मंगळवार, ३ जून, २०१४

असाही एक घटस्फोट ( एका अमेरिकन विनोदाची कल्पित गोष्ट )














माईक घरी आला तो खुप थकुन गेलेला होता. आल्या आल्या त्याने किचनमध्येच धांव घेतली आणि रेफ़्रिजेटर ऊघडुन एक बीयरची बाटली काढली. हातानेच त्याचे झांकण पिरगाळुन काढले, तेव्हढ्या गडबडीतही त्याचे सर्वस्व असणा-या बास्केटबॉल खेळाडूची-कोबी ब्रायंटची त्याला आठवण आली आणि त्याच्यासारखाच नेम धरुन त्याने ते झांकण समोरच्या कोप-यात असलेल्या एका कच-याच्या डब्यांत, जणु ते बास्केटबॉल कोर्ट आहे अशी कल्पना करुन फेकले आणि ते नेमके त्यामध्येच बरोबर पडले. खुष होवुन आईवरुन एक सणसणीत शिवी हांसडुन तो लिव्हिंगरुम मध्ये पोहोचला आणि तेथल्या कोचावर स्वत:ला झोकुन दिले.

ह्या आनंदयात्रेत त्याला हवाहवासा असा टीव्हीचा रिमोट मात्र सांपडेना. परत एक अर्वाच्य शिवी हांसडत तो वैतागुन ऊठला आणि कोचाच्या गादीखाली लपुन बसलेले रिमोट त्याने शोधुन काढले आणि एकदाचा टीव्ही सुरु केला. हे सर्व होईतोपर्यंत अर्धी बाटली संपलेली होती. ऊरलेली घशाखाली एका दमांत रिचवुन तो परत किचनमध्ये गेला, आता मात्र येतांना त्याच्या हातांत बियरच्या दोन बाटल्या दिसत होत्या. ज्या वेगाने तो ते द्रव्य पीत होता, त्यासाठी पुढच्या कांही मिनिटांसाठी कां होईना, पण त्याला दोन बाटल्यांची तरी किमान गरज होती.

हे सारे होईपर्यंत रोजच्याप्रमाणे घरांतुन बायकोचा अजिबात आवाज आला नाही हे मात्र जरा अतिच होते आहे असे त्याला वाटले. त्याच्या मनाची स्थिती थोडी मिश्र अशी होती. आल्या आल्या तिचा तो हाय पीच मधला कंटाळवाणा आवाज ऐकु आला नाही आणि आपल्याला थोडा ब्रेक मिळाला ह्याचा खरे तर त्याला आनंदच झाला होता. पण तरीही आपण एव्हढे कामावरुन थकुन आलो आहोत, तर तिने निदान समोर येवुन "हाय हनी" म्हणण्याचे औदार्य दाखवावे, ओझरते का होईना, पण एखादे चुंबन द्यावे, अथवा किमानपक्षी स्वत:हुन आपल्याला एखादी बियर तरी आणुन देण्याचे सौजन्य दाखवावे असे त्याला वाटत राहिले पण ह्यापैकी कांहीही घडले नाही म्हणुन थोडा रागच आला. त्याने थोडी म्हणजे- दोन्ही बियर संपेपर्यंत वाट पाहिली. पण तरीही कांही हालचाल न घडल्याने त्याची जिज्ञासा जागृत झाली आणि तो बेडरुममध्ये गेला. बेडरुमची अवस्था नुकतीच एखादी वावटळ येवुन गेलेल्या जंगलासारखी झाली होती. नाही, खरं म्हणजे घरांत नेहमी कचरा असतोच, पण आजचा कचरा अगदी अतिच होता."च्यामारी, (परत एक लिहिता न येणारी शिवी) ही बाई एक तर काम वगैरे कांही करीत नाही, घरांत लहान मुलंही नाहीत, हिला आपलं हे घर साधं स्वच्छही ठेवतां येत नाही?" असे काहीसे पुटपुटतच त्याने जमिनीवर पडलेल्या दोन तीन वस्तु ऊचलल्या आणि त्या बेडवर ठेवुन तिथंच ठाण मांडलं. आणि त्याचं लक्ष तेथे एंड-टेबलवर एक पाकीट ठेवलं होतं त्याकडे वेधले. "आहा! बाईसाहेब चिठ्ठी लिहुन बाहेर गेलेल्या दिसाताहेत" असे मनाशी म्हणत त्याने ते पाकीट ऊघडले आणि तो वाचु लागला. तिने नव-यास ऊद्द्येशुन लिहिले होते:

" माय डीयर एक्स-हजबंड! मी हे पत्र-शेवटचे पत्र -तुला लिहुन आज कायमची निघुन जात आहे-तुझ्या ह्या दळभद्री घरांतुन-मुख्य म्हणजे तुझ्या तेव्हढ्याच दळभद्री आयुष्यांतुन! गेली सात वर्षे मी तुझ्याशी संसार केला, पण तुझ्याकडुन मला कांहीही परतफेड मिळाली नाही. विशेषत: गेले दोन आठवडे म्हणजे केवळ नरकवासच होता! आज दुपारीच तुला फोन केला तेव्हां तु नव्हतास म्हणुन तुझ्या बॉसशी बोलले. तो म्हणाला की तु आजच्या आज, कोणतीही पुर्व-सुचना न देतां, नोकरी सोडुन दिलीस! राजिनामा देवुनच तु तरा तरा बाहेर पडलास म्हणे! तो फोन संपविला आणि मी ही चिठ्ठी लिहुन बॅग भरुन निघाले देखील! हा अगदी शेवटचा आशेचा धागा तु आज तोडलास रे! अखेरचा घाव तु घातलास! एकतर आजकाल लोकांना नोक-या मिळत नाहीत आणि तुझी चांगली कित्येक वर्षांची सिनिऑरिटी असलेली नोकरी, तु स्वत:हुन सोडतो आहेस असे म्हंटल्यावर कोणत्या बाईचे मन था-यावर राहील? अशा पद्धतीने तु घरांत पैसा कसा आणणार आणि मला कसा सुखी ठेवणार? आणि मुख्य म्हणजे, तु असे कांही करणार आहेस ह्याची मला यत्किंचित कल्पना देखील दिली नाहीस. हे तुझे वागणे जबाबदारीचे होते असे वाटते की काय तुला? अर्थात तुझ्याकडुन अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे म्हणा!

बरे हे एव्हढ्यावरच मर्यादित असते तर देखील ठीक होते. परंतु गेल्या दोन आठवड्यांत तु ज्या पद्धतीने माझ्याशी वागला आहेस त्याला तर तोडच नाही. तुला आठवतं? मागच्याच आठवड्यांत मी मुद्दाम ब्युटी पार्लरमध्ये जावुन खुप पैसे खर्च करुन नविन हेयरस्टाईल करुन आले होते! तुझ्यासाठी राबराबुन पोर्क रोस्टचे ऊत्तम जेवणही तयार केले होते आणि तुला--केवळ तुला-- खुष करण्यासाठी सिल्कचा एक सेक्सी ड्रेसही घातला होता. हे सारे मी तुझ्यासाठी केले आणि तु? माझ्या हेयर डू कडे लक्षही दिलं नाहीस, मी केलेल्या जेवणाला तर तु हातही लावला नाहीस आणि मी नविन ड्रेस घातला आहे की जुनाच नेसला आहे ह्याकडॆ ढुंकनही पाहिले नाहीस! तु दोन मिनिटांत तिथुन सटकलास, तुझे सर्व गेम टीव्हीवर पाहुन झाल्यावर मध्यरात्रीनंतर केव्हांतरी झोपायला गेलास. हे काय वागणं झालं? माझ्यावर तुझं प्रेम आहे हे तु कधीच सांगत नाही, आपण नवरा बायको आहोत हे नातं ईतरांना कळेल असही तु कधी वागत नाहीस. ह्या सर्व गोष्टींवरुन मी एक अनुमान काढलं आहे की, एक तर तुझं दुस-या कुणावर तरी प्रेम आहे आणि तु मला फसवितो आहेस. किंवा तुझं प्रेम माझ्यावर असलच तर (पण मला नाही वाटत असं!) ते खुल्या दिलानं सांगण्याची तुझी हिंम्मत होत नाही. आणि तसं करण्यासाठी हृदयाचा--मनाचा जो मोठेपणा लागतो ना, तोच मुळी तुझ्याकडे नाही! असो! कोळसा ऊगाळावा तेव्हढा काळाच! ते कांही का असेना, अशा परिस्थितीत तुझ्याबरोबर ह्यापुढे राहाणं मला जमेल असं वाटत नाही तेव्हां मी तुला आज कायमची सोडुन जाते आहे."

तुझी--
आता कोणतेही नातं नसलेली एक्स-वाईफ

ता..: मला शोधण्याचा प्रयत्न करु नकोस म्हणजे तु करशील असं मला ऊगीचच वाटतं! तुझा थोरला भाऊ आणि मी दोघे मिळुन व्हर्जिनियाला स्थलांतर करीत आहोत. तिथे आमचा संसार सुखाने होईल ह्याची आम्हा दोघांना खात्री आहे! गूड बाय! "


ते पत्र वाचताच माईक एक क्षणभर विस्मित झाला. त्याच्या चेह-यावर अगदी मनापासुन मिळते तसे समाधान दिसु लागले. "आंधळा मागतो एक डोळा---" अशी त्याची मन:स्थिती झाली! आपल्या बायकोने-म्हणजे आताच्या एक्स-वाईफने आपल्याला पत्र पाठविले आहे तेव्हां त्याला ऊत्तर देणे आपले परम कर्तव्य आहे असं त्याला वाटलं! मात्र त्या आधी एक दोन महत्वाचे टेलीफोन्स करुन मगच तो पत्र लिहायला बसला:

" माय डीयर एक्स वाईफ! माझ्या आयुष्यांत कधीही मिळाले नव्हते एव्हढे समाधान आज मला कितीतरी वर्षांनी मिळाले आहे.! तुझ्या पत्रामधली फक्त एकच गोष्ट तु खरी लिहिली आहेस आणि ती म्हणजे आपल्या लग्नाला ७ वर्षे पुर्ण झाली आहेत! ही सारी वर्षे मी कशी काय काढली आणि तरीही मला वेड कसे लागले नाही हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होवु शकेल. मात्र ते राहु दे बाजुला! तुझ्या पत्रात लिहिलेल्या सर्व आरोपांचे खंडन करणे ह्या साठीच हे पत्र मी लिहितो आहे. अन्यथा तुझे मला सोडुन जाणे म्हणजे "सुंठीवाचुन खोकला गेला" असेच मला वाटते आहे.!

होय हे खरे आहे की दिवसभर मर मरेतो काम करुन घरी आल्यावर रोज विरंगुळा म्हणुन मी एक दोन बीयरच्या बाटल्या फस्त करतो आणि शांतपणे बसुन टीव्ही पहातो. तुझा तो हाय पीचमधला गेंगाणा आवाज टीव्हीच्या आवाजामुळे थोडा सुसह्य करणे एव्हढाच त्या मागे माझा ऊद्द्येश्य होता! तुला माहिती आहेच की मी दिवसभर कामानिमित्ताने बाहेर असतो आणि खुप थकुन घरी येतो, तेव्हां निदान तु माझ्याबरोबर येवुन पांच दहा मिनिटे सुख दु:ख्खाच्या गप्पा मारशील असं मला गेले सात वर्षं सतत वाटत आलं आहे. पण कसचं काय? अपवाद म्हणुन का होईना एकही दिवस तु माझ्या बरोबर बसुन टीव्ही पाहिला नाहीस अथवा मला एका शब्दाने देखील कधी विचारले नाहीस की "हनी तुझा दिवस कसा गेला रे आज" किंवा "खुप थकला असशील ना? चल आता थोडा आराम कर आणि मी गरमागरम जेवायला वाढते" पण एव्हढे माझे नशिब थोर नसावे!

हो, पण तु म्हणतेस त्या प्रमाणे तु केलेला नविन हेयरडू मी पाहिला बरं का! पण तुला खरं सांगु का? तु त्यामध्ये एखाद्या बाईसारखी दिसत नव्हती तर एखाद्या पुरुषासारखी दिसत होती! माझ्या आईनं मला लहानपणीच शिकविलं आहे की "आपल्याला कुणाविषयी चांगलं बोलायचं नसेल, तर निदान दुस-याला दुखवेल असं बोलु तरी नये! गप्प बसावं!" आणि मी माझं प्रामाणिक मत तुला द्यायचं ठरवलं असतं तर तुझ्या भावना दुखावल्या गेल्या असत्या! म्हणुन मी गप्प राहिलो आणि कांहीही बोललो नाही!

तु माझ्यासाठी मुद्दामुन पोर्क रोस्ट केला असं म्हणालीस. परंतु गेल्या सात वर्षांत मी एकदा तरी नॉन-व्हेज खाल्लं आहे कां? मी संपुर्ण शाकाहारी आहे हे तुला सात वर्ष लग्न होवुनही आठवत नाही ह्याला तुझी विस्मरणशक्ती म्हणावी की सोयिस्कर गैरसमजुत!? कदाचित तु मी आणि माझा थोरला भाऊ ह्या मध्ये गल्लत तर करीत नाहीस ना? कारण पोर्क रोस्ट ह्या त्याचा आवडता मेनु आहे! माझा नव्हे!

बरं तु ज्या सिल्क ड्रेसविषयी बोलते आहे तो मी पाहिला होता आणि खर तर त्यामध्ये तु किती सुंदर दिसते आहेस हेही मी तुला सांगणारच होतो. पण तेव्हढ्यांत माझ्या लक्षांत आलं की त्या ड्रेसवर त्याच्या किंमतीचे $49.95 चे लेबल तु काढले नव्हते! आणि आदल्याच दिवशी माझ्या थोरल्या भावाने माझ्याकडून $50 बारो केले होते हा केवळ योगायोगच असु दे म्हणुन मी देवाची प्रार्थनाही केली. आणि म्हणुनच तुला लागेल अथवा दु:ख्ख होईल असे मी कांहीच बोललो नाही!

पण ते असु दे! हे सर्व घडत असतांना देखील माझे तुझ्यावर प्रेम आहे हे माझ्या लक्षांत आले. ह्या सर्व अडचणींवरही आपण मात करु, आणि ह्यातुनही मार्ग काढुच काढु असा मला आत्मविश्वास होता! लग्न झालेल्या जोडप्यांच्या अशा अडचणींवर सल्ला देणारे लोक --मला वाटतं त्यांना Marriage Councilor म्हणतात हे Consulting साठी भरपुर पैसे घेतात हे मला माहित होते आणि ते कुठुन ऊभे करावे आणी त्यांचा सल्ला घेवुन आपले लग्न वांचवावे, ह्या विचारांत असतांनाच एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली! मला आज सकाळीच $200 मिलियन डालर्सची लॉटरी लागली. तुला हे कधी सांगतो आहे असं मला झालं होतं. तुला सरप्राईझेस आवडतात म्हणुन मी मुद्दामुन फोन केला नाही, तडक हापिसांत गेलो आणि राजिनामा दिला, आपल्या दोघांच्या व्हेकेशनसाठी दोन जगप्रवासाची तिकिटेही आणली. आणि घरी आल्यावर तुझं पत्र वाचुन खरं तर मीच सरप्राईझ झालो! पण गेल्या दोन दिवसांत घडलेल्या ह्या सर्व घटना पाहुन माझी खात्री पटली आहे की कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही! आणि घडलेल्या घटनांच्या मागे आपल्याला माहित नसलेली कोणती तरी पुर्वनियोजित अशी शक्ती असते!

आता हेच पहाना! मला लॉटरी लागते काय आणि तु त्याच दिवशी मला सोडून जाते काय? हो बरं आठवलं! आत्ताच मी वकिलाला फोन केला आणि त्यांना तुझं हे शेवटचं पत्र वाचुन दाखविलं. त्यानं सांगितलं की तु लिहिलेलं हे शेवटच पत्र, तुला आणि मला विनासायास घटस्फोट मिळवुन द्यायला खुप ऊपयोगी पडेल आणि इतकच नव्हे तर त्या पत्रामुळे मला मिळालेल्या ह्या घबाडांमधला एक सेंटदेखील तुला मिळणार नाही. त्याबाद्दल तुझे किती आभार मानु तेच मला कळत नाही!

तु ते शेवटचं पत्र लिहिण्याची फार घाई केलीस असं नाही वाटत तुला? एक दिवस ऊशिरा लिहिलं असतं तर निदान लॉटरीतले निदान $100 मिलियन तुला नक्कीच मिळाले असते. मला खुप वाईट वाटतं आहे की तुला ह्यांतला छदामही मिळणार नाही! पण तु मात्र वाईट वाटुन घेऊ नकोस! कारण मी वर लिहिल्याप्रमाणे कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही! बर तर मग, ह्यापुढे आपला कोणताही संबंध नसेल. जिथे असशील तिथे सुखी रहा! आणि काळजी घे!


तुझा .....
(छे, चुकुन लिहिलं तुझा म्हणुन-काय संबंध?) आणि ह्या पुढे मिलिनीयर म्हणुन ओळखला जाणारा, एक्स हजबंड!


ता..: हे सारं लिहितांना तुला एक विचायचं राहिलच! माझा भाऊ कार्ल ज्याच्याबरोबर तु पळुन गेली आहेस, तो जन्मला तेव्हा कार्ला (मुलगी) होता! त्याने सांगितलं आहे ना तुला हे? तुला ह्या बातमीचा ऊपसर्ग होत नाही असं गृहीत धरतो!




--शशिकांत पानट

डिसेंबर ९-२०१३


---------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: