कविचे मनोगत ------
नीरव शांततेचं जग!
आकाशाच्या ऊंचीला हात लावून
स्वर्गांत पावूल टाकलं
पण पृथ्वीवर वाटत होतं
तसं नाही वाटलं! II१II
इंद्र-दरबारांतली मैफिल
तशी चांगली झाली
पण टाळ्या नि वाहवाच्या ऐवजी
सहेतूक हास्याचीच खैरात अधिक झाली! II२II
सुरुवातीचे काही दिवस
तसे बरे गेले!
पण नंतर काम शोधतांना
नाकी नऊ आले! II३II
स्वर्गांत तसं काहीसं
फार काम नसतच!
सकाळ, संध्याकाळ, तिन्ही त्रिकाळ
अमृत पिवून, बसून राहायचं असतं! II४II
गीत रामायणाची मैफिल देखील
श्रीराम-सीतेच्या समोर केली
पण आपल्या पृथ्वीवर यायची ना?
तशी मजा नाही आली! II५II
गीत रामायण गातांना
थोडसं कुश-लवासारखं वाटलं
नाही असं नाही
पण रावण देखील श्रोत्यांमध्ये होता ते पाहून
कुठेतरी, काहींतरी चुकतंय
असंच वाटत राहिलं काही बाही! II६II
श्रीराम नि रावण एकाच वटवृक्षाखाली
ध्यान करतांना दिसले
आणि ह्याच दशाननाने सीतामाईचे
हरण केले होते
त्याचेच नवल वाटत राहिले II७II
मला आवडायची ती मुंबईची
धांवपळ, ती गर्दी आणि
तो कर्णकर्कश आवाज,
स्वर्गाच्या या ’स्मशान’ शांततेतही
मनासारखा होत नाही हो रियाज! II८II
त्या गाण्याच्या मैफिली, ते चित्रपट संगीत
कुठे गेले ते मंतरलेले दिवस?
असं म्हणतांच ग.दि.मा. म्हणाले
“फडके, स्वर्ग सुखाची अप्रुपता,
अजिबात कशी नाही तुम्हाला
तुम्ही पण राव, करताय अगदी कळस?” II९II
“अहो, स्वर्गसुख मिळविण्यासाठीच ना
पृथ्वीवर आयुष्यभर पुण्यकार्य केलं?
म्हणून तर तुमच्या नशिबी
हे स्वर्ग सुख आलं?” II१०II
“ ते सगळं ठीक आहे हो,
स्वर-सूरांनी भरलेल्या त्या मैफिली,
त्यांत तल्लीन होणारा माझा तो मायबाप रसिक,
आणि जिथं रोज भेटत नाही, माझी मराठी माय,
नाही जिथं माझा महारष्ट्र देश
तिथं स्वर्ग-सुखाची मातब्बरी ती काय?” II११II
“माडगूळकर, ह्या स्वर्ग-सुखाचं
सगळच असतं अगदी निराळं
नीरव शांततेतच सामावलेलं
असतं ईथलं जग सगळं “ II१२II
शशिकांत पानट
२९ जुलै, २००३
Los Angeles
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा