स्मार्ट आहे हे वाचकांच्या लक्षांत आणुन देणे मी माझे कर्तव्यच समजतो. अमेरिकन कार्पोरट्मध्ये एव्हढी वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्याला हवे अथवा नको असलेले communication नेमके कुठे थांबवायचे, ह्या ट्रेनिंगचा शेवटी ऊपयोग झाला तर!)


ट्रीपची तयारी

पुढचे दोन तीन महिने तयारीसाठी होते तरीही पत्नीचे "एव्हढ्या घाईगर्दीने जायचे काय अडले आहे?" हे तिने कां बरे म्हटले असेल? ह्याचाच विचार मी ते दोन तीन महिने करीत होतो. मात्र कधी कधी साध्या साध्या प्रश्नांची देखील ऊत्तरे सहजासहजी मिळत नाही हेच खरे! शिवाय ’कार्य-कारण-भाव’ नसलेल्या अशा प्रश्नांची ऊत्तरे ४० वर्षे घासुनही अमेरिकन कार्पोरेट देखील शिकवु शकले नाही ह्याचा किंचित विषाद वाटल्यावाचुन राहावले नाही.


शेवटी जायचा दिवस ऊजाडला. आमचे विमान सकाळी १ वाजुन ५५ मिनिटांनी होते. वास्तविक पाहाता, घरुन चांगले जेवुन खावुन विमानतळावर वेळेच्या आधी पोहोचण्यासाठी ही वेळ सोयीची होती. मात्र निघायच्या दिवशीच झोपेचे खोबरे होणार होते. तरीही सर्व जग झोपले आहे आणि आपण मात्र परदेश प्रवासासाठी निघालो आहोत हे आत्मिक समाधान मिळत होते हे मात्र बरीक खरे! आम्ही आमच्या गाडीने विमानतळावर पोहोचलो. आधीच आरक्षित केलेल्या ठिकाणी गाडी पुढील बारा दिवसासाठी पार्क करुन, पार्कींग कंपनीच्या शटलने आम्ही विमानतळावर पोहोचलो.




                            लॉस-एंजेलिस-एअर पोर्ट 


आमचा विमान प्रवास

कस्टमचे सोपस्कार आटोपुन आम्ही विमानांत बसलो. विमान चीन देशाच्या कंपनीचे असल्याने पुढील कांही तास निदान विमानांत आहोत तोपर्यंत तरी चायनीज पद्धतीचे जेवायला मिळणार हे ओघाओघाने आलेच. आम्ही त्यांना व्हेजीटेरियन जेवण हवे अशी विनंती केली होती. ते यायच्या आधी आमचे हात नीट पुसले जावे म्हणुन त्या हवाई सुंदरींनी थंडगार पाण्याने भिजविलेले टॉवेल्स (अथवा रुमाल म्हणा हवे तर) आम्हांस आणुन दिले. त्याने हात आणि तोंड पुसतांच खुपच फ़्रेश वाटले. विमानांतल्या कांही प्रवाशांनी त्या रुमालांचा ऊपयोग (कुणी आपल्याकडे पहात नाही ना अशा अर्थाने ईकडे तिकडे पाहुन) चेह-यावरील ईतर अवयव साफ करण्यासाठीही वापरले. आमच्या आधीच्या प्रवाशांनी ह्या रुमालांचा ’तसा’ ऊपयोग केला नसेल, शिवाय त्यानंतर ’ते’ धुतले असतीलच की! असा सोयिस्कर विचार करुन मी त्याकडे कानाडोळा केला. खरे तर प्रवाशांनी वापरलेल्या अवयवामुळे ’नाक’ केले असे मी म्हणणार होतो, पण तसा शब्दप्रयोग मराठीत अजुन तरी रुढ झालेला नाही, त्यामुळे मराठी भाषेत एक नविन शब्दप्रयोग टाकण्याची संधि वाचकांनी गमविली असे वाटते. असो.







आम्ही Order केलेले त्यांचे ते व्हेजीटेरियन जेवण शेवटी आले. आमच्या व्हेजीटेरियन मेनुमध्ये इतर पदार्थांबरोबर गुरगुट्या भात आणि त्यावर एका पालेभाजीचे तुकडे असा ’बेत’ होता. पालेभाजीस फारसा अर्थ नव्हता. येथे अर्थ हा शब्द ’बेचव’ असा घ्यावा. मात्र चायना एयरलाईन असल्याने आणि ’हिंदी चिनी भाई भाई’ ह्या भारतीय घोषणेमुळे माझे मन (वास्तविकत: कांहीही कारण नसतांना म्हणजे अकारणच-नको त्यावेळी पुळका येवुन) भरुन आले आणि असा दुरवरचा विचार करुन, केवळ ’त्यांच्या’ भावना दुखावल्या जाऊ नये म्हणुन बेचव हा मला हवा असलेला शब्द वापरण्याचा मोह टाळला आहे हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आले असेलच! पालेभाजी आणि भात हे खाणे कितीही Healthy असले तरी वर्षानुवर्षे घृतकल्ल्या मधुकल्ल्या खाणा-या जीवाला हे ’पचनी’ पडणे तसे कठीणच! साबुदाण्याची गरमागरम खिचडी अथवा पोहे, त्याच्या बरोबर ताज्या लिंबाची फोड, त्यावर किसलेले खोबरे, सोबत ताक अथवा दही असे खायला सरावलेली आमची जिव्हा! (तरुणपणी सायीचे दही, त्यानंतर व्हिटॅमिन डी दुधाचे दही, त्यानंतर २ % आणि त्यानंतर १% असा आमचा प्रवास आता Non Fat दह्यापर्यंत आला आहे! काय हा दैवदुर्विलास!) अहो साध्या रोजच्या सीरियलमध्ये देखील साखरेच्या ऐवजी मध, मस्तपैकी व्हिटॅमिन डी दुध, त्यावर अक्रोडाचे व जमल्यास एखाद्या फळाचेही तुकडे भरभरुन टाकलेले, असे व्यवस्थित खाण्याची संवय असलेल्या आमच्या जिभेला खरं तर तो गुर्गुट्या भात आणि त्या पालेभाजीचा रागच आला होता. पण दुसरा पर्याय नसल्याने मी तो पदार्थ खायला सुरुवातही केली होती. पण ते खाणे आमच्या खाण्यांत तरबेज असलेल्या जिभेस जमेल असे वाटेना!


पण एव्हढ्या तेव्हढ्याने निराश होण्याची आमच्या आयुष्याला संवय नव्हती! कच-यातुन कला निर्माण करणा-या आमच्या मराठी मनाला ह्या ईवल्याश्या गोष्टीमुळे खचुन जायचे कारणच नव्हते. आता काय बरे करता येईल? असा विचार करीत ग्लासमध्ये ओतलेल्या डिनर वाईनचा घुटका घेत असतांना मी माझ्या स्वयंपाकांत पारंगत असलेल्या पत्नीकडे पाहिले. तिने तर तिच्या ’कामाला’ सुरुवातही केलेली होती! हलक्या हाताने (म्हणजे चमच्याने) तिने ती भातावरची पालेभाजी काढुन टाकली होती, त्यावर कॉफीबरोबर दिलेले त्रिकोणी डब्यांतले क्रीम रिकामे केले होते, कॉफीबरोबरच आलेल्या साखरेच्या पुड्याही त्यावर ओतल्या होत्या, ते मस्तपैकी हलवुन ती दुध, भात साखर हे Combination कोणतीही तक्रार न करता मिटक्या मारीत मारीत मटकावीत होती. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच ऊजळला होता आणि ’तुला तो भात आवडत नसेल तर मला दे’ असेही ’गोड’ आवाहन ती करीत होती. त्यामुळे माझा पालेभाजी-भात खाऊ न शकणारा आंबट चेहरा अधिकच केविलवाणा दिसु लागला! आहे त्या परिस्थितीला ’तोंड’ देण्याची आयुष्यभराची संवय आमच्या दोघांच्याही हांकेला धांवुन आली होती. आणि हे एव्हढ्यावर थांबले असते तरी ठीक होते. परंतु एखादा वीर रणांगणांतल्या पुढच्या फळीला तोंड दिल्यानंतर आता काय बरे करता येईल? असा विचार करीत पुढे सरसावतो नि चालुन जातो, तसा मी देखील विचार केला. (हम भी कुछ कम नही है!) मी ब्रेड घेतला, त्याला भरपुर बटर लावले आणि तो कॉफीत बुडवुन (कुणी आपल्याकडे पाहात तर नाही ना? ) असे हेरुन, खाल्ला देखील. डीनर ट्रेमध्ये मिळालेल्या आख्खया ब्रेडचा फडशा मोठ्या समाधानाने पाडला. एरव्ही त्या ट्रे मधले अर्धे पदार्थ जरी संपले असते तरी मला बरे वाटले असते तो ट्रे, मी संपुर्णपणे रिकामा केला होता. (अर्थात माझा भात मी सौभाग्यवतीस दिला हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आले असेलच) आता त्यांत फक्त रिकाम्या वाट्या त्या फक्त ऊरल्या. अशा रितीने अडचणींवर मात करुन "आहे त्याचे सोने" करण्याची आयुष्यभरामधली संवयच शेवटी कामी आली. मला अजुनही वाटतं की विश्वामित्राला भुकेमुळे कुत्र्याची तंगडी खावुन जीव वांचवावा लागला त्यावेळी तो पुटपुटला असेल "च्यामारी, ह्या तंगडीला अजिबात चव म्हणुन नाही) आणि तेव्हां त्याने जवळपासच्या शेतांतली हिरवी मिरची चवीला म्हणुन नक्कीच वापरली असावी. अखेर आम्ही भारतीय. आम्ही सारे खवय्ये नाही कां?













बाकी विमानामधली हवाई सुंद-यांची सेवा ही मात्र अगदी वाखाणण्याजोगी होती. ह्या सर्व मुली चुणचुणीत, तरतरीत, हंसतमुख, आणि वेगाने हालचाली करणा-या होत्या. (या मुली आमच्या भारतीय विमानकंपनीत कां नाही काम करीत बरे?) विमानामध्ये ५१५ प्रवासी होते आणि एकही जागा रिकामी नव्हती. त्या सर्व लोकांना एक तासाच्या आंत जेवण पुरवुन, जेवणानंतर रिकामे झालेले ट्रे ऊचलुन, त्या Second Serving साठी आणि चहा कॉफी द्यायला येत होत्या. आणि हे सारे करतांना चेह-यावर कोणत्याही प्रकारचा कंटाळा नव्हता. एव्हढे सारे होवुन दोन तीन तासांनी त्या स्वत:हुन पाणी आणुन देत होत्या त्यावेळी त्यांचे टवटवीत चेहरे पाहिले की वाटायचे कोणत्या देवाने ह्यांना घडविले आहे. कोणत्या मातीत ही सारी वाढली आहेत! त्या सर्व चिनी असल्याने त्यांचे डोळे मिचमिचे असले तरी त्या हरीणाक्षी होत्या. डोळे घारे नसल्याने विश्वसनीयही वाटत होत्या! आपल्या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भारतीय विमानाच्या सेविकांना (माफ करा, मी ’हवाई सुंद-यांना’ हा शब्द वापरु शकलो नाही त्याबद्दल वाचकांची क्षमा मागतो) ह्यांच्याकडे प्रशिक्षण देवुन मगच कामाला लावावे अशी सुचना आपल्या आंतरराष्ट्रीय भारतीय विमानकंपनीस करावी की काय असा मोह निर्माण झाला. आपल्याकडे चार लोकांची डीनर पार्टी झाल्यानंतर "थकले ग बाई हा पसारा आवरुन! आता जरा दोन मिनिटे पडते" असं म्हणणा-या (म्हणजे घरातला ’पुरुष मदत नाही करत?) कांही भगिनींना हाताशी घेवुन, एखादा Air Hostesses Training Business Plan develop केला तर तो नक्की यशस्वी होईल असं वाटतं.




       
                                                                हो चि मिन्ह --एअर पोर्ट




हो चि मिन्ह (सायगांव) शहरांत आगमन

जवळ जवळ तेरा तासानंतर आम्ही हो चि मिन्ह ह्या विमानतळावर पोहोचलो. पुर्वी ’सायगांव’ ह्या नांवाने ओळखले जाणारे हे शहर. हो चि मिन्ह ह्या व्हिएतनामच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कृतज्ञतेसाठी ठेवण्यात आले आहे. टूर कंपनीची व्हिएतनामी मुलगी आमच्या स्वागतास हजर होतीच. तिचे शब्दोच्चार फारसे कळत नसल्याने तेच तेच प्रश्न दोन तीन वेळां विचारावे लागत असत. ती मात्र कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त न करता, किंबहुना त्याच ऊत्साहात त्या प्रश्नांची तीच ऊत्तरे हंसतमुखाने देण्याचा यत्न करीत होती. विमानतळाच्या बाहेर येताच पहिली गोष्ट जाणविली ती ही की हवेत खुप ऊष्मा आहे. त्यांत आपल्याकडे भारतात असते तशी Hunidity! त्यामुळे दरदरुन घाम यायला सुरुवात झाली. क्षणभर आपण मुंबईतच आलो आहोत की काय असे वाटु लागले. टूर कंपनीच्या गाडीत जावुन बसलो आणि त्यांनी थंड केलेल्या त्या गाडीमध्ये बसल्यावर हायसे वाटले. आमची बस Royal Lotus नांवाच्या हॉटेलकडे जावु लागली. वास्तविक विमानतळापासुन हॉटेल केवळ आठ दहा किलोमीटर अंतरावरच होते, तरी रस्त्यावरच्या गर्दीमुळे पोहोचायला अर्धा तास सहज लागला. रस्त्यांत इतकी घावुक प्रमाणांतली गर्दी डोंबिवली नंतर प्रथमच पाहिली. (होय, आपण बरोबर ऒळखलेत, मी डोंबिवलाचाच). रस्यांवर मोटारगाड्यांपेक्षा मोटार सायकलीच अधिक प्रमाणांत होत्या. त्यामुळे रस्त्यावरील ऊजव्या बाजुची शेवटची लेन केवळ मोटार सायकलींसाठीच राखुन ठेवलेली दिसली. गाड्या काय अथवा मोटारसायकली काय, ही वाहने चालविणारे सिग्नलपाशी थांबतीलच हा कायदा कुणी फारसा पाळत नव्हते. (अरे म्हणजे आमच्या डोंबिवलीसारखेच) आमचा बस ड्रायव्हर मात्र स्थितप्रज्ञाच्या भुमिकेतुन शांतपणे आपली बस त्या सर्व गर्दीत व्यवस्थित चालवित होता. लॉस एंजेलिसमध्ये गेल्या ४० वर्षांत असे दृश्य दिसले नसल्याने ते सारे "अनाकलनीय" वाटले. (परत एकदा मायदेशाची आठवण!) एव्हढ्या मोटारसायकली कशा? ह्या प्रश्नाच्या चौकशी अंती कळले की, मोटारगाड्यांवर १२०% टक्के कर असल्याने सर्वसाधारण व्यक्तीस मोटारगाडी ठेवणे परवडत नाही. त्यामानाने लहान मोटार सायकलींवर कर थोडा आहे. शिवाय त्यांचा आवाजही ईकडच्या म्हणजे अमेरिकेतल्या मोटारसायकलींच्या मानाने खुपच लहान आहे. मात्र हार्ली डेव्हिडसनसारख्या मोठ्या मोटारसायकलींवरही भरपुर कर ठेवुन ती लोकांना परवडेनाशी करुन ठेवली आहे, त्यामुळे तशा मोटारसायकली कुठेच दिसल्या नाहीत. मात्र पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने फूटपाथवरच पार्किंग केले जाते आणि त्यामुळे फूटपाथवरुन चालणे केवळ अशक्यच झाले होते. त्यांतच रस्तोरस्ती जवळ जवळ प्रत्येक फूटपाथवर एका कोप-यांत स्टोव्ह टाकुन खाजगी ढाबे टाकलेले आहेत आणि जागा मिळेल तिथे छोट्या खुर्च्या टाकुन लोक रस्त्याच्या बाजुलाच बसुन खातांना दिसले. एव्हढ्या गरमीमध्ये त्यांचे व्यवहार "रोज मरे त्याला कोण रडे?" अशा वृत्तीनेच जणु चालत होते.






                                                                हो चि मिन्ह शहर 


ह्या प्रथम दर्शनी दृश्यांतुन सांवरता सांवरता आमचे हॉटेल आले. हॉटेल चार स्टार आहे असे कळल्याने आमच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. आणि खरोखरच त्या पुर्ण झाल्या. अगदी पहिली जाणवलेली गोष्ट म्हणजे, आमच्या बसमधुन सर्व प्रवासी खाली ऊतरायच्या आंत हॉटेलचा सेवक वर्ग आमच्या बसच्या खालच्या भागांत ठेवलेल्या बॅगा घेवुन लॉबीत पोहोचले देखील होते. क्या बात है! गलथानपणाचा मागमुसही कुठे नव्हता! अमेरिकेत देखील इतकी Efficiency क्वचितच पहायला मिळते! आम्ही हॉटेलच्या प्रवेशदाराशी पोहोचताच दोन सेवकांनी त्या हॉटेलची दोन्ही भव्य द्वारे ऊघडुन आमचा प्रवेश सस्मित चेह-याने स्वागतार्ह केला. एखाद्या राजाच्या वा राणीच्या दरबारांतल्या आगमनासाठी त्यांचे सेवक बहुधा अशीच दारे ऊघडत असतील. हॉटेलच्या -Registration Desk वर आमचे पासपोर्टस दाखवुन त्यांनी केवळ मिनिटभराच्या आतच त्यांच्या Formalities पुर्ण केल्या आणि तेव्हढ्या वेळांत फळांचा थंडगार ज्युस देवुन आम्हास लॉबीत बसविले. आम्ही हॉटेलमध्ये सकाळी अकराचे सुमारास पोहोचलो असल्याने आमच्या खोल्या तयार नव्हत्या. मात्र आम्ही प्रवासांतुन थकुन आलेलो आहोत ह्याची जाणीव त्यांना असलेली स्पष्ट दिसत होती. आम्ही ५-१० मिनिटांत तुमची खोली तयार करतो म्हणजे लांबच्या प्रवासांतुन आल्यामुळे तुम्हाला विश्रांती मिळेल असे आश्वासनपुरक सांगुन त्यांनी आम्हास लागलीच खोल्या दिल्या आणि आम्ही घरातुन निघाल्यानंतर जवळ जवळ २४ तासांनी विश्रांतीसाठी खोलीत पाय ठेवला. ह्या सर्व प्रसंगातुन त्या सेवकांची सेवावृती अगदी स्पष्टपणे दृष्टीस पडली.


शहराचे पहिले दर्शन

-४ तासांची विश्रांती घेतल्यावर मात्र खुप फ़्रेश वाटले. आंघोळ आटोपली आणि हो चि मिन्ह शहराचे पहिले वहिले दर्शन घेण्यासाठी आम्ही पायी पायीच फेर फटका करावयास बाहेर पडलो. आता हवेतील ऊष्मा देखील थोडा कमी झाला होता. हॉटेलच्या बाहेर पडल्यावर पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे हॉटेलचे दृश्य वेगळे आणि रस्त्यावरचे वेगळे. रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या फुटपाथवर सर्रास ढाबे टाकलेले होते. जागा कमी असल्याने छोटेसेच टेबल आणि लहान मुलांच्यासाठी असतात तशा बसायला खुर्च्या होत्या. त्यावर विराजमान होवुन कामकरी मंडळी संध्याकाळचे डीनर घेण्यात मग्न होती. डीनर बरोबर कसलेसे रंगीत द्रव्यही ते पीत होते. बहुधा सोडा असावा. ढाब्याची मालकीणबाई स्टोववर नूडलसारखा एखादा पदार्थ शिजवित होती आणि गरमागरम असा त्या लोकांना वाढत होती. भुकेने व्याकुळ झालेले ते कामकरी एकाग्र चित्ताने त्याचा समाचार घेत होते. "अन्न हे पुर्णब्रम्ह" हा भाव त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. शेवटी जगांत कुठेही जा, जगण्याची धडपड सारीकडे सारखीच! रस्त्यावर जेवायला लागणारी ती मंडळी मात्र मला आनंदी वाटली. दरिद्री अथवा गरीब अशी ती मंडळी, पण दु:ख्खाचा, अथवा रडकेपणाचा लवलेशही कुठे नव्हता. मुख्य म्हणजे एकही भिकारी नव्हता. किंबहुना आमच्या पुढील बारा दिवसांत मला एकही भिकारी दिसला नाही. चालत चालत आम्ही मैलभर पुढे गेलो. एका बाजुला ऊंच ईमारती, त्यातुन कामे आटोपुन बाहेर पडणारी सुटाबुटांतली कर्मचारी मंडळी तर त्याच ईमारतीच्या पायथ्याशी गरीबीचे असे हृदयद्रावक दर्शन! जणु कांही "आमच्याकडचे हे दृश्य जगांत जे कांही चालले आहे त्यापेक्षा वेगळे नाही" असंच त्यांना सांगायचे आहे की काय असा मला भास झाला.



                             फुटपाथ  ढाबे 









थोड्या वेळाने आम्ही हॉटेलमध्ये परत आलो. परत शिरतांना राजाच्या दरबारांत स्वागत व्हावे तसे झालेच. हे हॉटेल सोडेपर्यंत आम्ही नक्कीच ह्या लक्झरीला सोडु शकणार नाही ह्याची खात्री पटली. म्हणजे तसेच झाले. हॉटेलमध्ये शिरतांना ते दोन सेवक ईतक्या अदबीने दार ऊघडीत असत की त्यांनी ते ऊघडल्याशिवाय आम्हाला आंत पायच टाकावासा वाटेना! आणि ती संवय आम्हाला ईतकी लागली की एकदा एका बाईने त्या दोन सेवकांना दार ऊघडायला थोडा ऊशिर झाला म्हणुन त्यांनी ते ऊघडॆपर्यंत प्रवेशच केला नाही.( अरेच्चा, ही तर आमची धर्मपत्नी!) असो.


दुस-या दिवशी भल्या सकाळीच ईतिहास घडविणा-या एका जगप्रसिद्ध ठिकाणास भेट द्यायची होती. त्यामुळे आज रात्री लवकर झोपणे आवश्यक होते. बरोबरीच्या मित्र मंडळींनी ड्रिंक घ्यायला जायचे ठरविले. माझ्या शरिरात मात्र आता अजिबात त्राण ऊरले नव्हते. गेल्या २४ तासातला मोठा प्रवास आणि वेळेमधला १३ तासांचा फरक "आता तु चक्क झोपायला जा" असा आदेश माझ्या शरीराला देत होता. निसर्गाचे ऐकावे की आपले भले होते हा कुणीतरी दिलेला ऊपदेश आठवुन मी अंथरुणावर पडलो आणि केवळ मिनिटाच्या आंत निद्राधीन झालो.


ऐतिहासिक स्थळास भेट (कुची टनेल)







                     कुची टनेल नकाशा आणि मार्ग 


रात्रीची झोप खुप छान झाली त्यामुळे सकाळी मोठ्या ऊत्साहाने ऊठुन तयारी केली. आज आम्ही कुची टनेल ह्या ऐतिहासिक स्थळाला भेट देणार होतो. सायगांव शहरापासुन अवघ्या ५०-६० किलोमीटर अंतरावर असलेले हे जवळ जवळ २०० किलोमीटर लांबीचे जमिनीखाली "उकरलेले" बोगदे म्हणजे मानवाचे स्व-संरक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न! एक नाही दोन नाही तर २१ वर्षांच्यावर चाललेल्या फ़्रेंच-व्हिएतनाम-अमेरिका युद्धांत हे सर्व सामान्य जनतेच्या बचावासाठी वापरले गेले. ते तयार करण्याची बुद्धी, त्याचे डिझाईन, त्यास वापरलेली हुशारी ह्या सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच! जनतेच्या बचावासाठी, त्यांना शत्रुच्या भडिमारापासुन दुर ठेवण्यासाठी खेड्यापाड्यांतुन बनविलेल्या हत्यारांपासुन सर्व साधारण माणसांनी हे २०० किलोमीटर लांबीचे बोगदे अक्षरश: ऊकरुन काढले होते. एक मध्यम अंगकाष्टीची व्यक्ती कशीबशी आंत जाईल एव्हढीच त्याची लांबी-रुंदी! एकदा आंत गेल्यानंतर घुस (अथवा गोफर ) जसे आपले मार्ग कोरुन कोरुन तयार करुन पुढे सरकतात तशी या लोकांनी केलेली बोगद्याची जमिनीखालची रांग! आंतमध्ये गेल्यावर हवा नाही, पाणी नाही अशा परिस्थितीत तासनतास पडुन राहायचे, गुदमरुन अथवा बिळातले विषारी साप वगैरे चावुन मृत्यु झाला नाही तर केव्हांतरी शत्रुचा मारा कमी झाला की श्वास घेण्यासाठी बाहेर यायचे आणि तेव्हढ्यांत शत्रुचा मारा होवुन जीवंत राहिल्यास परत आंत घुसायचे! जगण्यासाठी करावी लागलेली केव्हढी ही धडपड! आणि असा प्रकार अनेक वर्षे चाललेला! आजुबाजुची परिस्थिती आपल्याला घडवते असं म्हणतात. व्हिएतनामची आजची पिढी जी आज दिसते आहे ती ह्या दिव्यांतुन गेलेली आहे.




                             कुची टनेल


माणुसकीवरचा त्यांचा विश्वास अगदी पुर्णपणे गेला असता तरी नवल नव्हते. पण आजचे दृश्य निराळेच आहे, मला दिसलेले व्हिएतनाम, त्यातील माणसे ही सहिष्णु, सहनशील, मित्रत्वाचा हात पुढे करणारी, हंसतमुख, आणि आयुष्यावर प्रेम करणारी वाटली. केवळ दोन आठवड्यांत तयार केलेले हे मत थोडे घाईघाईने बनविलेले आहे ही शक्यता मी नाकारत नाही. मात्र "मुलाचे पाय पळण्यांत दिसतात" ही म्हण आयुष्यभर शिकलेल्या, वयाची सत्तरी ओलांडतांना "" म्ह्णता तपेले ओळखण्याची आपल्या प्रत्येकाची कुवत तेव्हढी कुचकामी नसते. त्यामुळे वरील लिहिण्यांत आणि व्हिएतनामी मंडळींची ओळख पटवितांना सत्यस्थितीपासुन मी फारसा दुर गेलो नाही असे नम्रपणे वाटते. हे सारे बोगदे पाहातांना पावसाची संतत धार चालुच होती. तशा पावसांतही आम्ही ते बोगदे पाहात होतो. खरे तर त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीची अधिक जाण आली आणि सतत २१ वर्षे त्यामध्ये लपणारे लोक कशा कशातुन गेले असतील याची पुसटशी का होईना पण कल्पना आली.





                                   युद्ध तय्यारी आणि नीती ( कुची टनेल नकाशा ) 




स्वातत्र्यासाठी प्रत्येक देशाला कांहीना कांही त्याग करावाच लागतो. त्याला व्हिएतनामही अपवाद नव्हते! फ़्रेंचाबरोबर झालेल्या १९४६ ते १९५४ च्या काळांत ही भुयारे तयार केली गेली आणि प्रथम वापरण्यांत आली. हीच भुयारे परत १९६८ च्या युद्धांत वापरली जातील ह्याची त्यांना कल्पनाच नसावी. कांही विशिष्ठ खोलीवर गेल्यावर ती एकमेकांना जोडली होती. शत्रुसैन्य त्यामध्ये घुसलेच तर फक्त एका सैनिकास शिरता येईल एव्हढीच त्या भुयाराची व्याप्ती होती. आणि शत्रु त्यांत शिरलाच तर तो जीवंत परत जाणार नाही ह्याच्या योजनाही त्यांत होत्या. खेडेगांवातील लोहाराकडुन तयार करवुन घेतलेल्या मिनी फावड्याने खणायचे आणि बांबुच्या विणलेल्या आपल्या धान्याच्या सुपासारख्या पात्रातुन खणलेली माती वाहायची! शत्रुसाठी तयार केलेले सांपळे देखील बांबु तासुन, अथवा झाडाच्या फांद्यापासुन तयार केलेले. निसर्गाने दिलेले प्राण त्याच्याच सहाय्याने खर्च करण्याची संकल्पना!






                          कुची टनेल मार्ग 



त्या रणभुमीत आयुधे तयार करण्याचे ठिकाण, जखमी सैनिकांना मलमपट्टी वा दवापाणी करण्याचे भुयार, स्वयंपाक करता यावा असे भुयार, तात्पुरती विश्रांती घ्यायचे भुयार अशा सर्व गोष्टी अगदी विचारपुर्वक संकल्पिलेल्या होत्या.


मात्र भुयारांत दिवसेंदिवस लपुन राहात असलेले रहिवासी जीवंत राहातीलच ही शाश्वती नव्हती. अपु-या हवेमुळे मृत्युमुखी पडणारांचे प्रमाण बरेच मोठे होते. मधुन मधुन विषारी प्राण्यांच्या दंशानेही लोक मृत्यु पावतच होते. पुरेशी हवा नाही आणि पुरेसे अन्न अथवा पाणी नाही ह्यांचा परिणाम म्हणुन बरेचसे रहिवासी म्रुत्युमुखी पडले. ह्या सा-या परिस्थितीला तोंड देत देत व्हिएतनामने २१ वर्षे लढा दिला आणि आपले स्वातंत्र्य टिकवुन त्याची किंमत दिली."रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले?" हे तत्व जगांतल्या प्रत्येक देशाला लागु पडते. पारतंत्र्याचा दुर्धर रोग बरा व्हायचा असेल तर त्याला जीवानिशी लढा हेच जालीम औषध आहे आणि ते द्यावयाच्या ऐवजी अहिंसा नामक नपुसक-तत्वाच्या औषधाचे सोयिस्कर डोस पाजतांना त्याचा साईड इफ़ेक्ट जनतेला षंढत्वाकडे नेतो हा दुरदर्शी विचार ह्या देशाने अगदी डोळसपणाने केला. तो मार्ग त्यांनी न अंगिकारता ’मरु अथवा मारु’ असा सावरकरप्रणित मंत्र ऊच्चारला म्हणुनच आज व्हिएतनाम स्वातंत्र्याची एव्हढी मोठी किंमत चुकवुनही स्वतंत्रतेने मान ताठ करुन जगतो आहे. ईतिहास घडविणा-या त्या जागेला मला माझ्या आयुष्यांत भेट द्यायला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. ही सर्व माहिती देणारी बाई त्याच युद्धांत जबर जखमी होवुन हातपाय गमाविलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी होती. त्या युद्धाचा तिच्या आयुष्यावर आणि कुटुंबावर झालेला दुष्परिणाम आम्ही स्वत: डोळ्यांनी पाहात होतो आणि अनुभवित होतो. बाप अशा रितीने जायबंदी झाल्यावर तिची आईच तिचा बाप आणि आईच तिची आई होती.

नुसती युद्धाची जागा पाहुन माझ्या मनाची ही परिस्थिती झाली होती, मग अशा वातावरणांत व्हिएतनामी जनतेने २१ वर्षे कशी काढली असतील? ह्या सर्व विचारांमुळे मन सुन्न झाले होते. तशाच स्थितीत आम्ही हॉटेलवर परतलो. वातावरणांत का कोण जाणे पण एक प्रकारचे औदासिन्य पसरले होते! वादळी पावुस थांबण्याचे चिन्ह दिसत नव्हते! त्या वादळांत मनाचे वादळ केव्हांच मिसळुन गेले होते! त्या बाईचे एक वाक्य माझ्या काळजाला सारखे भिडत होते: " After the war we just did not have time to cry? The urgent need was to pull ourselves together as quickly as we could."



नकळत माझ्या मनांत ह्या दोन ओळी आल्या:


दु:ख्ख करण्यास आता आंसवांना वेळ नाही!
दोन आंसु ठिबकले, त्यांना पुसाया वेळ नाही!


सायगांव म्हणजेच हो चि मिन्ह!




                              हो चि मिन्ह



व्हिएतनामला लाभलेला खंबीर नेता म्हणजे हो चि मिन्ह! ह्या नेत्याच्या नेतृत्वाखाली देशाचा जो कायापालट झाला त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनतेने सायगांव शहराचे परत बारसे केले आणि त्याला हो चि मिन्ह हे नांव दिले. (आपल्याकडे औरंगाबादचे नांव ’संभाजीनगर" केले तर कांही विशिष्ट लोकांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे विचार जनतेच्या मनांत भरवुन त्यांचे षंढत्व पिढ्यानपिढ्या टिकुन राहील अशी व्यवस्था राजकारणी करीत आहेत!) सर्व शहरभर दाढीवाल्या मिन्ह काकांचे फोटोंचे मोठ मोठाले बोर्ड-आणि हो महत्वाचे सांगायचे राहिलेच, की त्या बोर्डांवर देशांतील कविंनी अथवा साहित्यिकांनी लिहिलेल्या कवितांच्या ओळी वा सुविचरांची राखण करणारी वचनेही लिहिली आहेत! नितीतत्वांचे आचरण शिकविणारी साहित्य सुमने! आणि तीही भर रस्त्यावर? ह्या व्हिएतनामी मंडळींना झाले आहे तरी काय? हे काय भलतेच!


साहित्य संमेलनासाठी वर्षभरांतुन एकदां एखादी लहानशी देणगी दिली (आणि त्यासाठीही चार अटी टाकल्या ) की आपली ईतिकर्तव्यता संपली असं मानणा-या वैचारिकतेचा बडेजाव कुठे आणि देशांतील तरुण पीढीला, देशवासियांना आयुष्याला-मनाला-बुद्धीला आवश्यक असलेला ऊत्तेजनात्मक संदेश ऊघडपणे देवुन देशभर केलेला आपल्याच साहित्यिकांचा ऊघड सत्कार कुठे? साहित्यामध्ये पहिले नोबेल पारितोषिक भारतास मिळवुन देणा-या रविंद्रनाथ टागोरांची आठवण देखील ज्या देशास येत नाही त्या आमच्या देशाची धन्य होय! आम्ही फक्त आमची संस्कृती किती अगाध आहे असं छाती बडवुन सांगु, डांगोराही पिटू, (कारण ते करण्यांत आमचा हात कुणीही धरु शकत नाही) पण आपल्या देशांतील साहित्यिकांना देशभर अशा रीतिने रंगमंचावर स्थान देवुन, तरुण पीढीपुढे सतत आठवणींसाठी ह्री वचने ठेवुन ख-या संस्कृतीचे पालन करणा-या, सर्व साधारण नागरिकाला असा शुरत्वाचा संदेश देणा-या ह्या गरीब व्हिएतनामला मात्र हजार कुर्निसात करुनच सन्मानित करावे लागेल.


प्रत्येक शहराचे असे एक व्यक्तीमत्व असते. हो चि मिन्ह्चे व्यक्तीमत्व रस्त्याच्या बाजुला टाकलेल्या, कामगारांना गरमागरम अन्न पुरविणा-या टप-या, त्याच्या बाजुला बसुन आनंदाने "अन्न हे पुर्णब्रम्ह" म्हणुन पोटभर जेवणारे कामगार, भाजीची कावड घेवुन दारोदारी भाजी आणि फळे विकणारे विक्रेते, मुलांपासुन ते म्हाता-या कोता-यापर्यंत आणि तरुणापासुन ते भाजीविक्रेत्यापर्यंत सारे जण तिथे एकत्र येतात, जेवतात, सुख दु:ख्खाच्या गप्पा मारतात आणि अगदी आपल्याला जणु लॉटरीच लागली आहे असा भाव नसला तरी खुप आनंदित असतात. त्यांच्या चेह-यावरचा आनंद हा पोटोबा भरल्यामुले असतो की हा त्यांचा स्वभावधर्मच आहे हे कळायला फारसा मार्ग नव्हता!? कांहीही कारण नसतांना "जगाची जबाबदारी केवळ आपल्यावरच आहे" असं समजुन, आहे तोही आनंद घालविणा-यांना हा बदल स्वागतार्हच वाटावा. त्यांच्या आयुष्याचे तत्वज्ञान तरी कोणते? मला वाटते ते असेच असावे.




                              भाजीची कावड 




सुख सामोरीच आहे, त्याच्या स्वागतास जावे, दु:ख्ख घेवुन ऊराशी, वृथा कां हो ऊगाळावे?






                    गरमागरम अन्न पुरविणा-या टप-या







एव्हढी मरणप्राय लढाई खेळुन, मोठी किंमत मोजुन पीढ्यान पीढ्या खच्ची झालेल्या हा व्हिएतनामी मंडळींच्या मनाला दु:ख्खाची झालरच नाही असं कोण म्हणेल? मात्र ती चेह-यावर न दाखविता रोजची दिनचर्या, आहे त्यांत समाधान मानुन जगण्याचा जणु विडाच त्यांनी ऊचलला आहे असं वाटलं. हॉटेलांत जा, अथवा किराणा दुकानांत, भाजीवालीशी बोला वा बियर बारमधल्या नोकराशी बोला, सारे कसे सेवावृत्तीने भारलेले वाटले. कोणत्या मातीत ही सारी बनविली गेलेली माणसे आहेत? कोणत्या देवाने ह्यांना घडविले आहे? जगण्याची अविरत धडपड जगांतली सारेच करतात आणि ते अपरिहार्यही आहे. मात्र आयुष्याच्या खडकाळ जमिनीवरुन चालतांना, क्षितिजाकडे लक्ष ठेवुन ईंद्रधनुष्याची कमान कुठपर्यंत पोहोचली आहे त्या सौंदर्याचा मागोवा घेत घेत चालत राहाण्यांत जी मजा आहे, ती घेण्याची मुभा फक्त संकटांना तोंड देणा-यांनाच असते. ईतर ते ईंद्रधनुष्य केवळ ’पाहातात’, पण त्यांचा आनंद क्षणभरच आलेल्या पावसाच्या सरीने आणलेल्या ईंद्रधनुच्या कमानीपर्यंतच मर्यादित असतो. सर संपली की ईंद्रधनुष्यही जाते आणि ते कुठे गेले कुठे गेले असा छाती पिटणारा शोकच त्यांच्या वाटेला येतो. शेवटी धनार्जन काय अथवा अशा प्रकारचे आनंदार्जन काय, ते असे कष्ट करुनच मिळवावे लागते हे तर खरेच परंतु अशाही परिस्थितीत "आपण कशासाठी जगतो आहोत" ह्या संवेदनेचा विचार घट्ट पकडुन आशेचे ईंद्रधनुष्य दिसावे म्हणुन पावसाच्या सरी शोधण्यांतही असतो.




                                                                       भाजी विक्रेती


मात्र ह्या शहरांत सारेच कांही कौतुकास्पद नाही. पादचा-यांसाठी एक अतिशय मोठी नकारात्मक गोष्ट म्हणजे ह्या शहरांतले फुटपाथ अन्नाच्या ढाब्यांनी आणि मोटार सायकली पार्क करणा-यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे फुटपाथवरील पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. आधीच वाहनांची संख्या अधिक, त्यांत त्या बिचा-यांना वाहने चुकवित चुकवितच चालावे लागते. त्यांत कधी कधी लहान मुलांचाही समावेश असतो. सकारात्मक गोष्ट सांगायची तर एकही भिकारी दिसला नाही. देश कम्युनिस्ट आहे म्हणुन म्हणा अथवा भीक मागणे हा गुन्हा आहे अशा वैचारिकतेने भारल्यामुळे म्हणा पण आपल्याकडे (म्हणजे भारतांत, आणी आजकाल अमेरिकेत देखील) गल्लोगल्ली दिसतात तसे ’भिकारडे’ दृश्य येथे नाही.




                                                             फुटपाथवर थाटलेली ढाबे



                                वाहने 



भौगोलिक दृष्टीतुन पाहिल्यास हा गांव आणि संपुर्ण देशच आंतुन बाहेरुन सुंदर आहे. गांवाच्या प्रवेशद्वारापासुन ते गांव संपेपर्यंत सारीकडे फुलांचे ताटवे, छानपैकी कापलेले वृक्ष आणि सुंदर बागा, आणी त्या सौंदर्याची पुजा अधिकतम वाढविण्यासाठी मन:शांती देणारी ठिकठिकाणी बांधलेली बुद्ध मंदिरे! प्रत्येक घरासमोर , मग ते हॉटेल असो वा राहाण्याचे ठिकाण, कोणत्याही वास्तुच्या प्रवेशालाच देव्हारा, त्यांत ऊदबत्त्या, वाहिलेली ताजी फुले असे छानपैकी धार्मिक वातावरण! माझ्या लहानपणचे मला आठवते. मी बाहेरुन आलो की माझी आजी "हातपाय घुवुन मगच घरांत ये" अशी सक्त ताकीद देत असायची, आणि सर्व प्रथम देवाला नमस्कार करायला लावायची. ह्याची का कोण जाणे पण अचानक आठवण आली. त्यावेळी जसे प्रसन्न वाटायचे, तसेच कांहीसे मला हे देव्हारे पाहुन वाटले. आणि त्या देव्हा-यांत देव तरी कोणता आहे म्हणुन चौकशी केली तर त्यांत वास्तुपुरुषाची स्थापना केली आहे हे कळले तेव्हा तर खरोखरच खुप आश्चर्य वाटले. धर्माच्या अधिष्ठानावरच श्रद्धेचा कळस ऊभा असतो, भारतांत आपल्याकडे असलेल्या वास्तुपुरुषाची पुजा करुन गृहशांती करणा-या संकल्पनेचा आणि संस्कृतीचाच हा एक भाग आहे असे वाटले. भारतापासुन हजारो मैल दुर असणा-या ह्या देशांत असणा-या आपल्यासारख्याच सम विचारांची, श्रद्धास्थानांची आणि कांही अंशी समान विचारांची बैठक कशी बरे तयार झाली असेल? त्यांच्या म्युझियममध्ये रामायण, महाभारत ह्यावर चित्रे कां असतील? त्यांच्या वाद्द्यांमध्ये चिपळ्या आणि झांजा अशा प्रकारची वाद्द्ये कशी बरं आली असतील? आम्ही त्यांच्या लोकल बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येक वेळी तरुण लोकांनी स्वत:ची जागा आपणहुन सीनियर लोकांना कां बरे दिली असेल? कुठेतरी भारतीयांचे आणि व्हिएतनामी मंडळींचे लागे-बांधे नक्कीच जमत असले पाहिजे. संगीताच्या मैफिलीत, द्वंद्वगीतातील दोन गाणा-या व्यक्ती एकाच वेळी पुर्वनियोजनाशिवाय एखादी तान अगदी जशीच्या तशी घेतात आणि जेव्हां समेवर येतात आणि त्यावेळी त्यांना जसे एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते तशा कांहीशा मनाच्या जुळलेल्या अवस्थेत आणि विचारांतच आम्ही ह्या शहराचा जड मनाने निरोप घेतला!


खेड्यांतील ऊद्द्योगधंदे आणि माणुसकी!











                                                                     खेडे ( Hoi An )


आमचा पुढचा मुक्काम Hoi An नांवाच्या गांवी होता. तेथुन एका खेड्यांत आधी बोटीने आणि नंतर पायी चालणे असा हा कार्यक्रम होता. कोणत्याही देशांत शहरी संस्कृती निराळी आणि खेड्यांतील निराळी. मला वाटतं की खेड्यांतील संस्कृती ही शहराच्या तुलनेने बरीचशी मुळ प्रकारची असते. त्यांना ’बाहेरचा’ वारा लागलेला नसतो. ते खेडे असेच होते. एखादी स्त्री जशी नऊ वारीसाडीमध्ये अगदी सहजतेने वावरत असते आणि ते करतांना तिचे मुळ सौंदर्य अधिकच खुकुन दिसते तसे ते खेडे नारळी बागांमध्ये वसलेले असे आणि आपल्याच कामांत गुंतलेले वाटले. लाकडाच्या कोरीव वस्तु तयार करण्याचा ऊद्द्योग हे तेथल्या ऊदरनिर्वाहाच्या धंद्याचे वैशिष्ठ असावे.



                  लाकडावर  कोरीव नक्षीकाम करणारे कारीगर 

जवळ जवळ प्रत्येक घरटी हेच काम चालु होते. कोणत्याही प्रकारची मशिनरी न वापरतां सर्व कामे हातानेच आणि छोटी छोटी अवजारे वापरुन चालु होते. ती अवजारे देखील त्यांनीच तयार केली होती. क्षणभर मला असे वाटले की आपल्याकडे होम डेपो (Home Depot) अथवा लो’ज (Lows) मधली सुप्रसिद्ध कंपन्यांनी तयारे केलेली अवजारे ह्यांना आणुन दिली तर ही मंडळी त्यांच्या अंगी असलेल्या ऊपजत गुणांमुळे त्या लाकडांतुन अजुन कितीतरी सुंदर नक्षीकाम निर्माण करतील. वास्तविक बाहेरच्या जगाचा असा स्पर्श न झाल्यामुळे जे निर्माण केले आहे ते ख-या अर्थाने त्यांच्या मुळ कलेचे खरे प्रतिबिंब आहे! त्यावरुन कल्पना आली की पुर्वीच्या काळी अशी कला होती त्याशिवाय का ताजमहाल सारख्या वास्तुचा जन्म झाला, नि काड्यापेटीमध्ये मावेल अशी नऊवारी साडी आपले कालाकार विणु शकले! मात्र त्या खेड्यांत त्यांनी तयार केलेल्या लाकडी वस्तुंमध्ये मला आपला विघ्नहर्ता श्री गणेशही दिसेल असे मात्र वाटले नव्हते! काय हे आश्चर्य! आमचा श्रीगणेश इतक्या दुर पोहोचला? माझे हात आपोआप जुळले. तेथल्या काम करणा-या मुलीने मला मोडक्या तोडक्या ईंग्रजीत विचारलेही की मी नमस्कार कां करतो आहे? तिला समजेल असे ऊत्तर मी देत होतो पण तिच्या ईंग्रजीच्या मोजक्याच ज्ञानामुळे तिला ते कळेना! शेवटी आमच्या टूर मॅनेजरची मदत घेवुन तिला श्रीगणेशाची ओळख करुन दिली. हा ईतका पॉवरफुल देव आहे हे तिला कळले तेव्हां तिने देखील त्याला नमस्कार केलेला मी पाहिला. माझी खात्री आहे की आतांपर्यंत तिच्या दुकानाची विक्री नक्कीच वाढली असणार कारण आपला गणपती कुणाचयाही सहाय्याला धांवुन जातो. शेवटी डिसक्रीमिनेशन वगैरे प्रकार हे सारे पृथ्वीवरच नाही का? निदान स्वर्गांत तरी ते अजुन पोहोचले नाही असे वाटते. (म्हणजे नसावेत-आपल्याला काय माहित? पण कांही वर्षांनी तिकडे गेल्यावर कळेलच म्हणा!)




                                                          श्री गणेश 



अशीच त्या खेड्याची टूर करता आम्ही एका लहान गल्लीतुन जावु लागलो. त्या गल्लीत एक घर होते, त्याला आपल्याकडे खेड्यांत असते तसे काट्यांचे कुंपण होते. समोर एक ऐसपैस आंगण! त्यांत फक्त कमी होती ती तुळशी वृंदावनाची! ते असते तर ते नक्कीच "खेड्यामधले घर कौलारु" वाटले असते. त्या घरासमोर स्टार-फृटचे एक मोठे झाड आणि त्याला अनेक फळे लदलेली. ते दृश्य मोठेच आल्हाददायक होते! कारण एक तर आपल्याकडे अशी स्टार फृटची झाडे दिसत नाहीत. त्याचे अपृप वाटुन आम्ही सारे ते पहायला तिथे थांबलो. तेव्हढ्यांत एक १२-१३ वर्षांची एक गोड मुलगी घरांतुन बाहेर आली. आतां "माझ्या दारांत ऊभे राहुन हा काय तमाशा आरंभला आहे?" अशा अर्थाचे एखादे खास व्हिएतनामी वचन ऐकायला मिळते की काय असे वाटु लागले. त्यांतुन त्या मुलीने येतांना हातांत एक मोठी काठी देखील आणली. त्यामुळे थोडे घाबरायला झाले. पण झाले भलतेच! तिने चक्क आमच्यासाठी ती फळे काढायचे काम सुरु केले. आणि ती काढुन प्रत्येकाला फळे वाटायला सुरुवात केली. कधी नव्हे ते माझ्या गांवांत आणि घरासमोर आलेल्या ह्या पाहुण्यांना काय बरे देता येईल? अशा विचाराने आणि आम्ही त्या फळाच्या झाडाकडे पाहात असल्याने तिने "अतिथी देवो भव" चा मंत्र पाळला. रामायणामधल्या शबरीसारखेच तिचे वागणे वाटले. अतिशय हंसत मुखाने तिचे हे काम चालले होते. आम्हां सर्वांना फळे देवुन ती खुणेने विचारत होती "अजुन काढु का? हवी आहेत का?" तिच्या त्या औदार्याने स्तिमीत होवुन आणि अतिशय गरीब आहे हे लक्षांत घेवुन तिला मी कांही पैसे देवु लागलो पण तिने ते घेतले नाहीत. तिच्या डोळ्यांत "अरे बाबा, मी हे पैसे मिळविण्यासाठी नाही रे करत!" हा भाव मी चक्क वाचला. तिला विचारुन तिचा फोटो मात्र मी जरुर काढला. ईतक्या लहान वयांत माणुसकीची एव्हढी चाड असलेल्या त्या मुलीचा फोटो आठवणीत जपायलाच हवा! अशा संस्कारांची मुलगी ज्या घरांत राहाते त्या घराला मातीच्या तुळशीवृंदावनाची गरजच काय? कां कोण जाणे पण त्या लहान मुलीचा निरोप घेतांना एखाद्या मायेच्या व्यक्तीचा "आता ही आपल्याला पुढे कधीही भेटणार नाही" असा निरोप घेतांना जसे वाटते तसे वाटत होते.




                            गोड मुलगी 

त्या खेड्याचा निरोप घेतांना आपली जमेची बाजु खुप जड झाल्याची सुखद जाणीव झाली.


पौर्णिमेचा ऊत्सव!





संध्याकाळी घरी (म्हणजे आमच्या हॉटेलवर) पोहोचलो त्यावेळी रस्त्या- रस्त्यावरुन बॅंड आणि संगीताचा जल्लोष सारीकडे असल्याचे दिसले. चौकशी अंती आख्या व्हिएतनाममध्ये पौर्णिमेचा ऊत्सव (Full Moon Celebration) चालु असल्याचे आमच्या टूर मॅनेजरने सांगितले. आपल्याकडे आपण कोजागिरीचा ऊत्सव करतो परंतु त्याचा ईतका जल्लोष क्वचितच करतो. मात्र ह्या मंडळींचा हा ऊत्सव म्हणजे मोठ्या प्रमाणावरच होता. रस्त्यांवर तोरणे ऊभारली होते. मंडप घातलेले होते. दुकानांतुन आकाश कंदीलापासुन ते कागदाच्या ड्रॅगनपर्यंत आणि निरनिराळ्या प्रकारच्या मिठाईपासुन ते ह्या ऊत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे विशिष्ठ पदार्थ ठेवण्यापर्यंत त्याची अथांगता होती.



                            आकाश कंदील 




मुले कागदाचे ड्रॅगन घालुन घराघ्रांतुन नाचत फिरत होती. त्यांना कांहीतरी (पैसे अथवा मिठाई) दिल्याशिवाय ती तिथुन हालेनात. आम्हास ते नाविन्य होते त्यामुळे आम्ही त्यांना पैसेच दिले. मुले एकदम खुष! त्या मुलांच्या हंस-या चेह-याचे फोटो घ्यायला मी विसरलो नाही. निख्ख:ळ आनंदाची किंमत किती कमी मोजावी लागते हे त्यादिवशी कळले. हिंदु धर्मांत वयाची ८१ वर्षे पुर्ण झाली की त्या व्यक्तीस आयुष्यांत सहस्त्र-चंद्र दर्शन झाले म्हणुन एक विशेष समारंभ करतात. ह्याचाच अर्थ असा की त्या व्यक्तीने तिच्या आयुष्यांत किती तरी पोर्णिमा पाहिल्या आहेत. त्याच विषयावर व्हिएतनामसारख्या देशाने त्यांच्या देशांत पौर्णिमेचा ऊत्सव साजरा करावा हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. भौगोलिक दृष्ट्या भारत देश इतक्या दुर असुनही आपले आणि त्यांचे धागे कुठेतरी जमतात हेच खरे!



                                                                                               तोरणे व रोषणाई 




शेवटचा टप्पा:







आमच्या टूरचा शेवटचा टप्पा (Halong Bay-Ha Noi) हा होता. विमानाने निघुन आम्ही Ha Noi ला पोहोचलो आणि परस्पर Halong Bay- येथे गेलो. त्या रात्री तेथे मुक्काम करुन दुसरे दिवशी आम्हास Halong Bay-ची टूर करायची होती. ह्या भागांत निसर्ग निर्मित अशी १९६९ बेटे आहेत. प्रत्येक बेट हे तितकेच सुंदर. ईतकी सारी पहाणे शक्यच नव्हते त्यामुळे मोजकीच पाहु शकलो



                                बेटे

निसर्गाचे ते स्वरुप कांही निराळेच होते. प्रत्येक बेटाचे निराळेच वैशिष्ठ! विशेष म्हणजे व्हिएतनामी मंडळींनी त्या निसर्ग सौंदर्याची पुजा अविरतपणे चालविली आहे. मानव निर्मित असा कोणताही फापट पसारा त्यांनी ठेवलेला नाही. जे आहे ते शक्यतोंवर आहे त्याच स्वरुपांत राखण्याचा त्यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. ऊगीचच अशा बेटांवर घरे वगैरे बांधुन त्यांनी त्या निसर्गास गालबोट आणि हात लावलेला नाही. त्या बेटांवर जातांना पाण्यातुनच होडी चालवित फळे विकणारे खुप विक्रेते पाहिले. चालत्या बोटीमध्ये हा फळ विक्रीचा व्यवहार कसा होतो ते प्रत्यक्षच अनुभविण्यास मिळाले





प्रवाश्यांच्या येण्या जाण्यावरच ह्या स्थानिक लोकांची ऊपजीविका चालते ते अंतर्यामी जाणुन ब-याच प्रवाश्यांनी त्या फळविक्रेत्यांना प्रतिसाद दिला. एका बेटावर आम्ही मुक्काम केला. तेथे एक तासभर बसलो. त्या बेटास खाजगी असा वाळुचा किनारा होता त्यामुळे आमच्या गृपमध्ये बरोबर आलेल्या अमेरिकन मुलींनी त्याचा पुरेपुर फायदा घेतला आणि कंचुकीसहित समुद्रांत ऊड्या मारुन व्यवस्थित आंघोळीही केल्या. त्या तयारीनिशी आल्याचे स्पष्टपणे दिसले. (हा तरुण मंडळीतला आणि आमच्यासारख्या सीनियर सीटीझनमधला फरक!) तेव्हढ्या वेळेत आम्ही एक बीयर संपविली



                              बेटे

होय, त्या बेटावर एक छोटी टपरी टाकुन व्हिएतनामी मंडळींनी ’काळाची गरज" ओळखली होती आणि प्रवाश्यांना लागतील अश्या गोष्टी सुर्योदयापासुन ते सुर्यास्तापर्यंत विकण्याची व्यवस्थाही केली होती. चार पांच तास त्या निसर्ग सौंदर्याची पुजा बांधुन आम्ही त्याचा मनोमन निरोप घेतला आणि आमच्या हॉटेलवर परतलो.



                            बेटे




ईतिहासाची फाडलेली पाने व्हिएतनाम जोडतो आहे.

आमच्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा होता. शेवटच्या संध्याकाळी टूर कंपनीतर्फे आम्हाला संध्याकाळचे जेवण होते. तो निरोप समारंभच होता. गेल्या बारा दिवसांत जगाच्या दुरदुरच्या भागांतुन एकत्र आलेले आम्ही ४० प्रवासी बारा दिवसांत एकमेकांचे जवळचे मित्र झालो होतो. जेवतांना मधुनच ऊठुन एकमेकांबर फोटो घेणे, एकमेकांचे पत्ते, फोन देणे-घेणे आणि मला विसरु नकोस असा संदेश एकमेकांस देणे ही प्रवासाच्या शेवटच्या दिवसाची नित्यकर्मे सारीजण करीत होते.







दुसरे दिवशी सकाळीच कांही लोक परतणार होते. त्यानंतर दोन दोन तासांनी कांही लोक त्यांचे विमान पकडण्यासाठी निघणार होते. आम्हीही दुपारी दोन अडीचचे सुमारास निघालो. बसमधुन विमानतळाकडे जातांना Ha Noi ची गर्दी दिसत होती. रोजचा नित्याचा व्यवहार चालला होता. हजारो मोटारसायकली रस्त्यांवरुन धांवत होत्या, भाजी आणि फळविक्रेते आपला माल विकायचा प्रयत्न करीत होते. रस्त्याच्या बाजुला संध्याकाळच्या जेवणासाठी ढाबे ऊघडण्याची तयारी चालु होती, प्रत्येक जण आपापल्या कामांत दंग होता. मधुनच दिसणारी बुद्धमंदिरे तिथे वावरणा-या भक्तांना आशेचा आणि ऊज्वल भवितव्याचा संदेश देत होती. शाळेतल्या लहान मुलांची एक पलटण रस्त्याच्या बाजुला सिग्नलपाशी ऊभे राहुन रस्ता ओलांडायची परवानगी त्यांच्याबरोबर असलेले टीचर केव्हां देतील याची वाट पहात होती. ही तरुण पीढी व्हिएतनामच्या भविष्याची पावती होती. त्या मुलांचे ते निरागस चेहरे पाहुन त्यांतच कुणी भविष्यांत होणारा देशाचा नेता असेल ही शक्यता नाकारता येत नव्हती.


२१ वर्षांच्या लांबलचक युद्धाच्या राखेतुन हे फिनिक्स पक्षी निर्माण झालेले होते. ताठ मानेने जगत होते. आमच्या वाटेला जावु नका अन्यथा दुसरी २१ च काय ५० वर्षेही आम्ही लढु असा आत्मविश्वास त्यांच्या चालण्यांतुन, बोलण्यातुन गेल्या १२ दिवसांत आम्हाला स्पष्ट जाणवला होता. आमच्यासारखे हजारो प्रवासी ह्या देशांत येत राहातील, त्यांना मोठ्या अभिमानाने ते हेही दाखवितील की आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत. आणि ते त्यांच्या देशसेवेच्या कामाला लागतील. केवळ बारा दिवसाचाच त्यांचा सहवास झाला असला तरी देखील मला अगदी मन:पुर्वक जाणवलेली त्यांच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे त्यांच्या वागण्यांत नम्रता होती पण हांजी हांजी अजिबात नव्हती, जगण्यासाठी आवश्यक असणारी स्वत:च्या कर्तुत्वाची झांक होती पण फाजील आत्मविश्वास नव्हता, भुतकाळाची दुख्खद, जीवाला चटके देणारी जाणीव होती, पण त्यामुळे आजचे मिळत असलेले सुख गमावुन टाकण्याचा अनावश्यक वैचारिक गोंधळ नव्हता. त्यांच्या रोजच्या प्रामाणिक कामामुळे, अथक प्रयत्नांमुळे, त्यांच्या अंगी असलेल्या सेवावृत्तीमुळे असं वाटत होतं की, आख्खा व्हिएतनाम भुतकाळांतल्या घटनांनी त्यांच्या देशाच्या ईतिहासांतली ओरबाडुन काढलेली, परकीय आक्रमणामुळे फाडुन टाकलेली पाने फेकुन देत नव्हता तर ती शक्य असेल तिथे जोडुन, त्यांतुन काय शिकता येईल हा प्रयत्न क्षणोक्षणी करतांना दिसत होता. धन्य हा गरीब देश की जो ताठ मानेने जगायचा प्रयत्न करीत होता.
आमची बस आता विमानतळावर जवळ पोहोचली होती. तेव्हढ्यांत बसमधुन एक बुद्ध मंदिर दिसले. बसमधुनच मी त्या बुद्धमुर्तीस हात जोडुन नमस्कार केला. व्हिएतनामी जनतेच्या ह्या जगण्याच्या स्पर्धेतील लढाईला आणि प्रयत्नांना बुद्धदेवाने यश द्यावे अशी प्रार्थना मी केली. तेव्हढ्यांत विमानतळही आला, बसखाली ऊतरुन आम्ही आमचे सामान बाहेर काढु लागलो. आता घरी लॉसएंजेलिसला परतायचे वेध लागले होते.





                                                                                         व्हिएतनाम ते  लॉसएंजेलिस












                                                    लेखक --- शशिकांत पानट           

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखातील सर्व छाया चित्रे गुगल इमेजसच्या सौजन्यने. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: