शुक्रवार, १५ मार्च, २०१३

नको साजरे नुसते दिन , हर दिन करू या सुदिन !




जागतिक महिला दिन ………। जागतिक कुटुंब दिन, जागतिक मातृ दिन ,पितृ दिन,मुलगी दिन ,मुलगा दिन …… असे दिवस साजरे करून आपण त्यातून काय शिकणार आहोत? त्या त्या दिनी फक्त आठवावे कर्तृत्व व नात्याचे महत्व … व वर्षभर दृष्टी आड करावे त्यांचे मुखं ! अशी आहे का आपली संस्कृती ? जगाच्या जोडीने माकडा सारखे अनुकरण करीत नाचायचे तरी किती ! ज्यांचे अनुकरण करून आपण आपली कुटुंब संस्था मोडकळीस आणली ,त्यांच्याच सांगण्यावरून पुन्हा आठवण्याचे प्रयत्न …… बुद्धी गहाण तरी किती टाकायची ? शिक्षण व पैसा माणसाचा विकास करतो परंतु हा माणसाला माणूसपण देवू शकत नाही, उलट माणसास माणसा पासून दूर करीत आहे. सारे विश्वची माझे घर … हे सांगणारे आपलेच संत आहेत ना ! नको साजरे नुसते दिन , हर दिन करू या सुदिन !



वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकाने आता साऱ्या जगाला सतावत आहे भीती ,कशी टिकतील ही मानवी नाती ? माणसाने बुद्धीच्या आधारावर जगण्याचा प्रयत्न केला ,जुने ते नको याचा कायम जोर धरला . प्रगती पथावर आहोत असा भास निर्माण केला . असो लांब बाह्या ते स्लीव लेस ब्लाउज सारखे आहे हि काळा सोबत बदलणारी माणसाची प्रवूत्ती ……सारे करून पहिले कि फिरून भोपळे चौकात येतात . आपलेच ज्ञान दुसऱ्याने सांगितले कि त्याची वाहवा करतात . भारत माझा देश आहे हे सांगावे लागते अजून आम्हाला तर सारे विश्व सगळ्यांचे आहे, हे उमजेल कधी कोणाला?



स्वतःवर ज्यांचा विश्वास नाही ते नेहमी शोधत राहतात दुसऱ्याच्या बुद्धीचा खांदा ,त्यामुळेच निर्माण झाला आहे सर्व भेदाचा वांदा ! स्त्री-पुरुष भेद,भाषा भेद,वर्ण भेद ,प्रांत भेद ,,धर्म भेद हे आम्ही आम्हाला मिळालेल्या बुद्धीवर जोपासणार , हा बुद्धीचा गैरवापर नाही का? माणसानी माणसामध्ये एक-मेकात भेद का करायचा हा प्रश्न सतावित नाही का कोणाला?



आम्ही आज ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून स्त्री-पुरुष भेद व त्या भेदाने एक-मेकांवर झालेले अत्याचार वर्णन करणार . निसर्गाने नरमादी घडवले त्यात आम्ही बदल घडविणार . या बदलाने पदरी काय मिळाले? सुखाच्या सोबतीने अधिक दु:खच ना ! स्त्रीने पुरुषासारखे बनले की ,एका म्यानात २ तलवारी राहत नाहीत ,तसेच पुरुषाच्या अंगी बाईलपणा येतो . अनेक अशा स्य्त्रीया पुरुषांवर अन्याय करतात ,असे बदल आपल्याला अपेक्षित आहेत का ? स्त्री व पुरुषाने एक-मेकांचे स्वातंत्र्य व आपले निसर्गदत्त स्त्रीत्व व पुरुषत्वाचे गुण अबाधित ठेवणे हे अपेक्षित आहे. कोणीही कोणाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे हे अपेक्षित नाही.



स्त्रीने तिचा विकास करायलाच हवा ! तिने स्वतःचे रूप ओळखणे हे महत्वाचे आहे ,पुरुषा सारखे बनण्याची नक्कल तिला कदापी तिचे स्वरूप दाखवणार नाही . स्त्रीया भारावून फार जातात ,प्रेमाच्या विळख्यात स्वतःचे अस्तित्व विसरतात आणि ते शोधण्यासाठी जगाभोवती गिरकी घेतात . जिवन अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यावर जे त्यांचे अनुभव सांगतात,ते आम्ही नुसते पाहतो ,वाचतो ,परंतु असे अनुभव आपल्यालाही येवू शकतात या बद्दल मात्र अनभिज्ञ रहतो. जीवन अनुभवातून आपण परिपक्व होवून पुढच्यास ठेच मगच शहाणा हे व्हायला हवे .



 मुळात आपली स्त्रियांची किती येकी आहे? आपण स्त्रियांच्या अनेक नात्यातून स्त्रीला किती जाणून घेतो,कि तिला आपणच हतबल करतो ,यावर विचार व्हायला हवा ! पुरुषाने लिहिलेले धर्म ग्रंथ स्त्रीस किती काळ जखडून ठेवणार आहेत,तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ही व्हायलाच हवी . अशा स्वतंत्र विचारातून ती जे पुरुष निर्माण करेल ,घडवेल ते निश्चितच माणूस म्हणून जगण्यास या पृथ्वीवर लायक असतील



दुसया महिलेचा जीवन प्रवास वाचतो,पाहतो तिच्या पुरस्कारावर टाळ्या वाजवतो ,परंतु मीही माझ्या गुलामीच्या स्वभावातून मुक्त होवून जगेन असे किती जणींना वाटते .? या समाजात आम्ही ५० % आहोत तरी आम्ही ३३ टक्क्यांच्या आरक्षणाची भिक का मागतो? जी स्त्री स्वतः स्वतःस जाणते व कसे जगावे हे हि जाणते ,तिला आरक्षणाची गरजच काय? आम्ही स्वतःला कमी लेखून स्वतःस कमीपणा आणत नाही का? लिंग भेदाच्या जोरावर आपल्याला मोठे व्हायचे नसून आपल्याला स्व कर्तृत्वावर मोठे व्हायचे आहे . स्त्रीला बाल संगोपन करताना मुलगा -मुलगी भेद न करता दोघानाही समान वागणूक द्यावयाची आहे. जेंव्हा हि घडणारी मुले स्त्री-पुरुष एक-मेकांचा आदर करतील व एक-मेकान शिवाय पूर्णत्व नाही हे जाणतील तेंव्हाच सुज्ञ जनता निर्माण होणार आहे. स्त्रीचा दुबळेपणा, दुबळी जनता घडवीत आहे. आपण त्याच्या तोट्याचे चटके सोसतच आहोत.



मुला-मुलीना घडविताना त्यांना समानता,लांगिक शिक्षण हे मैत्रीचे नाते ठेवून द्यायलाच हवे. ,तेंव्हा मुलींकडे पाहण्याचा मुलांचा नजरिया सुधरेल. भोग्य वस्तू नसून ती स्वतःच्या जाणीवा जपणारी आपल्या सारखीच माणूस आहे हे त्यांना उमजेल. . स्त्रीलाही तिच्या जाणीवा ,असतात व ती गुलामगिरीने जगत नाही हे कृतीतूनच व्हायला हवे. . जितके स्त्री स्वातंत्र्य तितके विभक्तीकरण असे समीकरण झाले आहे, हे समीकरण आपल्याला स्त्री-पुरुष एकीच्या उत्तरावर आणायचे आहे. . स्त्री-पुरुष एक-मेकाविना अधुरा आहे, मग त्याचा द्वेष व अनुकरण न करता स्त्री-पुरुषास आत्मभान व सहसंवेदनांची जाणीव असणे महत्वाचे हे रुजवायला हवे. तेंव्हाच असे महिला दिन साजरे करावयास लागणार नाहीत . . स्त्रियांना समान वागणूक मिळून त्या स्त्री-पुरुष समानतेच्या मार्गावर आलेल्या असतिल.



अखंड सावधान असावे हे ऐकतो ,वाचतो परंतु आचरणात आणण्यास विसर पडतो . एड्स,कॅन्सर , सारखे रोग आपल्या पर्यंत पोहोचतील याची शक्यता नाकारतो , जेंव्हा आपल्या पर्यंत येतात तेंव्हा गाफील रहाण्याच तोटा उमजतो . भूकंप -सूनामी आपल्याही जिवनात येवू शकते ही शक्यता लक्षात घेत नाही . यानेच जिवनात हतबल व्हायला होते . आत्मचिंतनाने ,स्वतःला जाणून मन खंबिर करून भानावर राहून ,जिवन सुंदर आहे हे उमजते व ते कसे जगावे हेही समजते . आपले जिवन सुंदर बनवू या अशी आजच्या दिनी समस्त मानव जातीस प्रार्थना !



मंगला रावत भोईर ( पुणे )














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: