मैफिल स्वर्गांतली....................
सुप्रसिद्ध संगीतकार लोकप्रिय गायक श्री सुधीर फडके यांचे स्मरण व श्रद्धांजलि.........
दिनांक २९ जुलै, २००२, Los Angeles ला आता रात्र झाली आहे. काही तासापूर्वीच सुप्रसिद्ध संगीतकार, महाराष्टाचे लोकप्रिय गायक श्री सुधीर फडके हे स्वर्गवासी झाल्याची दु:ख्खद बातमी भारतांतून आली आहे. पहिले काही तास तर मन बधिरच झालं होतं. काय करावं तेच सुचेना. बाबुजींची अंत्ययात्रा शिवाजी पार्कला त्यांच्या घरासमोरून जात होती. सौ. ललिताबाई त्यांच्या बाल्कनींत ऊभ्या राहून त्यांना दु:ख्खाश्रूंनी निरोप देत होत्या. हजारो लोक त्यांना अखेरचा निरोप द्यायला जमले होते. अशा वर्णनाचा माझ्या नातेवाईकांचा फोन डोंबिवलीहून मला आला व अशा प्रसंगी मनांत आलेले विचार:
मैफिल स्वर्गांतली
मैफिल अर्धवट सोडून,
गवैय्या अचानक निघून गेला
सप्त सूरांना पोरकं करून!
आणि सूरांच्या बादशहानं,
घेतला अखेरचा निरोप
लक्ष लक्ष अश्रूंमधून! II१II
देव म्हणाला हा माणूस
माझ्या दरबारांतच हवा
कोणतीही अपेक्षा न करता
तो करेल सर्व देवांची सेवा! II२II
चित्रपटगीतं-भावगीतं आणि
गीत रामायणांतल्या गीतांना
खूप खूप वाईट वाटलं
परंतू प्रत्यक्ष स्वरश्रींकडून
गीत-रामायण ऐकायला मिळणार म्हणून,
राम-सीतेला मात्र खूप बरं वाटलं ! II३II
“ अरे, आईला सोडून कुठं निघालास?”
म्हणाली मराठी माती
तेव्हां ऊत्तर आलं, “केव्हांतरी
सोडायचीच असतात ना नाती गोती?” II४II
“ माझ्या वचनाला मी जागलो
सावरकर चित्रपट पूर्ण करून,
पण पदोपदी जाणवतं,
खूप गोष्टी करायच्या राहिल्या म्हणून! II५II
पेटी, तबला, व्हायोलिन,सतार
आणि झांजा म्हणाल्या एकमेकांना
“सप्त सूरांत सजविणार
आतां कोण बरं आपल्याला?” II ६ II
ग.दि.मा. म्हणाले “अहो फडके
वाटच तुमची पहात होतो
अहो, खूप गीतं लिहून झाली आहेत,
त्यांना संगीत-दिग्दर्शक शोधीत होतो” II ७ II
“पण बाबुजी, किती हा ऊशिर केला
तुम्ही ईथपर्यंत पोहोचायला
ताटकळून बसले आहेत ना सारे
इंद्र-दरबारांतल्या तुमच्या पहिल्या मैफिलीला” II ८ II
शुद्ध-आकार असा लावा
की मर्त्य लोकांत तो पोहोचायला हवा
आणि स्वर्गांतल्या ह्या मैफिलीला
पृथ्वीवरून येवू द्या वाहवा
पृथ्वीवरून येवू द्या वाहवा II ९ II
शशिकांत पानट
२९ जुलै, २००२
Los Angeles
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा