नवीन लेख


एका सत्यकथेचे स्वैर मराठीकरण

"आयुष्याचे मोजमाप "







त्या रात्री वादळानं नुसता धुमाकुळ घातला होता. फिलाडेल्फिया भागांतल्या एका निर्जन अशा अगदी छोट्या हाटेलच्या खिडक्या घोंगावणा-या वा-यामुळे धाड धाड वाजत होत्या. बाहेर फारच थंड झालं होतं. त्यांत पावसानं थैमान घालायला सुरुवात केली. हाटेलच्या लाबीत काऊंटरवर बसलेल्या क्लार्कने ऊठून काळजीपूर्वक खिडक्या लावल्या, लाबीच्या मुख्य दर्शनी दारांतुन पावसाची वरसाड आंत येत होती म्हणून ते नीट लावून घेतलं. ते लावतांना त्याला बाहेरच्या पावसाची, घोंगावणा-या वा-याची आणि थंडीची थोडी चुणूक मिळालीच. "आतां एव्हढ्या पावसांत आपल्या हाटेलमध्ये कोण येणार आहे म्हणा?" 
असं मनाशी पुटपुटतच तो परत काऊंटरपाशी आला. त्याने फ़ायरप्लेस लावली आणि थोड्याच वेळांत त्याच्या ऊबेने तो हरीरानं आणि मनोमनही सुखावला.









मात्र तेव्हढ्यांत दर्शनी दाराजवळ कुणीतरी आले आहे हे त्याने पाहिले. घाईघाईतच त्यानं दार ऊघडलं आणि एक अतिशय वृद्ध जोडपं आंत आलं. त्यांनी आपली पावसानं थबथबलेली छत्री एका कोप-यांत काळजीपूर्वक ठेवलेल्या डब्यांत ऊभी केली. किंचित दम घेतल्यानंतर तो वृद्ध क्लार्कला म्हणाला: "अशा वादळांत ह्या रस्त्याने ड्रायव्हिंग करणे आणि पूढे जाणे धोक्याचे होते, त्यामुळे येथे रात्र काढावी असा विचार करून येथे आलो. आज एका रात्रीसाठी केवळ झोपण्यासाठी एक खोली मिळेल का?" नेहमीच विजयी हास्य असलेला तो क्लार्क सस्मित चेह-याने त्यांना म्हणाला: "तुम्ही दुर्दैवाने अशा वेळी ईथे आला आहांत की गांवात आज एकाच वेळी तीन कन्हेंशन्स सुरू आहेत त्यामुळे आमचे हे हाटेल संपूर्ण बूक झाले आहे. ईतकेच नव्हे तर तुम्ही जरी पूढे गेलांत तरी तुम्हाला बहुधा हेच ऊत्तर सारीकडे मिळेल." त्याच्या ह्या नकारात्मक ऊत्तराने निराश झलेले ते जोडपे विचारांत पडले. "आतां काय बरे करावे?" अशा कांहीशा विचारांत ते दोघे असतांना तो दयाळू क्लार्क त्यांना म्हणाला: "मात्र मी एक गोष्ट आपल्यासाठी करू शकतो. तुम्हाला काय फक्त एक रात्रच काढायची आहे ना? अशा ह्या वादळी हवेत आपण दोघे जाणार तरी कुठे? त्यापेक्षां तुम्हाला ह्या हाटेलमधल्या माझ्या खोलीत रात्र काढता येईल. माझी खोली कांही फार मोठी नाही आणि त्यांतल्या सुविधाही फारश्या नाहीत. पण तुमची गरज भागेल हे मात्र नक्की!"
त्या क्लार्कचा हा चांगुलपणा कितीही स्पृहणीय असला तरी त्या जोडप्याला-- अशा परिस्थितीत आपल्याला फारसा ईतर पर्याय नाही हे माहीत असुनही --त्याच्या ह्या सुचनेचा स्वीकार करवेना. त्यांच्या मन:स्थितीची जणु जाणीव होवून तो क्लार्क परत म्हणाला: " आणि आपण माझी काळजी करू नका, नाहीतरी माझी आता रात्रपाळीच आहे त्यामुळे मला आज रात्री झोपेसाठी माझ्या खोलीची गरज नसणारच" त्याचे हे आपुलकीचे आणि नम्रतेचे बोलणे ऐकुन ते वृद्ध जोडपे आनंदले आणि त्यांनी त्या सुचनेचा नम्रपणे स्वीकार केला.


रात्रभरांत वादळ चांगलेच शमले होते. दुसरे दिवशी भल्या पहाटे ते वृद्ध जोडपे लाबीत आले, त्या क्लार्कचे मनापासुन आभार मानुन त्यांनी त्या खोलीचे भाडे भरले. जाण्यापूर्वी तो वृद्ध गृहस्थ त्या क्लार्कला म्हणाला: ह्या हाटेलची सेवा करतांना गि-हाईकांची सेवा कशी करावी हे तुला चांगलेच ठावूक आहे, तुझ्या मनाची ठेवण "सेवाभाव" ह्या शब्दाला समर्पक आहे. तुझ्या ह्या सकारात्मक वृत्तीमुळे खरे तर तु एखाद्या ऊत्तम हाटेलच्या सर्वोच्च पदावरचा अधिकारी व्हायच्याच योग्यतेचा आहेस. खरं सांगायचं तर मला तुझ्यासाठी असं एखादं हाटेल मुद्दामुन बांधायला आवडेल" त्यांच्या त्या बोलण्याने तो क्लार्क आनंदला आणि ते सारे मनापासुन हंसले. त्याने त्या वृद्ध जोडप्याचे आभार मानले आणि त्याच्या विषयी ईतके चांगले विचार व्यक्त केले म्हणून त्यांचे आभार मानले.
त्या क्लर्कला धन्यवाद देत देत ते जोडपे मार्गाला लागले. गाडीत बसल्यावर त्या वृद्ध जोडप्याचे एकमत झाले की आजकालच्या जगांत अशा प्रकारची ऊत्तम वृत्ती शोधुनही सांपडणे कठिण असते.


ह्या घटने नंतर दोन वर्षे लोटली. तो क्लार्क तर ही घटना कधीच विसरून गेला होता. मात्र एके दिवशी पोष्टाने त्याला एक भले मोठे पाकीट आले. त्यांतल्या पत्रांत त्या वादळी रात्रीची आठवण आणि परत एकदां त्या क्लार्कची स्तुती होती. विशेष म्हणजे त्या पत्रांत विमानाचे एक परतीचे तिकीट होते आणि त्या क्लार्कला त्या जोडप्याने न्युयार्कला भेटीचे आमंत्रण दिले होते.

त्या पत्राने तो क्लार्क प्रथम थोडा भांबावला आणि मग मात्र सुखावला. त्या क्षुल्लक घटनेला खरं तर तो विसरूनही गेला होता. मात्र त्या पत्राने आणि त्या विमानाच्या परतीच्या तिकीटाने त्याची अस्मिता जागी झाली हे मात्र निश्चित! हाटेलच्या मालकाकडे दोन दिवसाची रजा टाकून तो न्युयार्कला पोहोचला आणि त्या वृद्ध जोडप्याला भेटला.


न्यूयार्क -म्यानहटन 





त्या वृद्ध जोडप्याने त्याचे ऊत्तम स्वागत केले आणि त्याला न्युयार्कच्या सुप्रसिद्ध ३४ व्या आणि ५ व्या रस्त्याच्या कोप-यावर नेले. तेथल्या एका गगनचुंबी लाल दगडाच्या ईमारतीकडे बोट दाखवून तो वृद्ध माणुस त्या क्लार्कला म्हणाला: "ती ईमारत पाहीलीस? हे हाटेल मी खास तुझ्यासाठी-तू ह्याची व्यवस्था पाहावी म्हणुन बांधुन घेतले आहे, अगदी मी तुला त्यादिवशी बोललो होतो त्याप्रमाणे" त्या क्लार्कला ते खरेच वाटेना. तो म्हणाला: "अहो, काय माझी गंम्मत करतां आहांत की काय?" तो वृद्ध ऊत्तरला: अजिबात नाही." त्या वृद्धाच्या करारी मुखावरचे स्मितच सारे कांही सांगुन गेले.




 Waldorf-Astoria Hotel  ( Then )







 Waldorf-Astoria Hotel ( Now )



तो वृद्ध माणुस म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नव्हता तर जगप्रसिद्ध हाटेल Waldorf-Astroria Hotel चा मालक William Waldorf Astor हाच होता. आणि तो नशिबवान क्लार्क म्हणजे त्या जगप्रसिद्ध हाटेलचा पहिला व्यवस्थापक George C Boldt  हा होता.




William Waldorf Astor 




 George C Boldt 


त्या वादळी रात्री अजाणतेपणाने केलेल्या एका सत्कृत्याचे फळ असे मिळेल अशी त्याच्या नशिबाने देखील कल्पना केली नव्हती. तर तो सामान्य माणुस कशी करणार?

शेवटी आयुष्याचे तंतोतंत आणि बिनचुक मोजमाप हे तुम्ही आयुष्यांत काय आणि किती मिळविले आहे त्यापेक्षां किती लोकांचे भले केले आहे ह्यावरच अवलंबुन असते नाही कां?

---------------------------------------------------------------------------------------------------------

एका सत्यकथेचे स्वैर मराठीकरण
शशिकांत पानट
९ जानेवारी, २०१३

मुळ  ईंग्रजी  कथा 





Here is the original Story


One stormy night many years ago, an elderly man and his wife entered the lobby of a small hotel in Philadelphia. Trying to get out of the rain, the couple approached the front desk hoping to get some shelter for the night.

"Could you possibly give us a room here?" the husband asked. The clerk, a friendly man with a winning smile, looked at the couple and explained that there were three conventions in town.

"All of our rooms are taken," the clerk said. "But I can't send a nice couple like you out into the rain at one o'clock in the morning. Would you perhaps be willing to sleep in my room? It's not exactly a suite, but it will be good enough to make you folks comfortable for the night."

When the couple declined, the young man pressed on. "Don't worry about me. I'll be just fine here in the office," the clerk told them. So the couple agreed.

As he paid his bill the next morning, the elderly man said to the clerk, "You are the kind of manager who should be the boss of the best hotel in the United States. Maybe, someday I'll build one for you."

The clerk looked at them and smiled. The three of them had a good laugh.

As they drove away, the elderly couple agreed that the helpful clerk was indeed exceptional, as finding people who are both friendly and helpful isn't easy.

Two years passed. The clerk had almost forgotten the incident when he received a letter from the old man. It recalled that stormy night and enclosed a round-trip ticket to New York, asking him to pay them a visit.

The old man met him in New York, and led him to the corner of Fifth Avenue and 34th Street. He then pointed to a great new building there, a palace of reddish stone, with turrets and watchtowers thrusting up to the sky.


"That," said the older man, "is the hotel I have just built for you to manage."


"You must be joking," the young man said.

"I can assure you I am not," said the older man, a sly smile playing around his mouth.

The older man's name was William Waldorf Astor, and the magnificent structure was the original Waldorf-Astoria Hotel.


The young clerk who became its first manager was George C. Boldt. This young clerk never foresaw the turn of events that would lead him to become the manager of one of the world's most glamorous hotels.
Life is more accurately measured by the lives you touch than the things you acquire.






==============================================

९-११ च्या सत्य घटनेवर आधारित एक कथा
 
"डेल्टा-१५"
( अकरा वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेची हकीकत एका फ़्लाईट-अटेंडंटकदूनच ऐका: )
आज दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून  निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले. आम्हा फ़्लाईट अटेंडंटना प्रवासी मंडळींनी असेच करायला हवे असते. कारण बहुतेक प्रवासी बिचारे आपापल्या धंद्यासाठी प्रवास करीत असतात आणि कांही आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असतात. पण ते कुणीही असले तरी त्यांना हवी तशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. शिवाय ते असे सुस्तावले की आम्हा विमानांतल्या नोकर वर्गाला ईतर कामे आटपायची असतात त्याला संधी मिळते. ज्यांना आतापर्यंत ’ब्रेक" मिळाला नसेल तो त्यांना घ्यायचा असतो. (होय, आम्ही प्रवासांत असलो तरी ख-या अर्थाने ’कामावर’ असतो नाही का, त्यामुळे नियमांप्रमणे प्रत्येक दोन तासांच्या ऊड्डाणानंतर आम्ही १५ मिनिटांची विश्रांती घेणे हे आवश्यक असते)
माझीही आता विश्रांतीची वेळ झाली होती. मी माझ्या सीटवर बसणार तेव्हढ्यांत मला काकपिटचा पडदा हललेला दिसला आणि मला ताबडतोब आंत जावून क्याप्टनला भेट असा निरोप मिळाला. असा निरोप मला नेहमीच मिळतो पण आज त्या निरोप देणा-या माझ्या सहाय्यकाच्या चेह-यावर ईतका
सीरीयस भाव होता की माझ्या मनांत क्षणार्धात शंका-कुशंकांची पाल चुक- चुकून गेली. अर्थात मी तांतडीने आंत गेलो. माझ्या हातांत एक प्रिंटेड मेसेज देण्यांत आला, क्याप्टनच्या चेह-यावर "All Business अशाच भावना होत्या. डेल्टाच्या अटलांटामधल्या मुख्य कार्यालयांतून आलेला तो मेसेज मी वाचला.
"All airways over the Continental United States are closed to commercial air traffic. Land ASAP at the nearest airport. Advise your destination"
त्या मेसेजविषयी एक चकार शब्दही कुणी काढला नाही. आलेली सुचना निमुटपणे, शिस्तशिर आणि कोणताही प्रतिप्रश्न न विचारता पाळणे एव्हढेच आमचे कर्तव्य होते. किंबहुना आम्हाला तसेच शिक्षण मिळाले होते. एव्हढे मात्र खरे की कांहीतरी भयंकर प्रकार घडत असला पाहिजे त्याशिवाय का अमेरिकेने सर्व देश विमान वाहातुकीसाठी असा अचानक आणि कोणतीही पूर्व सुचना न देता बंद केला? ते कांहीही असले तरी आता ह्या क्षणी आम्हाला जवळांत जवळ कोणता विमानतळ आहे, तो शोधून तेथे ऊतरायची परवानगी मागण्याचे सोपस्कार करणे आवश्यक होते. त्यानंतर केलेल्या आम्हा सा-यांच्या प्रयत्नानंतर कळले की अगदी जवळचा विमानतळ Gander-New Found land येथे आमचेपासून केवळ ४०० मैलच दूर आहे.




आम्ही ताबडतोब Canadian Traffic Controller शी संपर्क साधला. त्यांना आमचा मार्ग बदलला आहे ह्याची माहिती देवून Gandar  ला ऊतरण्याची परवानगी मागितली. कोणतेही प्रश्न न विचारता त्यांनी ती परवानगी ताबडतोब दिली. आम्हाला मोठे आश्चर्यच वाटले की त्यांनी एकही प्रश्न न विचारता अशी एकदम परवानगी दिलीच कशी? मात्र त्याचे ऊत्तर आम्हाला पूढील कांही क्षणांतच मिळाले. कारण आमच्या हेड आफिसहून दुसरा मेसेज आला की न्युयार्क भागांत कांही टेरोरिस्ट घटना घडत आहेत. आता आम्हाला पूर्ण ऊलगडा झाला आणि कल्पनाही आली की आमच्यावर काय ऒढवले आहे ते!
मी काकपिटच्या बाहेर आलो. सर्व प्रवासी मंडळी सुस्तावली होती. आणि शांतपणे नित्यकामांत वावरत होती. ह्या सर्व मंडळींना हे सारे कसे सांगावे असा विचार करीत होतो. खरे सांगितले असते तर जो गोंधळ ऊडाला असता त्याची कल्पनाच करवली जात नव्हती. बराच विचार करून त्यांच्याशी "खोटे" बोलायचे ठरविले. "विमानाच्या एका महत्वाच्या Instrument मध्ये बिघाड झाल्याने जवळच्या Gander ह्या विमानतळावर आपल्याला ऊतरल्याशिवाय तरणोपाय नाही.  विमानतळावर ऊतरतांच आम्ही अधिक माहिती कळवू" हे सारे ऐकल्यावर नाराजीचे अनेक उदगार ऐकायला आले. त्यांची परत परत क्षमा मागून आम्ही ते वातावरण निमवले. अशा प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. मात्र बहुतेक प्रवासी खूपच समजुतदार असल्याने सुदैवाने तेव्हढ्यांतच निभावले.
जवळ जवळ तासाभराने म्हणजे साधारणपणे दुपारी साडेबारा वाजता (EST)  आम्ही Gander ला ऊतरलो. बघतो तो काय, त्या छोट्याश्या विमानतळावर आमच्या आधी २० विमाने आधीच ऊतरली होती. आमचे विमान थांबताच प्रवाश्यांना खरे कारण सांगणे आवश्यक होतेच. आमच्या क्याप्टनने पीए सीस्टीमवर सुचना केली: "सभ्य स्त्री-गृहस्थहो, आपण ईतरही अनेक विमाने ह्या लहानश्या विमानतळावर ऊतरलेली पहात आहोत, त्या सा-यांनाच आपल्या विमानासारखे Instrument Problem आहेत की काय असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल, परंतू सत्य-स्थिती अशी आहे की आपण ऊतरलो त्याला दुसरेच कारण आहे." ह्यानंतर क्यापटनने आतापर्यंत झालेल्या सर्व घटनांची यादी वाचली. ती ऐकून प्रवाश्यांत संमिश्र विचार ऊठत होते. मात्र हे सारे आपल्या संरक्षणासाठीच चालले आहे ह्याची मनोमन जाणीव त्यांना येत होती.






अशा ह्या वातावरणांत आपण आता धांवपट्टीवरच कांही काळ थंबणर आहोत ही सुचना पण आम्ही केली. प्रवाश्यांची मनस्थिती हळू हळू तयार होत असावी. हे सारे अतिशय गैरसोयीचे होते तरीही ते आपल्या भल्यासाठी आहे ह्याची त्यांना जाणीव होत असावी त्यामुळे प्रवासी मंडळींकडून फारशी ऊग्र प्रतिक्रिया ऊमटली नाही. ते बिचारे निमूटपणे सारे सहन करीत होते. काहींनी आपापले सेल फोन लावून अमेरिकेत नेमके काय घडते आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र Out of Area  मुळे त्यांना सिग्नल मिळाला नाही. ज्यांना तो मिळाला ते फार तर कनेडीयन आपरेटरशी बोलू शकले. त्यांनी "सर्व सिग्नल मिळत नाहीत, परत प्रयत्न करीत राहा"  असा बहुधा ’पूर्व-नियोजित’ सल्ला दिला. क्यापटनला विमानाच्या रेडिओ वरून जेव्हढी माहिती मिळायची तेव्हढी आम्ही वेळोवेळी त्यांना स्पीकरवरून सांगत असू. पूढील तासा दोन तासांत विमानतळावर अजून ३२ विमाने ऊतरली आणि विमानांची संख्या ५२ वर पोहोचली तेव्हां मात्र सर्वांची मन:स्थिती फारच हेलावली. त्यातली २७ विमाने अमेरिकेची होती. अशा वेळी त्यांना धीर देण्यापलीकडे आम्ही कांही अधिक करू शकलो नाही. विमानतळावरील पोलिसांच्या गाड्या आमच्या विमानाला चकरा मारून जात होत्या मात्र विमानाखाली ऊतरायला परवानगी नव्हती. ’न्युयार्कला माणसे मरत आहेत निदान आपण येथे परक्या देशांत जमीनीवर आहोत, जीवंत आहोत, थोडा त्रास होत असला तरी हरकत नाही पण जीव तरी वाचला आह” असे सर्वांचे विचार असावेत. विमानाच्या कारीडरमधून फिरतांना प्रवासी असे कांहीसे बोलत असलेलेही मी ओझरते ऐकले होते.
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. दुपारी साडेबारा वाजता ऊतरलेले आमचे विमान अजून धांवपट्टीवरच होते.





आता मात्र प्रवाश्यांच्या सहनशीलतेचा अंत होत होता. तशांत बातमी आली की ऊद्या सकाळी ११ वाजता आमच्या विमानाचा नंबर लागेल व आम्हाला खाली ऊतरायला मिळेल.
एकाच जागी गेले सहा तास बसून सर्वांचे अंग अगदी आंबून गेले होते. तशांत आता अजून१७ तास कसे बसणार? थोडी कुरकुर होतच होती. मात्र त्यातल्या कांही समंजस प्रवाश्यांनी ईतरांना धीर दिला आणि तशाही परिस्थितीत विमांनात रात्र कशी काढायची त्याची आम्ही तयारी (मानसिक देखील) केली. मधल्या वेळेत विमानतळावरील हापिसर येवून गेले. आम्हाला ताजे पाणी, औषधे तसेच तात्पुरत्या संडासाची व्यवस्था करून गेले. आमच्या विमानांत एक ३३ आठवडे ऊलटून गेलेली गरोदर स्त्री होती. तिची रात्री झोपायची व्यवस्था कांही प्रवाशांनी स्वत:ची गैरसोय होत असतांनाही केली. मानवतेचे ते मुर्तीमंत ऊदाहरण पाहून कित्येकांच्या डोळ्यांत अश्रु आले. अतिशय गैरसोयीने का होईना पण रात्र पार पडली.
विमानतळाने दिलेल्या वेळेप्रमाणे सकाळी बरोबर साडे दहा वाजतां तेथल्या 12th School of Convoy च्या बसेस आम्हाला घ्यायला आल्या. शेवटी विमान ऊतरल्यापासून जवळ जवळ २३ तासांनी आम्ही आमचे पाय जमीनीला लावले. त्यांनी आम्हाला विमानतळावर नेले. तेथे Immigration Custom हे सोपस्कार होवून आम्हा सर्वांना Red Cross मध्येही register करावे लागले. त्या वेळी आम्ही सर्व प्रवाश्यांना सांगितले की "ह्या गांवात आपली राहाण्याची तात्पुरती सोय केली जाणार आहे. पूढील सुचना मिळेपर्यंत आपण येथेच राहायचे आहे". बिचारे प्रवासी, निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय ते तरी काय करू शकणार होते?









आमचे विमान ज्या गांवांत ऊतरले होते (Gander) ते अतिशय लहानसे असे गांव होते. ह्या गांवाची लोकसंख्या फक्त १०,४०० होती. आणि आज ५२ विमानांतून १०,५०० प्रवासी आले होते. एका रात्रीत गांवाची लोकसंख्या दुप्पट होण्याचा त्या गांवाच्या आयुष्यांत हा "न भुतो, न भविष्यती" असा क्षण आला होता. परंतू जसे जसे आम्ही त्या लहानशा विमानतळावर आवश्यक असलेले सोपस्कार (Custom, Immigration, Red Cross Registration etc.) करू लागलो तसे एक प्रकर्षाने लक्षांत आले की सारे कांही एखाद्या पटाईतासारखे चालले होते. अतिशय शिस्तपूर्वक रीतिने प्रवासी आणि विमानाचे कर्मचारी ह्यांची यादी बनविली जात होती. आम्ही विमानाचे कर्मचारी म्हणून आम्हाला एका विमानतळाच्या नजिकच्या छोट्या हाटेलमध्ये ठेवले. तिथे गेल्यावर पहिली गोष्ट केली आणि ती म्हणजे आम्ही ताबडतोब टीव्ही लावला आणि न्युयार्कच्या त्या दुर्घटनेचे पहिले भयानक दर्शन घडले. आम्ही जरी ते दृश्य २४ तासांनी पहात होतो तरी दूरदर्शनाच्या माध्यमांतून हल्ला केव्हां आणि कसा झाला, मारेकरी कोण होते, वगैरे सर्व हकीकत परत परत दाखवित होते. शरीरावर एखादी खोलवर झालेली जखम पुन्हा पुन्हा ऊघडून जशा यातना होत होत्या तशा ते दृश्य पाहून होत होत्या. ते सारे पाहून रक्ताचा आणि रागाचा पारा वर चढत होता पण झाल्या गोष्टीला आता कांही ईलाज नव्हता.
त्या लहानशा गांवाने मात्र आमचा पाहूणचार ऊत्तम रीतिने केला. कोण कुठले आम्ही, परंतू त्यांनी जणू काही Thanksgiving च्याच सणाला आपले नातेवाईक आले आहेत की काय अशा पद्धतीने आमचे आगत स्वागत केले जात होते. आम्हाला मोठ्या अभिमानाने त्यांचा गांव दाखविला जात होता. जवळची ठिकाणे देखील दाखविली जात होती.







तब्बल दोन दिवसांनी आम्हाला परत येण्याची परवानगी मिळाली. आम्ही सारे विमानतळावर भेटलो. साहाजिकच प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. तो ऐकल्यानंतर मात्र आम्ही सारेच आश्चर्य-चकित झालो. ह्या इवल्याश्या गांवाने आम्हां अनोळखी लोकांची जी बडदास्त ठेवली त्याला तुलनाच नव्हती.






आपल्या गांवामध्ये आमच्यासारखे असे आगंतुक पाहुणे येणार हे कळतांच जवळपासच्या म्हणजे ७५ किलोमीटरच्या परीसरांतील गांवे एकत्र आली. प्रत्येक गांवातले हायस्कुल बंद केले गेले. मीटींग हाल्स, लाजींग-बोर्डींगच्या जागा, आणि ईतर मोठ्या जागा प्रवाशांच्या राहण्यासाठी ऊपलब्ध करून दिल्या गेल्या. गांवातील लोकांनी असतील नसतील तेव्हढ्या गाद्या, ऊश्या, स्लीपींग ब्यागा आणविल्या आणि प्रवाशांना रात्रीच्या शांत झोपेची सोय करून दिली. हायस्कुलमधल्या प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम केले. आमच्या विमानांतील २४८ प्रवाशांची तर ४५ मैल दूर असलेल्या Lewisport नांवाच्या खेड्यांत व्यवस्था केली, एव्हढ्या लोकांना तेथे नेण्यासाठी स्वत:च्या खाजगी गाड्या वापरल्या. इतकेच नव्हे तर स्त्रि-प्रवाशांपैकी जर कांही स्त्रियांची इच्छा इतर स्त्रि-प्रवाशांबरोबरच राहावी अशी असली तर ती देखील व्यवस्था हंसतमुखाने केली. सर्व कुटूंब मिळून प्रवास करणा-या प्रवाशांना एकत्र ठेवले त्यांची ताटातूट केली नाही. खूप वयस्कर मंडळींची (Senior Citizens) काळजीपूर्वक रीतिने खाजगी कुटूंबांत व्यवस्था केली गेली.
हो, आणि ती गरोदर बाई आठवते ना? तिची व्यवस्था एका खाजगी घरांत तर केलीच केली, परंतू तसे करतांना ते घर २४ तास ऊघडे असणा-या हास्पीटलच्या जवळ आहे ह्याची देखील खात्री केली गेली. गांवातल्या एकुलत्या एका दांताच्या डाक्टरला आणि दोन जनरल नर्सेसना गरज लागेल त्या प्रमाणे सर्व प्रवासी त्या गांवात असे पर्यंत २४ तास सेवेसाठी हजर राहाण्याची व्यवस्था केली.
आणि एव्हढी ही सेवा कमी पडते आहे की काय म्हणून प्रवाशांना अमेरिकेत अथवा जगांत कुठेही दिवसांतून निदान एकदा तरी टेलीफोन करता येईल अशी व्यवस्था केली. दिवसभरांत प्रवासी नुसते बसून काय करणार म्हणून त्यांचे लहान लहान गृप करून त्यांना जवळ पासची ठिकाणे दाखविली गेली. जवळपासच्या लेकवर त्यांना पिकनिकला नेले. ज्यांना आवड आहे अशा लोकांना जवळच्या जंगलांत हायकिंगसाठीही नेले. गांवांतील बेक-या २४ तास चालू ठेवून प्रवाशांना २४ तास गरमागरम ब्रेड पुरविण्यांत आला. घरोघरी अन्न शिजविले गेले आणि आपल्याकडे भारतात भंडा-याच्या दिवशी ते सगळ्यांना वाढले जाते तसे वाढले गेले, ज्यांना तेही नको असेल, अशा लोकांना गांवातल्या मोजक्याच रेस्टारंटमध्ये आपल्या गाडीने नेवून जेवावयास घालण्यात आले, इतकेच नव्हे तर सर्व प्रवाशांचे कपडे विमानावरच राहिले असल्याने (आम्ही प्रवाशांना सामान विमानांतच ठेवायला सांगितले होते) त्यांच्या तात्पुरत्या कपडे धुण्याची व्यवस्था स्थानिक लांड्रीम्याटमध्ये मोफत करण्यांत आली, आता बोला!
प्रत्येक प्रवासी आपल्या डोळ्यांतले अश्रु आवरता आवरता ही सारी हकीकत सांगत होते. विमानतळ आता परतीची विमाने नेवू शकतील असे कळतांच त्या गांवात ऊतरलेले सर्व प्रवासी सुखरूपपणे विमानतळावर पोहोचवून देण्यांत आले तेव्हां कुठे त्या खेड्यातल्या मंडळींना हायसे वाटले.
विमानतळावर दहा हजार प्रवाशांनी एकदम गर्दी केल्यानंतरही अजिबात गोंधळ नव्हता. कोणता प्रवासी कोणत्या विमानांत, आणि ते विमान कोणत्या वेळेला निघणार ही माहिती तेथले गांवकरी विमानतळावरील स्थानिक हापिसरच्या मदतीने अतिशय आस्थेने आणि मोठ्या आदबीने अगदी अचूकतेने पुरवित होते.
हे सारेच माझ्या आकलनाबाहेर होते. माझ्याच नव्हे तर सा-या प्रवाशांच्याही आकलनाबाहेर होते. हे गांव ते किती लहान, त्यांत तरुण आणि कामे करणा-यांची संख्या ती किती परंतू कधी नव्हे त्या आपल्या गांवांत आलेल्या आमच्यासारख्या अतीथींना ह्या गावाने "अतिथी देवो भव" ह्या मंत्राने भारून टाकले होते. ह्या आमच्या नुकतीच ओळख झालेल्या मित्रांनी सेवाभाव ह्या एकाच जयघोषांत आख्खी गांव-पंढरी दुमदुमून टाकली होती. जणू अतिथींच्या रूपाने आपल्या गांवात गंगाच आली आहे आणि तिची सेवा करणे हे आपले आद्द्य कर्तव्य आहे अशा भावनेने त्यांनी सेवा तर केली होतीच परंतू पंढरीची वारी परततांना वारक-यांच्या डोळ्यांत जसे निरोपाचे अश्रु येतात तशाच अश्रुभरल्या नयनांनी आम्हाला निरोप द्यायला आले होते-पुन्हा कधीही न दिसणा-या आम्हाला निरोप द्यायला आले होते. कोण कुठले आम्ही-आम्हाला हृदयाशी कवटाळत होते, अश्रुंचा अभिषेक करीत होते. मानवतेच्या त्या एका सुक्ष्म तरीही अतूट अशा धाग्याने आम्ही बांधले गेलो होतो.
तीन दिवसापूर्वी आम्ही ह्याच विमानांतून ज्या मन:स्थितीत ऊतरलो होतो ती आणि आज त्याच विमानावर आम्ही परतलो ती ह्यांत जमीन अस्मानाचे अंतर होते. सर्व प्रवासी मिळालेल्या अनोख्या आनंदाने बेहोष झालेले होते, जणू एखाद्या अनामिक बेटावर सुटी घालवून परत फिरतांना असते तशी त्यांची मनोवृत्ती होती. त्यांच्या एका डोळ्यांत गांवच्या लोकांनी दिलेला आगळ्या वेगळ्या अनुभवाचा आनंद होता तर दुस-या डोळ्यांत कृतज्ञतेच्या पापण्या भिजविणारी मानवतेची एक निष्ठाही होती. त्या गांवच्या निरोप द्यायला आलेल्या शेकडो हातांना, अगदी शेवटचा हात दिसेपर्यंत आम्ही सर्वांनी निरोप दिला. आयुष्यांत परत कधीही न भेटणा-या त्या सर्वांना आमचं हृदय धडधडत का होईना पण निरोप देत होतं.








विमानाने धांवपट्टी सोडली, ते हात दूर एखाद्या ठिपक्यासारखे वाटून दिसेनासे झाले आणि आमच्यापैकी कांही मंडळींच्या मनाचा बांध फुटला,
त्यांना भडभडून आलं. शेजारच्या सीटवर बसलेल्या मित्रांनी त्यांचं जमेल तेव्हढं सांत्वन केलं.
तेवढ्यांत एक अनपेक्षित घटना घडली. विमानांतला एक प्रवासी माझ्याकडे आला आणि म्हणाला: "मी जरा दोन मिनिटे पीए सिस्टीमवर बोलू कां?". विमान-कंपनीच्या पीए सिस्टीमवर खाजगी मंडळींना बोलायची परवानगी नाही हे माहित असून देखील मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. ह्या गुन्ह्यासाठी कदाचित माझी नोकरी देखील गेली असती. परंतू त्या क्षणी मी अशा साधक-बधक विचारांच्या पलीकडे वावरत होतो.
त्या माणसाने बोलायला सुरुवात केली. त्याच्या स्पष्ट आणि काहीशा खड्या आवाजांत त्याने सर्वांना गेल्या तीन दिवसांत त्या लहानशा खेड्यांतून मिळालेल्या ऊत्तम सेवेबद्दल आठवण करून दिली. कोणत्याही प्रकारच्या नात्याने बांधलेले नसतांनाही त्या गांवातील परक्या लोकांनी केवळ माणुसकीच्या नात्याने सर्वांना दिलेली वागणूक किती ऊत्तम होती हे सांगून तो पूढे सांगू लागला: ---" अशा माणुसकीच्या वागणुकीला, कृतज्ञतेला आपण योग्य ते प्रत्रुत्तर द्यायलाच हवे, म्हणजे आपणही त्यांच्यासाठी कांहीतरी केल्याचे समाधान आपल्याला मिळेल. तेव्हां माझ्या मनांत असा एक विचार आला आहे की आपण Delta 15 च्या नांवाखाली एक Trust Fund ऊघडू या.  त्या फ़ंडांतून आपल्याला ज्या विद्द्यार्थ्यांनी शाळा आणि अभ्यास बूडवून मदत केली त्यांच्यासाठी कालेजची शिक्षणाची, स्कालरशिपची व्यवस्था करू या." ह्या त्याच्या बोलण्याला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तेथल्या तेथे एक कागद फिरवून सर्व प्रवाशांनी १४,००० डालर्सपेक्षांही अधिक रक्कम जमा केली.
त्यानंतर दुसरी आश्चर्याची गोष्ट घडली आणि ती म्हणजे त्या व्यक्तीने तेव्हढ्याच रकमेची त्यांत भर घातली. तो माणुस व्हर्जिनीया राज्यांतला एक डाक्टर होता. त्याने त्या सर्व रकमेची जबाबदारी तर घेतलीच परंतु डेल्टा एयर लाईनीशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही योग्य ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करीन असे अश्वासन दिले. सुदैवाने त्याला योग्य तोच प्रतिसाद मिळाला.
आता जरी ह्या घटनेला दहा-अकरा वर्षे झाली असली तरी आतापर्यंत ह्या फंडांत दीड मिलियन डालर्स जमा झाले आहेत आणि आजतागायत त्या लहानशा गांवातल्या १३४ विद्द्यार्थ्यांना त्या रकमेतून कालेज शिक्षण दिले गेले आहे. त्यांचे आयुष्य घडविणारा बदल अगदी निश्चितपणे झाला आहे. आणि अजून तो होत राहील, कारण आजही इतक्या वर्षांनी देखील फंडांतली रक्कम वाढतेच आहे.
आज ९-११ च्या दहाव्या वर्धापनदिनी ही हकीकत तुम्हाला सांगतांना माझे मन त्या आठवणींनी आजही भरून येते. जगांत अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे, दु:ख्खाच्या वेळी धांवून येणारी माणसे आहेत, अश्रु पुसणारे हात अद्द्यपही शिल्लक आहेत. रोजच्या व्यवहारांत आपण वाचलेल्या बातम्या अथवा दूरदर्शनवर पाहिलेले फसवाफसवीचे प्रकार हे जगांत आहेत, परंतू ते मर्यादित आहेत. जगांत चांगुलपणा भरलेला आहे, मात्र त्याकडे डोळस नजरेने पाहाण्याची दृष्टी मात्र पाहिजे. संकटं पावसाच्या सरी सारखे एकामागून येत असतात पण पावसाबरोबर जसा मृदगंधही येत असतो तसच संकटांमधून आपल्याला बळकटपणा आणणारा हुंकार देखील येतो. आयुष्यांतल्या अधिक कठीण संकटांना तोंड द्यायला आपण तयार होतो, "आपण घडतो", हेही खरं आहे नाही का? किंबहुना संकटच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवितात.
साई बाबा एकदा असं म्हणाले होते की: "प्रार्थना करणा-या ओठांपेक्षां मदतीसाठी पूढे केलेला हात पवित्र असतो" आणि हे आम्ही सर्व प्रवाशांनी आयुष्यांत प्रत्यक्ष अनुभवले आहे.
Julia Fletcher Carney (1823-1908) American Teacher once said:
Little deeds of kindness
Little words of Love
Help to make  earth happy
Like the heaven above
पृथ्वीच्या पाठीवर एका ठिपक्यासारख्या असलेल्या त्या लहानशा गांवातील गांवक-यांनी त्यांना अगदी अपरिचित, अनोळखी अशा आमच्यासाठी त्या तीन दिवसांत ह्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला होता हे आयुष्यभर माझ्या आणि सह प्रवाशांच्या कायमचे लक्षांत राहील ह्यांत शंकाच नाही. ईश्वर त्यांना सुखी ठेवो!
--डॆल्टा १५ चा एक सुदैवी फ्लाइट अटेंडंट
शशिकांत पानट









------------------------------------------------------------------------------


श्री

                                  मार्च १५, २०१२





माधुरी-हार्दिक अभिनंदन!





सौ. पद्मश्री माधुरीस:
 ७ मार्चला लंडन येथे Madame Tussauds  च्या भव्य प्रासादांत झालेल्या तुझ्या Wax च्या पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्त तुझे हार्दिक अभिनंदन करणे हा ह्या पत्राचा ऊद्देश्य आहे.




गेली जवळ जवळ दोन तपे हिंदी सिनेमा सृष्टींत तू अतिशय दिमाखाने चमकते आहेस. वयाच्या केवळ १७ व्या वर्षीच "अबोध" ह्या हिंदी चित्रपटांतुन तुझ्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हांपासून ते आजही तू हिंदी चित्रपटसृष्टी गाजवते आहेस. त्याकाळी चित्रपटांत पहिल्यांदाच काम करणा-या अभिनेत्याला/अभिनेत्रीला क्वचितच प्रसिद्धी मिळाली असेल, परंतू तू मात्र एखाद्या कसलेल्या अभिनेत्री प्रमाणे भूमिका वठवून वर्तमानपत्रांकडून आणि चिकित्सक अशा परिक्षकांकदून तसंच चित्रपटशौकिनांकडून शाबासकी मिळविलीस आणि "हम भी कुछ कम नही" ह्या आत्मविश्वासपूर्वक पावलानं तुझ्या चित्रपटांतल्या भविष्याची पावलं रोवलीस. आज विशेषत: मागे वळून पाहातांना तर ते अधिकच प्रकर्षानं लक्षांत येतं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. चित्रपट निर्मात्यांची तुझ्या घरासमोर रांगच लागली. आणि चित्रपटांतलं तुझं भवितव्य तुझ्यापेक्षां त्यांनाच जास्त भावलं की काय असं वाटायला लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतरचा तुझा १९८८ मधला "तेझाब" हा चित्रपट तुला किर्तीच्या शिखरावरच घेवून गेला. पूढील दोन शतकांत प्रत्येक वर्षी निदान एक चित्रपट अशा क्रमाने तू एकापेक्षां एक ऊत्तमोत्तम भूमिका बजावलेले चित्रपट निर्माण केलेस. राम-लखन (१९८९), दिल (१९९०), साजन (१९९१), बेटा (१९९२), खल-नायक (१९९३), हम आपके है कौन? (१९९४), राजा (१९९५), आणि दिल तो पागल है! (१९९७) अशा एक ना अनेक चित्रपटांतल्या तुझ्या भूमिकांनी सा-या देशांतल्या चित्रपट शौकिनांना तू तृप्त केलेस.








मला असं वाटतं की १९९७ हे वर्ष तुझ्या आयुष्यातलं महत्वाचं वर्ष असावं! कारण "दिल तो पागल है, ह्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर त्याच वर्षी तू " मृत्युदंड" ह्या चित्रपटांत अतिशय महत्वाची भूमिका केलीस. त्या चित्रपटाला "Best Feature Film at the cinema Tout Ecran in Geneva" , The Bangkok Film Festival and the Sansui Awards (Critics Choice) ही पारितोषिकं देवून सन्मानित करण्यात आलं. ह्या भूमिकेसाठी तुला "Best Actress award at the star Screen Awards and Sansui Awards" हे मिळणं योग्य आणि क्रमप्राप्तच होतं.

परंतू खरा कळस झाला तो तुझ्या २००२ मधल्या "देवदास" मधल्या भूमिकेमुळे की ज्यामुळे तुला Best Supporting Actress, Film Fare award" मिळाले. त्यानंतरही तुझी चित्रपटांतली घोडदौड चालूच राहिली. २००७ मध्ये "आजा नाच ले" मध्ये तुझ्या निर्भिड आणि प्रामाणिक परिक्षणामुळे तुला रसिकांनी "Extra-Ordinary and Riveting" अशा पारितोषिकांनी सन्मानित केले.

पण माधुरी, तुझी चित्रपटांतल्या कारकिर्दीची खरी सुरुवात तुझ्या "Classical Indian Dance" ने झाली हे मात्र खरे! कथ्थक मधले तुझे नैपुण्य वाखाणणासारखेच आहे. तुझ्या ह्या नैपुण्यामुळे ज्या ज्या वेळी चित्रपटांतली गाणी आणि त्यावर तुझे नृत्य झाले ती ती सर्वच्या सर्व गीतं खूप लोकप्रिय झाली. आणि आज देखील ती तितकीच लोकप्रिय आहेत. वानगीदाखलच सांगायचं तर "एक दो तीन" (तेझाब),  "बडा दुख दिया" (राम-लखन), "धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), चोली के पीछे क्या है? (खलनायक), "दिदी तेरा देवर दिवाना" (हम आपके है कौन?, "आंखियां मिलाउ" (राजा), "पिया घर आया" (याराना), "क्ये सेरा (पुकार)," मार डाला" (देवदास), ही आणि ईतर कितीतरी सांगता येतील.  








केवळ चित्रपटापुरताच तुझा आवाका नाही. सर्व साधारण लोकांना नसलेली माहिती देखील मी तुझ्या परवानगीनं देतो. जी तुझी दुसरी बाजू आहे आणि लोकांना ती फारशी माहिती नाही. ती म्हणजे तुझ्या अथक समाज कार्याची. HIV/AIDS ह्या भयानक रोगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला महाराष्ट्र सरकारला तू मदत केली आहेस, (Awareness Education Campaigns), बेघर मुलांच्यासाठी (Homeless Children-Pune) ह्यांच्यासाठी तू कार्यरत होतीस, आसाम मध्ये हत्तींवर केल्या जाणा-या कृर वागणूकीसाठी तू PETA ह्या संस्थेसाठी कार्य केले आहेस, ईतकच नव्हे तर सुरत येथल्या भूकंपानंतर "कौन बनेगा करोडपती?" च्या मंचावरून Gujarat Earthquake Relief Fund  ह्या संस्थेला त्यावेळी भूकंपग्रस्तांसाठी अगदी आवश्यक असलेला निधी तू मोठ्या आस्थेनं जमवून दिला आहेस. केवळ चित्रपटाच्या  माध्यमांतून आणि मनोरंजनांतून लोकसेवा मर्यादित न ठेवतां, वर ऊल्लेखिल्याप्रमाणे अनेक भरीव कार्ये केली आहेस, त्यावरून तुझ्या दयाळू स्वभावाची, तुझ्या अंत:करणांत असलेल्या समाजाच्या प्रेमाची ज्योत तू चित्रपटाच्या प्रखर ऊजेडांत देखील तेवत ठेवली आहेस यांत शंकाच नाही. त्यामुळेच कदाचित त्या प्रखर ऊजेडांत सर्व साधारण जनतेला ती प्रेमाची तेवत असलेली पणती नजरेस पडली नसावी. 








आयुष्याच्या मार्गावरून प्रवास करतांना प्रत्येक व्यक्तीला आपण नेमकं काय मिळवितो आहे ह्याची जाणीवपूर्वक कल्पना क्वचितच असते. मला वाटतं की तो हिशेब ईतरांनीच करायचा असतो की काय न कळे! कधी कधी आपण आपल्या प्रवासांत आपलं ध्येय मिळविण्यासाठी इतके गुंतलेलो असतो की त्या ध्येयाशिवाय अन्य काही दिसतच नाही. अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळाच दिसत होता त्याप्रमाणे! तुझ्या बाबतीत देखील असच कांहीसं झालेलं आहे असं मला वाटतं. यशाची गुरुकिल्ली सहजासहजी हाती लागत नाही. मला असं वाटतं की यश हे एखाद्या फुलपांखरासारखं असतं. ते मुद्दाम  पकडायचा प्रयत्न केला तर दूर ऊडून जातं आणि स्वस्थपणे, आत्मविश्वासानं काम करीत राहिलं की ते स्वत:हून तुमच्या जवळ येतं आणि कधी कधी तर ते तुमच्या अंगा खांद्यावर देखील बसतं. तुझ्या आतांपर्यंतच्या यशाचा आढावा घेतला तर एकाच व्यक्तीने एव्हढं गगनाला स्पर्श करणारं यश मिळविलं आहे ह्यावर विश्वासच बसत नाही. पण आज अक्षरश: शेकडो मानचिन्हांच्या रूपानं ते सगळ्यांना स्तिमित करतं आहे.

भारतांत वर्षाकांठी ८०० ते १००० चित्रपट तयार होतात आणि त्यांत हजारो कलाकार काम करतात. त्या हजारो कलाकारांच्या स्पर्धेतून एक नाही, दोन नाही पण १५ वेळा Film Fare Award मिळावे म्हणून तुझी शिफारस झालेली आहे , आणि त्यातली १३ ही Best Actress साठी तर २ Best supporting Actress  साठी अशी आहेत. त्यापैकी तू चार Film Fare Awards हे Best Actress म्हणून पटकावलेले आहेस तर एक Best Supporting Actress म्हणून मिळविलेले आहेस.! सिनेक्षेत्रांत एकाच व्यक्तीने १५  Film Fare Awards साठी शिफारसी मिळविण्याचा विक्रम आणि ऊच्चांक तू सहजासहजी मोडला तो केवळ तुझ्या अंगभूत अभिनयाच्या गुणांमुळेच!. BBC आणि rediff.com ह्या दोन कंपन्यांनी स्वतंत्ररित्या केलेल्या मोजणीत "Greatest Bollywood Actress Ever" हा किताबही तू मिळविला आहेस. हिंदी चित्रपट सृष्टीत "दादा" म्हणून आदराने संबोधल्या गेलेल्या, आपल्या ५० हूनही अधिक वर्षांच्या  चित्रपट कारकिर्दीत अनेक नट्यांची कामे जवळून अभ्यासिलेल्या आणि पाहिलेल्या, श्री. अशोक कुमार ह्या सुप्रसिद्ध नटवर्यानं तुझा ऊल्लेख "First Complete Actress in 100 years of Indian Cinema"  एव्हढ्या आदरपूर्वक केला आहे. आतापर्यंतची तुझी तेजोमय चित्रपट कारकिर्द पहाता, ईतक्या चपखल ऊपमेंत बसणारी अजून ईतर कोणतीही कलाकार त्यांना भारतीय चित्रपटसृष्टींत सांपडली नाही हेच सिद्ध होते.







ह्या जगांत यशाची व्याख्या अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षांत आली की यशाची व्याख्या करता येण हे खूप कठिण काम आहे  कारण ते मोकता येणं कठीण असतं! आणि बहूदा हे तुला माहित असल्यामुळेच ईतरांना अभिप्रेत असणा-या यशाच्या व्याख्येच तू जणू पुन:र्लेखन करते आहेस की काय असं वाटणारं तुझं हे स्वयंप्रकाशित झळाळणारं असं आयुष्य आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. तुझ्या यशाच्या शोधांत, तुला मिळणारी पारितोषिके कमी पडतात की काय म्हणून त्यामध्ये जवळ जवळ रोज नवी नवी भर पडते आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरे अतिशय यशस्वी कलाकार श्री. अमिताभ बच्चन ह्यांच्याशी तुझी तुलना करतांना तुला   "Female Amitabha Bachchan"  हा किताबही लोकांनी प्रेमाने अर्पण केला, Madhuri Magic continues to rule the nation  असं म्हणून लोकांनी त्यांच्या कोट्यावधी ह्रुदयांत तुला  स्थान दिलं. Star TV मधून प्रसारित झालेल्या Kinetic Mega Show ह्यांनी आवाहन केलेल्या मतांमधून तुला Female Megastar of the Millennium" ने सन्मानित केलं तर Zee News Poll तर्फे "Biggest Female Superstar of Bollywood, आणि Forbes ह्या जग प्रसिद्ध मासिकातर्फे तसाच सन्मान मिळविल्यानंतर Guinness Book of World Records मध्ये तुझी नोंद Highest paid Perfect Role Model, अशी झाली नसती तरच नवल!

केवळ कलाकार म्हणून चित्रपटांत काम करणे म्हणजे आपले काम झाले ही तुझी मनोधारणा नाही. चित्रपटाच्या माध्यमांतून सर्व साधारण व्यक्तीची दोन घटका करमणूक करणे हे प्राथमिक ध्येय तर तू साध्य करतेसच, परंतू चित्रपट निर्मात्याला त्याच्या गुंतवणूकीचा पुरेपुर मोबदला मिळतो आहे की नाही हा व्यावसायिक दृष्टीकोन आणि (Investment Angle/Business Objective)  मंत्र तू पाळतेस. त्याचे भरघोस ऊदाहरणच द्यायचे झाले तर मी "झलक दिखला जा" ह्या Show चे देईन. पहिल्या तीन Episode  मध्ये (तू जेव्हां त्याची परीक्षक नव्हती तेव्हां) त्याचे TRP Rating Index खूप खाली होते. ४ थ्या Episode पासून तुला परीक्षक म्हणून पाचारण करण्यांत आले, त्याचा तू नीट अभ्यास केलास, काय आणि कसे बदल करावे लागतील ह्याची काळजीपूर्वक नोंद घेतलीस आणि अहो आश्चर्यम! TRP Rating Index मध्ये कमालीची सुधारणा झाली. पूढील म्हणजे पांचव्या Episode साठी परत परीक्षक म्हणून तुझी निवड झाली त्यांत आश्चर्य ते कसले?     







एव्हढ्या सा-या यशाची मालकी मिळूनही, "विद्द्या विनयेन शोभते" हा मंत्र तू कधीच विसरली नाहीस. तुझावर तुझ्या आई-वडीलांनी केलेले संस्कार, आणि ज्या महाराष्ट्रांत तू वाढलीस तेथल्या बाळबोध वळणाच्या मराठी संस्कृतीचे ऊच्च संस्कार तुझ्या वागण्यामध्ये क्षणोक्षणी प्रतित होतात. तुझ्या वागण्यातली आणि बोलण्यातली नम्रता आणि आदब, ही हिंदी चित्रपटसृष्टींत वावरण्यासाठी आवश्यक असली तरी ती मुळांत तुझ्या मराठी रक्तांतच आहे, त्यांत कोणताही आव आणला जात नाही. यशाच्या ऊच्चासनावर बसण्याची संवय असणारी तू,....तू मात्र आपले पाय जमिनीला लावूनच आपला प्रवास करते आहेस.  चित्रपटसृष्टीच्या प्रखर ऊजेडांत वावरण्याची संवय असणारी तू...तू मात्र प्रसिद्धीच्या प्रकाशापासून दूर राहून आपल्या कलेची सेवा कशी करता येईल हाच विचार सतत बाळगुन आहेस, तुझ्या घुतल्या तांदळासारख्या शुद्ध वागण्यामुळे भारतीय तरूण पीढीसाठी तू एक आदर्श मानली जात आहेस आणि त्याचा योग्य असा सत्कार भारतीय सरकारने तुला "National Citizen Award" देवून केला आहे. म्हणूनच की काय " मै माधुरी दिक्षित बनना चाहती हूं" (I want to become Madhuri Dixit" ) हा चित्रपट मुद्दाम तयार केला गेला आणि तो लाखो युवक/युवतींना मार्गदर्शक ठरला आहे.

तुझ्या अशा ह्या दैदिप्यमान यशाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेजारच्या देशाला भारताचा हेवा वाटला नाही तरच नवल! १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर गेली ६५ वर्षे भिजत घोंगडे पडलेल्या काश्मिरचा प्रश्नावर पाकिस्तानने एक तोडगा सुचविला आहे. "माधुरी दे दो, काश्मिर ले लो" (Give us Madhuri and we will give Kashmir back)  अरे वा! पाकिस्तानला अशा रितीने  तुला अशी "चकटफू" द्यायला आपल्या देशाचे डोके नक्कीच ठिकाणावर आहे! आणि देशाचा प्रदेश तुझ्या "मोबदल्यांत" घ्यायला अथवा द्यायला तू काही एखादे बुद्धीबळाचे प्यादे नाहीस. पण  मला वाटतं माधुरी, तू आपली ईथेच रहा, कारण तू भारताची आहेस, महाराष्ट्राची आहेस. काश्मिरचा गुंता सरकारला त्यांच्या परीने सोडवू दे! आम्हा भारतीयांना तुझा किती अभिमान आहे हे तुला माहित आहेच! त्याशिवाय का त्यांनी ऊत्तर भारतामध्ये  एका रमणीय सरोवराला "माधुरी सरोवर" असे नांव दिले असते? त्याशिवाय का तुला भारतीय सरकारने पद्मश्री किताबाने सन्मानित केले असते? त्याशिवाय का तुला Indian Film Festival Los Angeles ने पारितोषिक देवून सन्मानिले असते? आणि आता तर तुझा मेणाचा पुतळा ऊभारून तुला लंडनच्या Madame Tussauds Museum ने मोठ्या आदबीने मुजरा केला आहे, तुझ्या चित्रपटसेवेची कदर केली आहे.






एका गोष्टीचे मात्र मला सारखे नवल वाटते की वयाच्या चाळिशीमध्येच तू यशाचा एव्हढा मोठा डोंगर चढली आहेस की तुझ्या यशाची बरोबरी
करणा-या व्यक्तीचा जगाच्या इतिहासांत शोध घ्यावा लागतो, आणि तरीही इतक्या कर्तृत्वाची व्यक्ती सहजा सहजी सांपडत नाही. मुळांतच मराठी माणसं कलाप्रिय असतात, त्यांना कलेची जाण असतेच पण त्या बरोबर आयुष्यांत कांहीतरी मिळविण्याची महत्वाकांक्षाही असते. आणि तुलाही अशीच महत्वाकांक्षा असणे हे साहाजिकच आहे. पण राहून राहून एका गोष्टीचे नवल वाटते की "हिंदी" चित्रपटसृष्टीत, की जिथे हजारो हिंदी बोलणारे कलाकार आहेत, एव्हढी मोठी स्पर्धा आहे, त्या ठिकाणी गेली दोन तपे दिमाखाने तळपणारी, आणि आपले स्थान टिकवून ठेवणारी, रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी तू एकमेव मराठी कलाकार आहेस. त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे चित्रपटसृष्टींत काम करण्यासाठी जी गुणवत्ता लागते, ऊपजतच अभिनय यावा लागतो, नृत्य यावे लागते, रंगमंचावर आपले काम करीत असतांना सा-यांना सांभाळून घ्यावे लागते, आपल्याला न आवडलेल्या गोष्टीदेखील हंसतमुखाने सहन करण्याची मन:स्थिती लागते हे आणि असे सारे सारे गुण तू प्रकर्षाने आत्मसात केलेले आहेस.

तुझ्या यशाचा मागोवा घेतांना, म्हणूनच कधी कधी असं वाटतं की तुझा  स्वत:च्या स्वप्नांच्या सौंदर्यावर नक्कीच विश्वास असला पाहिजे. कारण ज्यांना तो असतो त्यांनाच ऊज्ज्वल भवितव्याची शाश्वती असते. आणि तुला हेही माहिती आहेच की केवळ स्वप्नं बाळगून भविष्याकडे जाता येत नाही, मग तेथे पोहोचणं तर मुश्कीलच! त्यासाठी तू आरंभिलेला कर्मयोगच पत्करावा लागतो. एखादा पारधी जसा हरणाचा पाठलाग करीत त्याला सामोरा जातो तसं तू तुझ्या महत्वाकांक्षांना तू सामोरी जाते आहेस, तसं तुझं जीवन आहे आणि तसच जगायला हवं. फरक एव्हढाच की पारधी हरणाला बाणानं घायाळ करतो, प्रसंगी मारतो देखील. तू मात्र एव्हढ्या प्रयत्नानंतर मिळालेल्या त्या यशाची, त्या भवितव्याची, पूजाच बांधते! आणि ती तशीच बांधायची असते, त्याला वाहून घ्यायचं असतं, हे आयुष्याचं हे कठिण गणित भल्याभल्यांना ऊमगलेलं नाही, पण तुला नक्कीच ऊमगलेलं आहे!







तू मिळविलेल्या ह्या दैदीप्यमान यशाने भारावून जावून तुझ्यावर कौतुकाच्या ह्या शब्दरूपी फुलांचा अभिषेक करणे हाच आजच्या प्रसंगी तुझा योग्य असा घरगुती सत्कार समारंभ आहे. भविष्यांतही यशाचा अमृत कुंभ तुला असाच गवसू दे ह्या व्यतिरिक्त आज गणरायाकडे दुसरे काय मागणार?  

 ७ मार्चला तुझ्या पुतळ्याचं अनावरणा करण्यासाठी तू लंडनला होतीस. आपल्या स्वत:च्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आयुष्यांत पहायचा योग ह्या जगांत फार थोड्यांच्या प्राक्तनांत असतो. तो तुला मिळाला! तुझ्या स्वत:च्या पुतळ्याचे अनावरण झालेला समारंभ तू अनुभविलास! पाहिलास, आपल्या आठवणींच्या गांठोड्यांत तो कायमचा सांठवून ठेवलास. तुझ्याप्रमाणे तुझ्या नातेवाईकांनी, कुटूंबियांनी, मित्र परिवारांनी देखील तो समारंभ अनुभवला आणि तो अविस्मरणीय क्षण तसाच आपल्या आठवणीत जपून ठेवला, आणि जगभर पसरलेल्या तुझ्या लाखो चहात्यांनी तो दूरदर्शनवर पाहिला. त्या सा-यांनी एक गोष्ट नक्की पाहिली. त्या समारंभांत तुझ्या पुतळ्याच्या कानांत तू कांहीतरी सांगितल्याचं त्यांच्या लख्शांत आलं. तेवढच तुला विचारायचं आहे. तू काय सांगितलस त्याला? काय विचारलस त्याला?



आणि तुझं ऊत्तर ऐकण्याची उत्सुकता आम्हा सर्वांना आहेच!

शतायु भव!!!

(शशिकाका) 

शशिकांत पानट
Los Angeles
shashi@panat.org
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारतीय संगीतावरील कांही प्रश्नांची ऊत्तरे शोधणे.......








श्री


                        मार्च ६, २०१२

ऊपोदघात:


माणसाच्या आयुष्यांत संगीताचे महत्व निर्विवाद आहे. भारतीय संगीतकारांनी संगीताचा जो खजिना आपल्यासाठी ठेवला आहे तो अमुल्य आहे. गेल्या अनेक शतकांमधून संगीताची नवी नवी वाटचाल झालेली दिसते. नवे नवे राग-रागिण्या ह्यांच्या निर्मितीने रसिकजनांची आवड ही जास्तच चोखंदळ झाली आहे असे वाटते. त्यामुळे रसिकांच्या गायक-कलाकारांकडून असलेल्या अपेक्षाही खूपच ऊंचावल्या आहेत असेही वाटते.  


प्रत्येक गायक घराण्याची अस्ताई-अंतरा भरण्याची पद्धत, त्यांतली आलापी, घसीट, गमक आणि बेहलादा ह्यांचा ऊपयोग करण्याची विशिष्ठ पद्धत, ह्यामुळे त्या त्या घराण्याची विशेष आवड निर्माण होणा-या रसिकांची एक निराळीच "जात" ही निर्माण झाली आहे असं म्हटलं तर ते अनाठायी ठरू नये. अर्थात रसिकांची दिवसेंदिवस वाढत जाणारी अपेक्षा आणि गायक कलाकारांची रसिकांना खूष ठेवण्यासाठी अविरत मेहनत ही स्पर्धा स्पृहणीय होते आहे यांत शंकाच नाही.

वर्षानुवर्षे गुरुच्या अनुभवाचा ऊत्तम फायदा शिष्यवरांना मिळतांना संगीताचे कांही आडाखे बांधले गेले. ऊदाहरणार्थ: खर्जाची मेहनत सकाळच्या वेळी व्हावी आणि ती देखील तंबो-याच्या एकाच तारेवर केल्यास ऊत्तम, खर्ज कधीच स्थिरावलेला नसावा, मींडयुक्त स्वरांनी, गमकेने तो एकेका स्वरावर स्थिर होत गेला पाहिजे, जमीनीकडे मुख वळवून गमकेने स्वरावर स्थिर झालं की स्वराचा प्रतिध्वनी ऊमटायला हवा, प्रत्येक स्वराचा ऊगम हा नाभीपाशी होवून हृदय, मुख आणि नासिका ह्या ठिकाणी स्वर निर्मिती व्हायला हवी आणि जे स्वर निर्माण होतील त्याला वजन आणि घुमारा प्राप्त व्हायला पाहिजे ह्या संगीताच्या मुलतत्वांबरोबरच गुरुच्या दिग्दर्शनाखाली होत असलेली रियाज़ाची मोठी शिकवणी देखील शिष्यांना मिळाली.


प्रत्येक  गुरुच्या स्वानुभवानुसार आणि त्यांच्या रियाझातून शिष्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ऊदाहरणार्थ: सप्तस्वर लांबवर टिकविण्याची तयारी हवी, दमसास वाढविणे हे महत्वाचे आहे, मध्यलयीतील साध्या चिजा आधी गायल्या की त्यामुळे सूर आणि ताल ह्यांच्याशी मैत्री होते, तान एका सप्तकांतून अडीच सप्तकापर्यंत गेली पाहिजे, चांगल्या गायनासाठी "आ"कारांत आणि लयीत विविध अचरक फिरके, पलटे, घोटून घोटून तयार व्हायला हवेत, भरपूर दमसास, चमत्कृतीपूर्ण आलापी, तनाईत, रागांची शुद्धता, अवघड, पेचदार गुंता गुंतीच्या ताना, बोलअंग, ऊपज, आणि ह्या सुत्रानं गायन करून अचानक समेवर येण्याची किमया, हे ’सहजासहजी’ जमलं पाहिजे अशा एक ना अनेक अपेक्षांतून भारतीय संगीताचे एकापेक्षां एक ऊत्तम कलाकार तयार झाले. संगीताच्या अनूभवी शिक्षणांतून मूलभूत  आणि मजबूत पायावर आधारलेल्या आणि आपल्या रियाझांतून त्यावर प्रभूत्व मिळविलेल्या अनेक सवाई गायक/गायिकांची निर्मिती भारतवर्षांत झाली.



ऊपसंहार:



मात्र संगीताच्या विश्वांतील ही बुद्धीची कल्पकता, रागांतील सौंदर्यदृष्टी आणि गायन शास्त्रांतील सु-संगती साम्यावस्थेंत तोलली जात असतांनाच कोणता राग केव्हां गावा, ह्याचेही कांही आडाखे निर्माण केले गेले. पशुपक्षांच्या आवाजाला स्वरांचे नांव दिले गेले, राग-रागिण्या आणि त्यांची गाण्याची वेळ ह्याचा मानस शास्त्राशी कांही संबंध आहे कां? ह्या विषयावर गेल्या शंभर वर्षांत अनेक चर्चा झाल्या.


ह्या आणि अशा कांही प्रश्नांची ऊत्तरे शोधणे हा ह्या लेखाचा ऊद्देश्य आहे. त्यावर शास्त्रशुद्ध चर्चा व्हावी वाद विवाद नको ही भूमिका! ह्या विचारसरणीतून खालील प्रश्नांची ऊत्तरे शोधण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे. आपला अभिप्राय, मत आपण अवश्य द्यावे ही नेम्र विनंती!
प्रश्न: १
पंडीत विष्णू दिगंबर पलुसकर (१८७२-१९३१) ह्यांची माहिती वाचत असतांना त्यांनी खालील प्रश्नांवर त्या काळी बराच ऊहापोह केला असल्याचा ऊल्लेख वाचला परंतू त्याचा निर्णयवजा कांही अभिप्राय अथवा लिखाण कुठेही सांपडले नाही. ते आपल्या माहितीत आहे कां? कुठे मिळेल?
प्रश्न: २:
कोकिळा "पंचमांत गाते" असे सर्व साधारणपणे म्हंटले जाते. त्यांत कांही तथ्य आहे काय? ह्याची मूळ कल्पना अस्तित्वांत कशी आली? पशु-पक्षांच्या आवाजाला दिलेले स्वरांचे नांव-अशी अजून ऊदाहरणे आहेत कां? कोणती?
प्रश्न: ३:
दीप-रागाने दिवे लागतात, मेघ मल्हाराने पावूस पडतो अशा आख्यायिकांचे शास्त्रीय दृष्टीने परीक्षण झाले आहे कां? असल्यास ही माहिती कुठे मिळेल? नसल्यास ते व्हावे असे आपणांस वाटते काय? आपले ह्या बाबतीत कांही स्वतंत्र मत आहे कां? कोणते?
प्रश्न: ४:
राग-रागिण्या आणि त्या गाण्याची वेळ ह्याचा मानस शास्त्राच्या दृष्टीने कांही संबंध आहे कां? की केवळ परंपरागत कल्पनांनुसार ही पद्धत चालू आहे? एखादा विशिष्ठ राग एखाद्या विशिष्ठ वेळी कानाला भावतो त्याची कारणे काय? आजही सकाळच्या रागांची बैठक, संध्याकाळच्या रागांची मैफिल अशा अनेक मैफिली होतात आणि त्या खात्रीने रंगतात त्यामुळे वेळ आणि राग ह्यांचा जवळचा संबंध आहे असे वाटते. आपले काय मत आहे.?
प्रश्न: ५:
आजही आपल्या भारतांतल्या खेडेपाड्यांतून अनेक लोकगीते गायली जातात.  अशा लोकगीतांमधून भारतीय संगीताचा विकास झाला आहे असे आपल्याला वाटते काय? असल्यास कांही ऊदाहरणे देता येतील काय?

लेखक
शशिकांत पानट
577 Walter Ave, Thousand Oaks, CA 91320

नोट :--   आपल्या प्रतिक्रिया थेट लेखकास कळवाव्यात ही विनंती.       
       shashi@panat.org  किवा  mnbasarkar@gmail.com



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
  भास्करबुवा बखले-एक कृतज्ञता!
जन्म दिन: १७ आक्टोबर, १८६९






आज १७ आक्टोबर २०११ ह्या दिवशी भास्करबुवांच्या जन्मतिथीला बरोबर १४२ वर्षे होत आहेत. भारतीय संगीताच्या ईतिहासांत आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनीच लिहोन ठेवायला हवा! शतकां शतकांमधून असा एखादाच कलाकार निर्माण होतो.

प्रत्येक कलाकाराचं कांहेतरी वैशिष्ठ असतं. स्वरांचा जीवंतपणा, रागाच्याच अंगाने त्याला सच्चेपणाने ऊठाव देणारी अप्रतिम गायकी, आणि तालाचे लालित्य हे तीनही गुण सारख्याच ऊत्कर्षाला पोहोचलेले भारतीय संगीतांतले अतिशय महत्वाचे गायक असं त्यांचं वर्णन केलं जातं ते "केवळ ह्या सम हा" अशाच विश्वासामुळे!

भास्करबुवांबद्दल तशा अनेक गोष्टी सांगता येतील. ज्या काळाच्या वातावरणांत ते वाढले त्यावेळेच्या रितीनुसार इतर गायक फक्त गुरुने शिकविलेल्या घराण्याचच गाणं गात असत. मात्र भास्करबुवांचं सगळच निराळं होतं. आजकालच्या American Corporate च नविन तंत्र, की ज्याला Out of Box Thinking म्हणून जगाच्या कानाकोप-यांत ओळखलं जातं, ते त्यांनी त्याकाळी आत्मसात केलेलं होतं हे आज सांगुनही विश्वास न ठेवण्यासारखच आहे. केवळ आपल्या घराण्याचच नव्हे तर ईतर संगीत प्रकारही त्यांनी शिताफीने हाताळलेले आहेत, ख्याल गायकी पासुन, ठुमरी, भजने, नाट्यगीते ईतकेच नव्हे तर लावणी पर्यंतचा देखील त्यांचा अभ्यास होता. बुवांनी दिलेल्या नाट्यगीतांच्या चाली म्हणूनच आज १०० वर्षांनंतरही बागेतल्या एखाद्या सुगंधी आणि ताज्या फुलाप्रमाणे दरवळत आहेत.

चौफेर व्यक्तिमत्व, आणि निरिक्षणात्मक अभ्यासु वृत्ती ह्या बरोबरच अखादी नविन गोष्ट दिसली की त्याबाबतीत लहान मुलाला जशी एक प्रकारची जिज्ञासा असते आणि निरागसपणे तो ती पाहायचा आणि हाताळायचा प्रयत्न करतो,
 तशा खुल्या मनाने
ते ती नविन गोष्टी शिकायचा प्रयत्न करायचे. केवळ आपल्याच घराण्याची गायकी
गाणा-या त्यावेळेच्या कलाकारांना हा प्रकार नविन वाटला नाही तरच नवल!




भास्कर बुवांची एक मैफिल
भास्करबुवा ज्या वेळी गंधर्व नाटक कंपनीत काम करायचे त्यावेळेची ही एक गोष्ट आहे. संगीत स्वयंवर ह्या नाटकांतील पदांना भास्करबुवांनी चाली दिल्या म्हणून अल्लादियाखांसाहेब खूप नाराज झाले. भास्करबुवा त्यांना म्हणाले " आपण रागावू नका, पण नाटकाला या आणि आपलं मत जरूर सांगा" ठरल्याप्रमाणे अल्लादियाखांसाहेब नाटकाला आले. ’स्वकुल तारकसुता’ सुरू झाल्यावर बसल्या जागेवरून "वा, क्या बात है! शाब्बास " असं ऒरडले. बुवांचा केव्हढा हा आत्मविश्वास!

श्री. बाळकृष्णबुवा ईचकरंजीकर, त्यांचे शिष्य श्री. विष्णु दिगंबर पलुस्कर आणि भास्करबुवांचे समकालीन गायक कलाकार गायनाचार्य वझेबुवा ह्या सर्वांनी त्यांची मन:पूर्वक स्तुती केली. "बहुढंगी गायकी आणि गायकीतील सौंदर्यमुल्यांचा जोपासक" अशा प्रकारे स्तुतीसुमनांचा त्यांच्यावर वर्षाव पाडला! आणि बुवांनी देखील जाणीवपूर्वक कधी ठुमरीचा ख्याल होवू दिला नाही!

भास्करबुवांनी "पुणे भारत गायन समाजाची" स्थापना १९११ साली केली. त्यावेळी सतारीचे शिक्षक म्हणून एकनाथ पंडीतांना त्यांनी गायन समाजांत घेतलं होतं.
 त्या दोघांचं खूप जमायचं. सवड मिळाली की अस्ताई-अंतरे बरोबर आहेत की नाहीत
ह्याची खात्री बुवा त्यांचेकडून करून घेत.

त्याकाळी बहुतेक कलाकार मुस्लीम असत आणि त्यांच्याकडे शागिर्दी करुन शिकणे ही कांही सोपी गोष्ट नसायची! बडोद्यांत असतांना भास्करबुवा ऊस्ताद फैजमहंमद ह्यांचेकडे शिकायला आले. बुवांना त्यांची सेवा करावी लागे. केरवारा करावा लागे. सांगतील ती कामे निमूटपणे करायची आणि ऊस्ताद शिकवितील तेव्हढे प्रश्न न विचारता शिकून घ्यायचे हाच त्यावेळेचा रितीरिवाज आणि शिस्त असायची!
एकदां खांसाहेब बुवांना म्हणाले" आज गायीचं मांस बाजारांतून तू घेवून ये, ते मी शिजविणार आणि खाणार" बुवा म्हणाले ठीक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी बाजारांतून ते आणलं. खांसाहेबांना काय वाटलं कुणास ठावूक! ते बुवांना म्हणाले " तू हिंदू आहेस ना!" त्यावर बुवांनी ऊत्तर दिलं: "ह्या क्षणी मी फक्त आपला शिष्य आहे, आणखी कुणीही नाही" खांसाहेब गहिवरले! आणि डोळ्यांतले अश्रु पुसत पुसतच तालमीला सुरुवात केली! बुवांचा गायनकलेवरचा आणि शिकण्याचा विश्वास तसच एकाग्रता ही अशी अलौकिक होती!

मराठी नाटकांतील पदांना संगीतबद्ध करण्यांत बुवांचं वैशिष्ठ काय?
त्याबद्दल मधुसुदन कालेलकर म्हणतात: " मराठी नाट्यसंगीतांत क्रांती घडली ती केवळ गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांच्यामुळेच. कारण भास्करबुवा नुसते चाली देणारे नव्हते, ते संगीत दिग्दर्शक होते, कंपोजर होते. त्यामुळे पदांतील वजनदारपणा, पीळ, मूळ भारदस्तपणाला धक्का न लागू देतां संगीतानुकुलता जपणं आणि नट गायकाला त्या रचनेच्या बर्तावांतील बारकावे नाट्यांगाच्या द्रुष्टीने समजावून सांगणं ह्या सर्व प्रक्रिया बुवांनी साक्षेपपूर्वक सांभाळल्या. म्हणूनच की काय बुवांच्या एकंदर संगीतामध्ये एक सार्वत्रिक एकजिनसीपणा, आणि नेमकेपणा आहे."

भास्करबुवा बखलेंनी खानदानी चीजांना नाट्यसंगीताची डूब दिली, स्वर, लय, ऊच्चार आणि गती ह्यांचं आपण एखाद्या प्रयोग शाळेत करतो तसं अप्रतिम आणि नेमकं मिश्रण केलं आणि ते ’औषध’ संगीतप्रेमी जनतेच्या मनाला, ह्रुदयाला बरोबर लागू पडलं! दाणेदार तान, शब्दांचा रसानुरूप आणि स्वच्छ आवाज, लयबद्ध आणि भावानुकूल गायन हा सर्व गुणसमुच्चय भास्करबुवांनी आपल्या शिष्यांना शिकविला.

आज त्यांच्या जन्मदिनी "संशोयकल्लोळ" ह्या नाटकांतील "धन्य आनंद दिन" हे गाणे आठवले नाही तरच नवल!

गायनाचार्य भास्करबुवा बखले, आज जगांतले सारे संगीतप्रेमी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत ती आपण स्वीकारावी हीच विनंती!

संदर्भ: "देव-गंधर्व-" शैला दातार
  शशिकांत पानट
१७ आक्टोबर, २०११




================================================
सन्माननीय बाबांस---

रात्रीचे जवळ जवळ ११ वाजायला आले होते. माधवराव आपल्या खोलीत झोपायला जात असतांना ’आपला पोरगा काय करतोय’ हे पहायला त्याच्या खोलीत थांबले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. खोलीमधला नेहमीचा "सीन" अमूलाग्र बदलला होता. सर्व गोष्टी अगदी नीटपणे रचून ठेवल्या होत्या, पुस्तके, जी नेहमी अस्ताव्यस्त आणि मोकळेपणी जमीनीवर पहूडलेली असायची, ती अगदी गुण्या गोविंदाने एकमेकांच्या अंगाखांद्यावर मजेत बसली होती. सर्व गोष्टी जिथे असायला हव्या तिथेच होत्या, आणि मुख्य म्हणजे अतिशय व्यस्थितपणे ठेवलेल्या होत्या. सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे पलंगावरचे दृश्य मोहक होते. गादीवर स्व्च्छ चादर सुरकुत्या न ठेवतां घातली होती, ऊशांवरचे अभ्रे Matching  तर होतेच पण धुवून बदललेले होते. खोलीचे ते प्रसन्न रूप त्यांना ब-याच वर्षांनी- नव्हे बहूधा प्रथमच दिसत होते.त्या आश्चर्याच्या झटक्यांतून बाहेर यायला तसा त्यांना थोडा वेळच लागला. असं कांही पहायची डोळ्यांना संवयच नव्हती. पण ते सारं पाहून त्यांना खूप खूप समाधान वाटलं. "चला, मुलाला किती छान संवयी लागल्या? आपला मुलगा आता चांगल्या वळणाला लागला, त्याशिवाय कां त्याने असं छान काम केलं असतं?"

गालांतल्या गालांत हंसत त्यांनी हिंदी चित्रपटांत देव आनंद हलवायचा तशी पसंतीची मान हलविली, अजून ह्या वयांतही आपल्याला छान अभिनय करता येतो ह्याचा त्यांना फार अभिमानही वाटला, पण ’कूणी पाहिलं तर नाही ना?’ असं म्हणून त्यांनी चपापून आजूबाजूला पाहिलं. पण मघाशीच त्यांनी मोहनला बाहेर पडतांना पाहिलं होतं. त्यामूळे तो नक्कीच घरी नव्हता. आणि पत्नी शेजारच्या काकूंना पापड लाटायला मदतीला गेली होती, त्यामूळे ते घरांत एकटेच होते, त्यामूळे आपला हा फिल्मी आनंद आपल्यापुरताच मर्यादित राहिल्याचे समाधान झाले, आणि ते बाहेर पडणार तोंच त्यांचे लक्ष गादीवर ठेवलेल्या पांढ-या लिफाफ्याकडे गेले. "अरे गुलामा, तू पांढरा म्हणून ईथे पांढ-या रंगांत तू लपून बसला होतास का?" असं म्हणून थोड्या ऊत्सुकतेने ते त्यांनी ऊचलले. त्यावर " श्री.सन्माननीय बाबांस"  अशी अक्षरे पाहातांच ते चपापले. आपल्या मुलाने आपल्याला घरांतल्या घरांत पत्र लिहिले, त्या अर्थी त्यांत काहींतरी स्फ़ोटक अथवा प्रत्यक्ष भेटीत न सांगण्यासारखे काहीतरी असावे असा निराशाजनक विचार त्यांच्या मनांत आला. काय असेल बरे ह्यांत? अशा निराशदायक विचारांनी थरथरत्या हातांनी त्यांनी पत्र ऊघडले. पत्र आपल्यासाठीच आहे अशी खात्री होतांच, त्यांनी वाचायला सुरूवात केली.:

"श्री. सन्माननीय बाबांस, शि.सा. नमस्कार, वास्तविक आपल्याबरोबर प्रत्यक्ष चर्चा न करतां हे पत्र मला आपल्याला लिहावे लागले ह्याबद्दल मला खूप वाईट वाटते आहे आणि दु:ख्ख होते आहे. किंबहूना ईतर अनेक दु:ख्खदायक विचारांनी माझे मन भरून गेले आहे. माझ्या एका मैत्रिणीबरोबर मी आज घर सोडून निघून जात आहे. त्याला तुम्ही आणि आई "पळून" जात आहे असंच म्हणाल ह्याची मला खात्री आहे. हे पत्र तुम्हाला मुद्दाम लिहिलं आहे ते अशासाठी की प्रत्यक्ष बोललो असतो तर खूपच वादावादी झाली असती, आरडा ओरडा झाला असता आणि ऊगाचा तमाशा होवून शेजार पाजा-यांना बोलायला एक विषय मिळाला असता.

माझी आणि त्रिवेणीची मैत्री एक वर्षांपूर्वी झाली. आणि बाबा, कथा कादंबरीत लिहितात ना, तसा मी "प्रथम-दर्शनीच" तिच्या प्रेमांत पडलो.! खरं म्हणजे तिची आणि तुम्हा सर्वांची ओळख मी करून द्यायला हवी होती. आणि मी अगदी करूनच देणार होतो, परंतू तिच्या अंग-प्रत्यंगावर आणि जवळ जवळ प्रत्येक अवयवावर तिने गोंदून घेतलं आहे, आणि टोचलेलं आहे, शिवाय काहीं अवयवांमध्ये तिने तिच्या आवडीचे काही दागिनेही घातलेले आहेत. तिच्या शरीराच्या काही भागावरचं गोंदलेलं डिझाइन तुम्हाला आवडणार नाही ह्याची मला खात्री आहे. शिवाय ती नेहमी मोटार सायकलीहून अथवा फटफटीवरून येत असल्याने तिच्या अंगावरचे कपडे हे सर्व साधारण मुलींसारखे नसतात, ह्या सर्व कारणां मुळे आणि त्यांत ती माझ्यापेक्षां थोडी वयस्करही असल्याने तिची ओळख करून दिली, तरी ती तुम्हाला आवडणार नाही, तुम्ही तिला Approve  करणार नाही, स्विकारणार नाही असा पूर्ण विचार करून तो विचार मी मनांतून पुर्णपणे काढून टाकला. आणि बाबा, असा पूर्ण विचार करून मगच निर्णय घ्यावा असं तुम्हीच मला शिकविलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी हे योग्यच केलं असा अभिमान नक्कीच वाटॆल.

त्याव्यतिरिक्त अजूनही एक कारण आहे ते हे की त्रिवेणीला दिवस गेले आहेत.(तुम्ही पहिल्यांदाच आजोबा होणार! हार्दिक अभिनंदन!) तिच्या पोटाच्या आकारावरून ते आपल्या ऊभयतांच्या नक्कीच घ्यानी येईल असं मला वाटलं. त्रिवेणी मला नेहमी म्हणते की तिचं आणि माझं जीवन नक्कीच खूप सुखी होईल. तिचा स्वत:चा एक ट्रेलर-जो मोटारगाडीला जोडून जागोजागी नेता येतो तो- तिने एका निर्जन ठिकाणी पार्क करून ठेवला आहे. शिवाय थंडीमध्ये शेकोटीत जाळण्यासाठी तिने लांकडाचा बराच सांठाही करून ठेवला आहे. यावरून ती किती विचारी आणि दूरदर्शी आहे ते आपल्या लक्षांत येईलच! आतां होणा-या ह्या मुलाव्यतिरिक्त (होय बाबा, तुम्हाला नातू होणार आहे) अजून खूप मुले आम्हांला हवी आहेत, आणि ते स्वप्न ऊराशी बाळगूनच आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्रिवेणीच्या सहवासांत गेल्या वर्षांत मी कितीतरी गोष्टी शिकलो. ऊदाहरणार्थ: त्रिवेणीनेच मला शिकविले की कोणत्यही प्रकारचे Drugs म्हणजे Marijuana, आणि Alcohol अथवा तत्सम हे आपल्या शरीराला अत्यावश्यक असे Drugs आहेत. फक्त ते सर्व थोड्या थोड्या प्रमाणांत, निदान सुरुवातीला तरी- पण रोज घ्यावेत. आणि पचनशक्ती वाढली की हळू हळू त्याचे प्रमाण वाढवावे. बरेच लोक सुरुवातीलाच खूप घेतात आणि घाण करतात ते तिला अजिबात आवडत नाही. तिने तर त्याच्याही पूढचा दूरदर्शी विचार करून ठेवला आहे. तिचा ट्रेलर जिथे पार्क केला आहे त्याच्या मागच्या बाजूला कुणाला संशय येणार नाही अशा एका छोट्याश्या जागेंत  Marijuana, ची रोपे लावण्याचा तिचा विचार आहे. त्याचे अनेक फायदे असे की, पहिली गोष्ट म्हणजे मग आम्हाला कुणाकडून Marijuana, विकत घ्यायला नको, आणि दूसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे आम्ही वापरून तो ऊरला तर (आणि तो ऊरेलच, कारण ती खूप रोपे लावायचे म्हणते आहे) तो आम्ही गरजू लोकांना विकू आणि त्यातून आमचा ऊदर-निर्वाह अगदी सहजपणे होवू शकेल. आतां आमचे कूटूंबही वाढते असल्याने हा तिचा दूरदर्शी विचार आम्हाला अडचणीतून तारून नेईल अशी आम्हा दोघांची खात्री आहे. काही कारणाने उत्पन्न पूरेसे मिळाले नाही तर Cocaine  आणि Ecstasy चाही जोडधंदा आम्ही करायचे म्हणतो आहे. थोडक्यांत म्हणजे आमचा हा Plan B पण तयार आहे आणि आमच्या भवितव्याची जोरदार तयारी झाली आहे.

बाबा, रोज झोपतांना न चुकता आम्ही दोघेही देवाची प्रार्थना करतो आणि देवाने लवकरच मानवाकडून AIDS  वर औषध तयार करून घ्यावे असे त्याला मनोभावे विनवितो, म्हणजे तिला काही वर्षांपूर्वी झालेला हा रोग बरा होईल. बाबा, तुम्ही खरंच काहीही काळजी करू नका. मी नुकताच १५ वर्षांचा झालो आहे आणि स्वत:ची काळजी कशी घ्यायची हे मी शिकलो आहे. नजिकच्या भविष्यांत "आम्ही दोघे आणि आमचे अनेक" असे आम्ही तुम्हाला नक्की भेटायला येवू, म्हणजे मग तुमच्या कर्तृत्ववान सुनेबरोबरच तुम्हाला तुमच्या नातवंडांचीही भेट होईल.
असो,
तुमचा आज्ञाधारक
मोहन "

ते पत्र वाचून माधवराव मटकन खालीच बसले. सारे जग आपल्याभोवती फिरते आहे की काय असा भास त्यांना झाला. त्यांची विचारशक्तीच नाहीशी झाली. डोळ्यांतून अश्रु येत असतांना आतां हे पत्र पत्नीला कसे दाखवावे, आधीच हळव्या मनाच्या आणि मोहनची अहोरात्र काळजी वाहाणा-या त्या स्नेहमूर्तीची काय अवस्था होईल हा विचारही त्यांना सहन होईना. खरं तर ह्या विचारानेच त्यांना एव्हढा धक्का बसला होता की त्या गडबडीत त्या पत्राच्या खाली "मागे पहा" असं लिहिलेलं त्यांना दिसलच नव्हतं! आता ’ह्या सर्व रामायणानंतर आपल्या चिरंजीवांनी आता अजून काय दिवे लावले आहेत आणि अजून काय लावायचे ठेवले आहेत?’ ह्या विचारानेच त्यांचे ह्रुदय धडधडू लागले. त्यांनी पान ऊलटले आणि ते वाचू लागले: " बाबा, मी वर लिहिले आहे त्यांतले एक अक्षरही खरे नाही. मी आज रात्री पंकजकडे -माझ्या मित्राकडे राहायला जात आहे. मला फक्त एव्हढंच सांगायचं होतं की माणसाच्या आयुष्यांत न आवडणा-या, न पसंत पडणा-या आणि ज्याबद्दल आपल्याला काहीच करतां येत नाही अशा हताश विचारांनी घडणा-या अनेक गोष्टी असू शकतात. ह्यापेक्षां आपल्याला मरण आले असते तरी बरे झाले असते अशा घटना घडू शकतात. सुदैवाने मी वर लिहिलेल्या घटनांशी माझा काहीही संबंध नाही. विशेषत: माझे आजचे शाळेचे प्रगती पुस्तक आपण वाचले की हे आपल्या अधिकच प्रकर्षाने घ्यानांत येईल. ते मी जेवणाच्या टेबलावर आपल्याला दिसेल असे ठेवले आहे. मी घरी परतणं माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेव्हां आपल्याला वाटेल तेव्हां तुम्ही मला पंकजकडे फोन करावा ही विनंती!

आपला आज्ञाधारक आणि त्रिवेणी-बिवेणीशी कोणताही संबंध नसलेला आपला (आवडता?) मुलगा,
मोहन




शशिकांत पानट
Los Angeles
August 30, 2011



------------------------------------------------------------------------------
पूर्व-संचित


खलील मूळ ईग्रजी कवितेचा ( कवि अनामिक ) स्वैर भाषांतर.



स्वर्गाच्या दारांत पाय टाकतांच
मला धक्काच बसला
जरी स्वर्गाच्या सौंदर्याशी
त्याचा संबंध नसला!  // १ //

धका बसला तो तिथे
असलेल्या लोकांमूळे
चोर,पापी,अन खोटारडे,
काही दारूडे, काही घाणेरडे! // २ //

शाळेतल्या जेवणाचे पैसे चोरणारा
सातवीमधला मुलगा पहा
त्याच्या बाजूला माझा शेजारी
गटारगंगा त्याचं तोंड, अगदी अर्क महा  //३ //

आणि ते खडूस बाळूबुवा
मला वाटलं, नरकांत पडले असतील
ते तर मस्त ढगांवर स्वार होते,
भोवती अप्सरा, दहा-बारा तरी असतील! // ४ //

मी देवाला म्हटलं, “अरे बाबा, हा काय प्रकार आहे?
तुझी बाजू ऐकायला मी आतूर आहे,
हे सारे पापी चूकून ईथं आले आहेत कां?
तू देव असलां तरी, तुझ्याकडून चूक झाली आहे कां? // ५ //


आणि हे सारे एव्हढे शांत कां?
हे तरी सांग मला”
देव म्हणाला,” अरे बाळा,
तुला ईथं पाहून त्यांना आहे धक्का बसला. // ६ //

अरे बाळा, नुसतं देवळांत जावून
कूणाला पुण्य मिळत नसतं!
स्वर्गांत जायचं की नरकांत जायचं
हे सारं पूर्व संचित असतं”  //७ //

प्रत्येक पूण्यवान माणसाला भूतकाळ असतो!
प्रत्येक पाप्याला मात्र भविष्यकाळ असतो!

शशिकांत पानट
Los Angeles
California
जून ७, २०११


 मूळ ईग्रजी कविता  ( कवि अनामिक ) 

I was shocked, confused, bewildered------------------------------------------------------------------------------------------------------

As I entered Heaven’s door
Not by the beauty of it all
Nor the lights or its décor  .... 1

But it was the folks in Heaven
Who made me sputter and gasp
And thieves, the liars, the sinners
The alcoholics and the trash   ..... 2

There stood the kid from seventh grade
Who swiped my lunch money twice
Next to him was my old neighbor
Who never said anything nice ......3

Herb, who I always thought
Was rotting away in hell
Was sitting pretty on cloud nine
Looking incredibly well .....4 

I nudged God, “What is the deal?
I would love to hear your take
How’s all these sinners get up here?
God must’ve made a mistake! ....5

“And why is everyone so quite
So Somber-give me a clue”
“Hush child, He said, ‘they are in shock’
No one thought they’d be seeing you’ ....6

JUDGE NOT

Remember—Just going to places of worship doesn’t make you,

Religious any more than standing in your garage makes your car.

Every Saint has a PAST
Every sinner has a FUTURE.

आमचे मित्र शशिकांत पानट ह्यांनी लिहलेले  साहित्य ( कविता,लेख, पर्यटन ) संग्रहित करून देत आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------


आमची कोस्टारिकाची सफ़र
जून ११ ते जून २१, २०१० 


जवळ जवळ तीन-चार  महिने आधी ठरविलेली कोस्टारिकाच्या सफ़रची तारीख जस जशी जवळ  आली तस तशी आमची उत्सुकता वाढतच होती. तो देश कसा  असेल, माणसं कशी असतील, हवामान आपल्याला मानवेल की नाही, आणि मूख्य म्हणजे टूर मध्ये असलेले ईतर लोक कसे असतील, अशा अनेक प्रश्नांची मनांत एक जंत्री तयार झाली होती. नाही म्हणायला एलेहून आम्ही ६ जण जाणार होतो. त्यामूळे आमचा वेळ चांगला जाणार हे नक्की ठरले होतेच. पण ईतर सर्व मंडळी कशी असतील ही उत्सुकता मनांत होतीच. कारण नाही म्हटलं तरी त्यांच्या बरोबर १० -११ दिवस काढायचे होते. त्यामूळे बरोबरीचे सर्व प्रवासी चांगले असणं हे फार महत्वाचं होतं. 
आमचं विमान  सकाळी ६ वाजताच असल्यानं निघायच्या दिवशी सकाळी  २ वाजतां उठावे लागले, सकाळचा चहा घेवून ३ वाजता निघून, गाडी १० दिवसासाठी Long Term Parking करून, Los Angeles च्या विमानतळावर आम्ही बरोबर ४ वाजतां पोहोचलो. कस्टम आणि सिक्युरिटीचे सोपस्कार आटोपून ६ चे विमान अगदी आरामांत गाठ्ता आले. आजकालच्या नविन नियमांप्रमाणे विमानात खाद्द्य-पदार्थ विकत घ्यावे लागतात. (गेला तो जमाना!) किमानपक्षी शेंगदाणे तरी मिळतील अशी आशा (उगीचच )बाळगून होतो. परंतू तेवढ्यात माझ्या अंगावर हलकेसे?(तरी मला वाटतं आजुबाजुच्या काहीं अमेरिकन मंडळींनी बिचकून आमच्याकडे पाहिलं, पण मी फारसं लक्ष दिलं नाही.) ओरडून "अरे, ही काय Southwest Airline वाटली की काय?" अशी नम्रपूर्वक(?) जाणीव आमच्या सौभाग्यवतीने करून देवून मला अक्षरश: खूप वरून अवनीतलावरच फेकून दिल्यासारखे वाटले. परंतू या प्रवासात शक्य तेव्हढे चिडायचे नाही अशा निर्धारानेच मी बाहेर पडलो असल्याकारणाने "अळी-मिळी गूपचिळी" अशी भूमिका अतिशय समजूतदारपणे मी घेतली. घरी अनेक वर्षे सराव केल्याचा हा किती मोठा फायदा! हो, नाहीतर प्रवासाच्या सुरवातीलाच चिड-चिड व्हायची!  
आमचे विमान Miami मार्गे Costa Rica देशातील San Jose नावाच्या गावी जाणार होते. त्यामूळे Miami च्या विमानतळावर पोट शांती करणे हे ओघाओघाने आलेच. खरं म्हणजे विमानांत देखील अन्न विकत घ्यायला काहीच हरकत नव्हती, परंतू तिथे शाकाहारी काहीच  नव्हतं. त्यामूळे विमानतळावर अनेक restaurants शोधून शाकाहारी sandwich मोठ्या प्रयासाने मिळविलेल्या सौभाग्यवतीने तेव्हढ्यांत "मी नसते तर ह्याला हे देखील मिळालं असतं की नाही कूणास ठावूक" असं पुट्पुट्लेलं मी ओझरत ऐकलं असं मला खात्रीपूर्वक वाटतं, परंतू मी सुरुवातीलाच लिहिलेल्या नियमाप्रमाणे आपण चिड-चिड करायची नाही हे मनाला परत एकदा बजावलं, आणि तिचं बोलणं आपल्याला ऐकू न आल्यासारखं दाखविलं. त्याचा तिने "मौनं सम्मति लक्षणं" असा अर्थ लावला हे मी अनूभवानं सांगू शकतो. असो. त्या विमानतळावरच्या फालतू स्टालवर मिळालेले ते शाकाहारी sandwich, आणि घरातून बरोबर घेतलेले ईतर च्यावू-म्यावू पदार्थ प्रवासात ईतके चांगले कां लागले आणि नेहमी कां लागतात हा माझ्या मते एक अभ्यासाचा विषय होवू शकेल. 
Miami मार्गे आमचे पूढचे विमान दोन-अडीच तासात San Jose ला पोहोचले. विमानतळावरचे कस्टम आणि Immigration चे सोपस्कार अगदी जुजबी होते असं म्हणायला हरकत नाही. Costa Rica हा देश ईतका गरीब, आणि "कुणाच्या अध्यांत नाही आणि मध्यांत नाही" असा आहे. प्रवाशी मंडळीवर त्यांची थोडीफार भिस्त आहे. त्यातून देशाला चार पैसे मिळावी अशा प्रकारची आशा असल्याने अथवा अमेरिकेच्या मानाने त्यांचे निती-नियम एव्हढे कठिण नसावेत असं मला वाटलं. विमानतळावरून आम्ही बाहेर येतांनाच आमच्या टूर कंपनीची एक representative मूलगी आमच्या स्वागतासाठी तयारच होती. वास्तविक पहाता आमचे विमान जवळ जवळ अडीच-तीन तास उशिरा आले होते. यामूळे ती मूलगी आमच्यावर ( आमची त्यांत काहीही चूक नसली तरी) वैतागलेली असावी असा आमचा अंदाज तिच्या चांदण्यासारख्या हास्यानं अगदी चूकीचा ठरला. खरं पहाता ती आमच्यावर चिडली असती तरी ते फारस चूकीच ठरल नसत. विमान कंपनीची चूक असली तरी आम्ही उशिरा आलो होतो त्यामूळे ते नैसर्गिकच ठरल असतं. परंतू तिच्या चेहराभर हास्यानं आमची सुरुवात किती छान झाली होती!

John Milton या सोळाव्या शतकातील ब्रिटीश कविनं एकदा असं म्हटलं होतं की: "The mind is its own place, and in itself can make a heaven of hell and hell of heaven". त्या एका हास्यान आमची नूसतीच सुरुवात चांगली झाली नव्हती तर पूढच्या प्रवासाची नांदीच जणू रोवली गेली होती. 
आम्ही San Jose मधल्या Hotel Aurola मध्ये रात्रीच्या आठ वाजता पोहोचलो. त्या संध्याकाळी ६ वाजतां पूढील प्रवासासाठी मुद्दाम आयोजित केलेले Briefing अर्थातच केव्हाच  
आटोपले होते. त्यामूळे आमचा थोडा विरस झाला, नाही असे नाही. परंतू आमचे एक मित्र आधीच पोहोचले असल्याने ते आम्हाला नेहमीप्रमाणे माहिती पूरवितील ह्याची आम्हाला खात्री होतीच. (त्या निमित्ताने त्यांना आमचे बौद्धिक घेण्याची ही अनायासे मिळालेली संधि ते सोडणार नाहीत, या विषयावर आमची आधीच चर्चा देखील झाली- म्हणजे आम्ही त्यांना खरोख्रच ’ओळखून’ आहोत, नाही का? असो.) आमची बस त्या होटेलच्या अलिशान पोर्च मध्ये थांबली मात्र, तोंच त्या बसचे दार उघडून एक तरतरीत तरूणी सुहास्य वदनाने आमचे स्वागतास तयार होतीच. तीच आमची पूढील दहा दिवस गाईड असणार होती.

या देशांत ही मंडळी एवढी हंसतमूख का बरे असतात हा एक अभ्यासाचा विषयच ठरावा. विशेषत: एखादी चांगली बातमी देखील आंबट चेहरा करून ऐकण्याची संवय असलेल्या आमच्या मनाला केवढा हा धक्का! (अथवा यांना हंसण्याचे देखील ट्रेनिंग मिळाले आहे की काय?) तिचे नांव लारेन. तिने पहिली गोष्ट अशी केली होती की, आमच्या खोल्यांच्या किल्ल्या तयार ठेवल्या होत्या, आणि आम्ही आधी जेवून घ्यावे असा सल्ला दिला कारण तेथले रेस्टारंट आठलाच बंद झाले होते, परंतू विमानतळावर उतरल्यानंतर ज्या मूलीने आमचे भरघोस स्वागत केले होते तिने आमची बस त्या होटेल मध्ये अंदाजे किती वाजता येईल असं तिला आधीच फोनवरून कळविल्याने तिने केवळ आमच्यासाठी त्या रेस्टारंटच्या म्यानेजरला सांगून ते आम्ही येईपर्यंत उघडे ठेवण्याची व्यवस्था केली होती. (ह्या पार्श्वभूमिवर समजा हाच प्रसंग आपल्याकडे झाला असता तर "काय करणार साहेब, तुम्ही ५ मिनिटे जरी आधी आला असतां ना, तरी जेवण मिळाले असते बघा वगैरे वगैरे- (बरं झालं) गेले ते दिवस.



असो, या देशातील अतिथ्यशिलतेची जणू ती पावतीच होती असं म्हटलं तर वावग ठरू नये. त्यांतून तिच अगत्याच बोलणं " You guys must be tired for cross country travel and flight delays, and must be hungry, so please have a good dinner, and then check in your room for goodnight sleep because we have a early morning departure for our long day tomorrow" आतां असं वाटतं की, त्यावेळी थोडा अधिक लाडिकपणा केला असता तर तिने आमचे पाय देखील चेपून द्यायची व्यवस्था केली असती-परंतू वय परत्वे काही गोष्टी उघडपणे सांगतां येत नाही हेच खरे! ते काहीही असलं तरी का कोण जाणे पण मला उगीचच मी थकून भागून घरी आलो की माझी आई असच म्हणायची ह्याची आठवण झाली. (म्हणजे एका वयाचा फरक सोडला तर)
 
ठरल्याप्रमाणे आमच्या मित्राने आम्हाला कोणत्याही प्रकारचे बौद्धिक ने घेतां, (अरेच्चा! असं कसं झालं? की त्यानेही ह्या ट्रिपवर यायच्या आधी आमच्यासारखाच काही नियम ठरवला होता?) सारी माहिती पुरविली, त्यामूळे पूढील दहा दिवसाच्या कार्यक्रमाची पूर्णत: कल्पना आली. दूसरा दिवस हा सकाळी भल्या पहाटे ६  वाजताच सुरू होणार होता म्हणून त्या रात्री अंथरूणावर पडल्यावर कधी झोप लागली ते कळलच नाही. 


दूस-या दिवसाची  सुरुवात भल्या पहाटे  म्हणजे ४ वाजतांच झाली. सूर्य ऊगवायच्या आधी आम्ही जागे होण्याचे जे दुर्मिळ प्रसंग आमच्या आयुष्यांत आतापर्यंत आले, त्यातला हा एक! दिवसभराच्या थकव्यामूळे रात्रीची झोप व्यवस्थित मिळाली होती त्यामूळे सकाळी खूपच चांगले वाटले. ईतर प्रवाश्यांना पण भेटायची उस्सुकता होतीच. सकाळी ७:३० च्या ठोक्याला बस सुटणार म्हणून आम्ही तयार होवून गेलो तेव्हां सह-प्रवासी बस मध्ये सगळे अगदी वेळेवर, किंबहूना वेळेच्या आधीच बस मध्य बसलेले होते. आम्ही बस मध्ये शिरतांच सगळ्यांनी Good Morning असे म्हणून आमचं जोरात स्वागत केलं आणि पूढल्या प्रवासाच्या यशाची जणू नांदीच दिली. हास्य द्यायला काही किंमत द्यावी लागत नाही पण ते ओठापर्यंत आणण्याची जबाबदारी मात्र पार पाडावी लागते एव्हढं मात्र खरं! 


आज जगांतला  सर्वात मोठा ज्वालामूखी (Poas Volcano) पहायला जायच होतं. या ज्वालामूखीची रूंदी जवळ जवळ एक मैल आहे. येथले हवामान एकेक मिनिटाला बदलत असते. कधी दाट धूके तर कधी एखादा मिनिटभरच सूर्य-प्रकाश येवून ते निवळून परत धूके असा एकंदरीत निसर्गाचा थाट आहे. लारेनने आम्हाला आधीच त्याची कल्पना दिली असल्यान आम्ही फार आशाठेवलीच नव्हती. त्याप्रमाणे तिथे गेल्यावर लारेन काय म्हणत होती त्याचा प्रत्यय आला. त्या दाट धूक्याखाली जगातला सर्वात मोठा ज्वालामूखी लपला गेला आहे हे खरंच वाटत नव्हतं. माझ्या पत्निने आणि मी बराच वेळ वाट पाहिली आणि एवढ्या दूर येवून जगातली ही मह्त्वाची गोष्ट दिसली नाही म्हणून निराश होवून परत निघालो. तेवढ्यांत कूणीतरी ओरडलं: Look, look, the sun is coming. ह्याचाच अर्थ असा की आता धूकं लवकरच नाहीसं होणार! आम्हाला आमच्याच भाग्याचा हेवा वाटला. कारण आयुष्यांत परत इथे येण्याची शक्यता फार कमी होती, किंबहूना नव्हतीच. जवळ जवळ सत्तरीला आलेलं माझं वय आणि अजून जगांतल्या कितीतरी गोष्टी पहायच्या राहिलेल्या आहेत ह्या कारणामूळे एकाच जागेला केवळ पर्यटनासाठी परत भेट देणं जवळ जवळ अशक्यच होतं
 आम्ही घाइघाइने ज्वालामूखीच्या दिशेनं परत फिरलो आणि तेवढ्यांत सूर्य- नारायणाने आपले किरण त्या ज्वालामूखीवर टाकून ते धूक्याचं पांघरूण,  आई आपल्या मूलाच  ज्या नाजूकतेनं काढेल तसं  हलकेच काढलं. त्या भव्य ज्वालामूखीच  दर्शन घेताच मला सर्व प्रथम आठवण आली ती हे जग ज्या ईश्वरानं घडवलं आहे  त्याची. ज्यानं हिमालय, सात समूद्र, आणि जगातली सात आश्चर्ये निर्माण केली आहेत त्याचं नव्यानं दर्शन झालं. त्याच्या हिकमतीची आणि कर्तुत्वाची खात्री पटली. वेड्यासारखे त्या ज्वालामूखीचे मी अनेक फोटो घेतले. साधारण तीन एक मिनिटांनी सूर्य-नारायणानं ज्वालामूखीला परत पहिल्यासारखं धूक्याचं पांघरूण घातलं आणि आयुष्यात पुन्हा कधीही दिसण्याची शक्यता नसणारा तो ज्वालामूखी मनांत साठवितच आम्ही त्याचा मनोमन निरोप घेतला. त्याच्या कूशीत आणि अशा धगधगत्या ज्वालांच्या पासून तयार झालेल्या जमिनींत उगविलेल्या सूंदर फूलांचा एक फोटो आठवणीन काढून घेतला. धगधगत्या ज्वालामूखीच्या एवढ्या जवळ ईतकी सूंदर फूलं निर्माण करणारा तो देव कधीतरी जर भेटला, तर त्याला ताजी जरी नाही तरी फोटोंमधली फूलं चालतील असं उगाच मनाला वाटून गेलं.

दोन महिन्यापूर्वी आम्ही Yellow Stone ला गेलेलो असतांना तिथं १२० डिग्री तपमानाच्या गरम पाण्याच्या झ-यापासून केवळ एक फ़ूट अंतरावर अतिशय सूदर ताजी टवटवित फूलं निर्माण करणारा तो देव, हा या सूंदर निसर्गाच्या रूपानं आपल्याला दिसतो आहे, असं मला मनोमन वाटून गेलं. माझे सह प्रवासी काहीही बोलत नव्हते, अवाक झालेले होते, परंतू त्यांच्या मौनातून जणू ते त्या विधात्याची मनोमन पूजाच बांधीत होते की काय? कोण कूठली ही माणसं? जगाच्या कूठल्याश्या कोप-यांतून आज इथं भेटत होती, प्रत्येकाची भाषा निराळी होती आणि तरीही आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा एकसंध असा दूवा तिथं होता, निसर्गाच्या सौंदर्याची पूजा बांधणारा! त्या सौन्दर्याची मनोमन ओळख पटलेला, शब्दातीत! सौंदर्याची नेहमी पूजाच बांधायची असते ह्याची सतत आठवण करून देणारा तो क्षण होता. 

त्या दूपारी आम्हाला एक Gold Museum दाखवलं. जगांत कूठेही जा, सोन्याचं आकर्षण कधीच कमी होणार नाही. त्या संग्रहालयांत एक गोष्ट प्रकर्षानं धान्यांत आली आणि ती म्हणजे आपले पूर्वज आज आपल्याला प्रगत असलेल्या कितीतरी कलांमध्ये प्रविण होते. ते ज्या गावांत राहात होते त्याची रचना, विद्द्यार्जन करण्याची/देण्याची संकल्पना, प्रत्येक घरांतील अंतर, रस्ते, सोन्याच्या ज्या वस्तु उत्खलनांत सांपडल्या त्या घडविण्यामागचे कसब, या सर्व गोष्टी पहाता पहाता आपले पूर्वज त्या काळाच्या मानाने कितीतरी पूढे गेले होते यांत शंकाच नाही.
 
त्या रात्री दिवसभराच्या थकव्यामूळे खूप छान झोप लागली नाही तरच नवल. ह्या देशाचा उर्वरित  भाग पहाण्याची खूपच उत्सुकता लागली. आमची गाइड लारेन Costa Rica देशाबद्दलची माहिती सारखी देतच असल्यानं आमच्या सामान्य ज्ञानांत खूपच भर पडत होती यांत शंकाच नाही. १९७० साली Costa Rica च्या राष्ट्रपतीने मिलिटरी काढून टाकण्याचा न ‘भुतो न भविष्यती’ असा निर्णय घेतला. देशाच्या संरक्षणासाठी मिलिटरी ठेवण्याची जगांतजी साधारणत: पध्दत असते त्या विचाराला हादरे देण्यारा हा Out of Box thinking असा निर्णय होता. मिलिटरीच्या खर्चासाठी लागणारे हे पैसे त्या विचारवंताने कशासाठी खर्च केले असतील? तर त्याने ते पैसे देशांतील सर्व लोकांना माफक दरांत Health care देण्यासाठी वापरले.


अमेरिकेसारखा पूढारलेला देश अजूनही Health Care Program कसा करावा? ह्यावर कोट्यावधी तास खर्च करून वर्षन-वर्ष नूसता विचार करीत बसला आहे आणि त्यामधून अजूनही काहीही निष्पन्न होत नाही, या पार्श्वभूमीवर ह्या (जगाच्या नजरेतून) अजूनही प्रगत न झालेल्या देशानं Health Care सारखा अवघड प्रश्न चूटकीसरसा सोडविला, आणि गेले ४० वर्ष राबवून दाखविला आहे. Costa Rica मधल्या प्रत्येक घरांतल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ पगारांतला ६ टक्के भाग देवून Health Care (अधिक एक पैसाही न देता) आजही विनासायास मिळतो आहे. ईतकेच नहे तर देशाबाहेरची एखादी भेट देणारी (प्रवासी) व्यक्ती ह्या देशांत आजारी पडली तर त्या व्यक्तीचा तेथे मुक्काम असेपर्यंत त्या व्यक्तीला विनाखर्च उपाय योजना देण्याची देखील तरतूद त्यांनी केली आहे. आता बोला! शांततेला पूर्णपणे वाहिलेल्या ह्या देशाच कौतूक करावं तेव्हढच. 


"अरे, तुमच्याकडे मिलिटरी नाही, मग तुम्ही स्वत:चं संरक्षण करतां तरी कसे?" ह्या प्रश्नाला “संरक्षण? आणि ते कूणापासून? अहो, आम्हाला शत्रूच नाहीत तर मिलिटरीची गरज ती कशी असेल? आमचा शेजारी आहे निकुराग्वा. तो आहे आमचा मित्र देश. आणि उद्या त्यांनीच हल्ला केला तर? तर आम्ही Costa Rica च्या ऐवजी Nicaragua चे नागरिक म्हणून ओळखले जावू एव्हढेच!” अशा स्व-संतुष्ट विचाराची केवळ आमची गाइडच नव्हती तर ते त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या विचारांचं एक प्रतिक होतं. जगांतले ईतर सारे देश उत्पन्नाच्या कितीतरी पट रक्कम मिलिटरी साठी खर्च करीत असतांना ही विचारसरणी मला कां कोण जाणे पण "सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामया:,सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दु:ख्भाग भवेत, ओम, शान्ति:, शान्ति: शान्ति:" या विचाराच्या जवळ खूप जवळ जाणारी वाटली. पूढील्या उरलेल्या ट्रिपच्या दिवसांत ह्या देशाकडे पहाण्याची माझी सारी द्रुष्टीच बदलली.
 
बसच्या त्या प्रवासांत या देशातले रस्ते  किती सुंदर आहेत हेही जाणवलं. रस्त्यांच्या दूतर्फा आपल्याकडे  असते तशी गर्द आंबराईप्रत्येक झाड फळांनी लगडलेलं, एक एक कैरी दोन दोन  पौंडाची तरी  सहज असेल, हिरवे-गार रान, मैलन मैल पसरलेल्या केळींच्या बागा, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेले ते ढाबे, प्रत्येक ढाब्यांत हटकून केळींचे घड टांगून ठेवलेले, शेतांतून नुकतीच काढलेली निर-निराळ्या प्रकारची फळं, आणि कितीही लहान खेडं असलं तरी त्या ठिकाणी असलेलं एखादं कां होईना पण वाद्द्य. प्रत्येक घरटी  इतकं कमी उत्पन्न असतांनाही आला तो दिवस हंसून, खेळून, गावून घालविण्याची ही आनंदी वृत्ति पाहून सुखाच्या शोधांत अख्खं आयुष्य घालवूनही ते न मिळणारी जगांतली जी कितीतरी मंडळी आहेत त्यांना ओरडून सांगावसं वाटलं की अरे बाबांनो, आय़ुष्यांत एकदा का होईना पण तुम्ही ईथं या, आणि " तुझे आहे तुजपाशी" हे एकदा तरी अनुभवा. तुमची आयुष्याकडं पाहाण्याची द्रुष्टीच बदलून जाईल.


अरे बाबांनो, आयुष्य जगून घ्या! अन्यथा ती एक घोडचूक ठरेल, आयुष्यांत तुम्ही काय करतां ह्याला महत्व नाही, ईश्वरानं दिलेलं हे आयुष्य आनंदानं जगा आणि एवढाच विचार करा की हे नसत तर, तुम्हाला तक्रार करायला तरी मिळाली असती का?

बसच्या प्रवासांत  कितीतरी नविन नविन अशा गोष्टी दिसत होत्या. तिकडच्या गावांची रचना, कौलारू घरं! अजून एक अतिशय निराळी आणि अगदी लक्षांत येण्यासारखी गोष्ट म्हणजे, घरांना जी कौलं वापरतात ती त्या घराच्या कूंपणाला विशेषत: जिथून घरांत शिरतो त्या मूख्य दरवाजाला पण लावतात. एखाद्या आई-वडीलांचं मूल जसं त्यांच्या सारखा चेहरा-मोहरा असणारं असलं, की हे मूल ह्यांचच आहे असा भास होतो, तसं त्या दारातून शिरतांना वाटेल असं काहीसं मला उगीचच वाटलं. अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि ती म्हणजे फक्त एका San Jose ह्या शहराचा अपवाद वगळतां (आणि तोही फक्त एकाच ठिकाणी) अन्यत्र कूठेही भिंतीवर, कूंपणावर अथवा कोणत्याही जागेवर रेघोट्या (Graffiti) मारलेल्या आढळल्या नाहीत. अशा रे्घोट्या मारणं हे सुसंस्क्रुत समाजाचं लक्षण तर नाहीच नाही परंतू समाज किती विकृत अवस्थेला पोहोचतो आहे ह्याचचं जणू निदर्शक असतं. अमेरिका काय, अथवा भारत काय अशा विकृतावस्थेच्या अनेक पूराव्यांचा साक्षीदार आहे. अशा या काहीश्या विदारक अवस्थेच्या पार्श्वभूमीवर या लहानग्या देशांत हा रोग अद्द्याप पोहोचला नाही हे पाहून तर ह्या देशांतील मंडळींविषयी माझ्या मनांत एक प्रकारचा आदरच निर्माण झाला. त्यांची ही धट्टीकट्टी गरीबी म्हणूनच जरा ज्यास्तच भावली.
 

विविध प्रकारची अनेक फूले या देशांत उगवतात. पण कां कोण जाणे मला आपली गुलाबाची फूले अजिबात दिसली  नाहीत. मात्र अतिशय निर्जन अशा या भागांत, कूणीही मूद्दामून न प्रयत्न न करता ईतकी सूंदर फूले निर्माण करणारा ईश्वर ईथे नक्कीच वावरतो आहे असा भास मला झाला.
कधी कधी असं  वाटतं की आपण आपल्या बागेंत खूप मेहनत करतो, प्रयत्न करतो, खत-पाणी घालतो, बाहेरच्या तपमानाप्रमाणे बागेला पाणी देणे देखील कमी जास्त करतो आणि तरीही फूलं एव्हढी


चांगली येत नाहीत, आणि ईथे मात्र कुणी मुद्दाम पाणी न घालतां, ऊष्ण तपमानांतदेखील ईतकी सूंदर फूले कशी निर्माण होतात? ईश्वर हा सारीकडे भरलेला आहे ह्याचीच ती ग्वाही होती असं मला वाटलं. प्रवासांत अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि ती म्हणजे आपण अगदी सहजा सहजी
Grocery Market मधून आणत असलेली केळी ही किती प्रयत्नानंतर आपल्याला खायला मिळतात. सुप्रसिद्ध Brand name Del Monte, Dole, अथवा Chiquita ही सारी केळी Costa Rica तून आपल्याला मिळतात. परंतू ती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कितीतरी कामगारांना खूप कष्टांतून जावे लागते ह्याची स्पष्ट जाणिव तेथल्या Banana Plantation ला भेट देवून मिळाली. तीच गोष्ट अननसाची. ह्या दोन्ही फळांसाठी आता चार पैसे ज्यास्त मोजावे लागले तरी फारसे वाईट वाटणार नाही कारण ही फळे आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी किती कष्ट झेलले गेले आहेत त्याची पूर्ण कल्पना आता आली आहे. 

बस बद्लून एका  लहानश्या बोटीने आम्ही Tortuguero National Park मध्ये पोहोचलो. अवघ्या ५०० लोकांच्या वस्तीचे ते गांव! त्यामूळे फारश्या अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या. मात्र तिथेही आमच्या कल्पनेबाहेर सारी व्यवस्था होती. एक Cell phone आणि Television ही उपकरणे सोडली तर तेथली व्यवस्था ५ स्टार होटेललाही लाजवेल अशीच होती. पदोपदी जाणवलेली गोष्ट म्हणजे सर्वांचे हंसरे चेहरे. तेथल्या जंगलांत सर्व साधारण माणसाला न दिसणारे पक्षी, आणि जनावरंही निसर्गाच्या  अधिपत्याची आठवण करून देणारी तर होतीच, परंतू मानवाला निसर्गाचं पूर्ण स्वरूप अजूनही नीटसं कळलं नाही ह्याचीही निदर्शक होती.  


त्या लहानश्या खेड्यांत आम्ही चक्कर टाकली. केवळ निसर्गानं दिलेल्या गोष्टींवरच उदर निर्वाह  करणारी ती खेड्यांतली मंडळी, आमच्यासारख्या केव्हातरी येणा-या प्रवाशांसाठी तेथल्या काही गोष्टींची विक्री करून थोडेफार चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात. तेथे एक लहान शाळा देखील होती. शाळेतल्या मूलांकडे पाहून कां कोण जाणे पण भविष्यातली ही देशाला तारणारी पीढी आहे असे मला उगीचच वाटते.  


आम्ही तेथे गेलो तेव्हां नुकतीच शाळा सुटली  होती. त्या लहानश्या शाळेत  साधारणत: ३०-३५ मूले असावीत. त्यांतल्या दोन मूलींनी  मात्र माझे लक्ष वेधून  घेतले. साधारणपणे १२-१३ वर्षांच्या त्या असाव्यात. गळ्यांत जडसे दप्तर अडकविलेले, दोन वेण्या पाठीवर सोडलेल्या, काळ्या सावळ्याच पण तजेलदार चेहरे असलेल्या, आपल्या भाषेंत म्हणजे Spanish मध्ये एकमेकींची टिंगल करीत, हातांत हात घालून रस्त्यांतून हंसत बागडत चालल्या होत्या. मला त्यांची भाषा जरी फारशी कळत नव्हती तरी शाळकरू मूलींचा अल्लडपणा त्यांच्या वागण्यांतून स्पष्टपणे जाणवत होता. त्या मध्येच थांबल्या आणि त्या काहीतरी विचार विनिमय करीत होत्या हे दिसत होते पण भाषेच्या अडचणीमूळे कळायला मार्ग नव्हता. मी त्यांच्या मागोमागच चालत होतो त्यामूळे त्यांची हालचाल मला स्पष्टपणे दिसत होती.


जसा जसा मी त्यांच्या जवळ पोहोचलो तसा तसा मला त्या आपल्याकडे म्हणतात तसा पाढे - परवचा म्हणत म्हणत चालल्या होत्या हे अगदी नक्की कळलं. मला जरी Spanish भाषा येत नव्हती तरी थोडे जुजबी कळत होते. त्या देशाच्या एका अतिशय लहान गांवांत, आपल्या भविष्याकडे वाटचाल करणा-या त्या दोन मूली शाळेतून परतीची वाट चालत असतांना त्या वेळेचा किती सदुपयोग करीत होत्या! बाहेरच्या जगांत आता ह्या क्षणाला कितीतरी घटना घडत असतील! कूठल्या तरी देशाचा प्रेसिडेंट दूस-या देशांत गेलेला असेल, एखादा देश दूस-या देशावर हल्ला करीत असेल, तर कूठेशी Bomb चा स्फ़ोट होत असेल. आणि ह्या लहान देशांतल्या एका अगदी लहान अशा खेड्यांतया दोन इवल्याश्या चिमण्या शिक्षणासारख्या पवित्र कार्याची धूरा सहजपणे उचलत होत्या. कूणी सांगावं त्या पूढे या देशाची धूरा वाहाणा-या नेत्यांची जागा भू्षवितील, अथवा या देशाच्या पंतप्रधान देखील होतील. एखाद्या धर्मक्षेत्री, कुणा ब्राह्मणानं यज्ञ मांडावा आणि त्यामूळे एका प्रकारचं पवित्र, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं आणि भाविक माणसाच मन जसं एक प्रकारच्या अनामिक शांतिनं भरून जातं, तस काहीसं मला वाटलं. शिक्षणासारख्या ह्या पवित्र कार्याची ह्या मूलींना ईतक्या लहान वयांत किती जाणिवपूर्वक कल्पना आहे आणि ह्या निर्जन अशा ठिकाणी एखादा मूनि जसा साध्य मिळविण्यासाठी तपाला बसला आहे तशाच भावनेनं ही उपासना चालली आहे असं वाटलं.

  
तिथं एक प्रकारची पवित्रता नांदते आहे असं  काहीसं वाटलं. मुख्यत: शहरांतल्या वातावरणांत आयुष्यभर राहिलेल्या आणि सर्व सुविधांनी, ऐषाआरामाच्या आयुधांनी, रोजचा दिनक्रम घालविणा-याला एखादी गोष्ट जरी कमी पडली तरी आकाश पाताळ एक करणा-या, निदान त्याची तक्रार करणा-या अशा व्यक्तिला, ही खेड्यांत काहीही सुविधा उपलब्द्ध नसण्याची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. आणि तरीही त्या परिस्थितीत ही मूले मात्र आनंदानं बागडत आहेत, त्या निर्जन रस्त्यावरून जातांना शिक्षणाचा महायज्ञ मांडताहेत, माहित नसलेल्या भविष्याचं मोठ्या प्रेमानं  स्वागत करताहेत, हे सारं द्रुष्यच मोठं अकलनिय होतं आणि तरीही ते सारं कूठेतरी मनाला पटत होतं, कळत होतं, भावत होतं. त्या सर्व द्रुष्यांच्या मागे कुठेतरी द्यानाची कांस होती, नविन जाणून घेण्याची जिज्ञासा होती, आणि त्या सा-य़ातून त्या लहान मूलींच पावूल त्यांच्या प्रखर आणि तेजोमय भविष्याकडे आपोआप पडत होतं.


ते सारं द्रुष्य पाहून मला Charles Kingsley (1819-1875) अमेरिकन लेखकाचं एक वाक्य आठवलं: "We act as though comfort and luxury were the chief requirements of life, when all we need to make us really happy is something to be enthusiastic about ".  त्या खेड्याचा निरोप घेतला तेव्हां त्या दोन लहान मूलींचं मनोमन अभिनंदन करायला मी विसरलो नाही. खरं म्हणजे प्रत्यक्ष भेटूनच करायला हवं होतं, त्यांना शाळेसाठी पेपर, पेन्सिली घेवून द्यायला हव्या होत्या, परंतू भाषेची अडचण आणि शहरांत राहिल्यामूळे बोथट झालेल्या मनाचा हूंकार आडवा आला. "आपण पडलो परके, परदेशी लोक. रस्त्यातून चालणा-या या अनोळखी मूलींशी बोललो तर चालेल का? त्यांचा काही गैरसमज तर होणार नाही ना?" अशा व्यवहाराच्या मर्यादाच सांभाळत बसला. आज जवळ जवळ दोन महिने झाले तरी


जगाच्या कूठल्याश्या कोप-यांत असलेल्या एका खूप लहान अशा देशांतील त्या लहान शाळेसाठी ऐपत असूनही आपण काही करू शकलो नाही ही रुखरुख आजही मनाला अस्वस्थ करते आहे. एखादी वेळ निघून गेली की त्या क्षणाचे मह्त्व नंतर कळते ते असे.  


त्या रात्री आम्ही पचिरा Lodge मध्ये शेवटची रात्र राहाणार होतो. अतिशय निसर्ग रम्य अशा त्या ठिकाणी त्याच्या संचालकांनी ईतकी सूंदर व्यवस्था ठेवली होती की कूठे बोट ठेवायला जागाच नव्हती. ते ठिकाण शहरी वातावरणापासून खूपच लांब असल्याने तेथे दूरध्वनी आणि दूर दर्शन अशा सोयी अजिबात उपलब्ध नव्हत्या. एका द्रुष्टीने ते चांगलेच होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडे दिवस कां होईना अलिप्त राहाण्याची ही सुवर्ण संधी होती. त्यामूळे खातांना/पितांना दूरर्शनाच्या समोर बसून होणारे रोजचे व्यवहार आपोआपच थांबले होतेआणि दूरध्वनी वाजल्यानंतर  हातांतले काम सोडून त्यावर ‘आत्ताच्या आत्ता बोललो नाही तर जग बूडेल की काय’ अशा विचाराने धांवत धांवत जावून त्यावर बोलण्याचा प्रश्नच उठत नव्हता. त्यामूळे एक सक्तीचा असा break मिळाला होता. मात्र जी मंडळी आपली महत्वाची कामे सोडून ह्या vacation वर आलेली होती, त्यांचा जीव, ह्या सुविधा नसल्याने रोज खालीवर होत असतांना पाहून मन अनेक विचारांनी भरून गेले होते. एक तर त्या बिचा-य़ांना त्या सूटीचा नि:ख्ख:ळ आनंद उपभोगता येत नव्हता. केव्हा एकदां शहरांत जातो आणि ह्या उपकरणांचा उपयोग करून थंडावलेला धंदा सुरू करतो असं त्यांना झालं होतं. काहींना आपल्या नातेवाईकांना फोन करायचा होता तर काहींना आपल्या नातवंडांशी बोबडं बोबडं कां होईना पण बोलायचं होतं. थोडक्यांत प्रत्येकजण चाकोरीतलं आयुष्य जगण्याचा निकरानं प्रयत्न करीत होता. Vacation घेण्याचा मूख्य  उद्देश, अशा चाकोरीतून बाहेर पडण्याची संधी मिळविणे हा असला तरी त्याच्याअगदी उलट, त्या चाकोरीचेच आपण किती गुलाम झालेलो आहोत ह्याचेच ते निदर्शक होते.

त्या Lodge मध्ये जवळ जवळ आपल्या घरी असतात तशा सर्व सुखसोयी होत्या फक्त त्या वापरण्याचे नियम नेहमीपेक्षा निराळे होते. उदाहरणार्थ: बाथरूममध्ये tissue paper ठेवले होते आणि ते वापरायलादेखील परवानगी होती, मात्र तेथली sewer system फारशी प्रगत नसल्याने ते कमोडमध्ये टाकायला परवानगी नव्हती. ईत्यादी ईत्यादी. जेवण्याची सोय उत्तम होती. मुख्य म्हणजे त्या रानावनांतल्या उगवलेल्या फळांनी रोजचे जेवण त्रुप्त करीत होते. ईतकी गोड फळे क्वचितच खायला मिळतात. या व्यतिरिक्त एक अतिशय उल्लेखनिय बाब म्हणजे येथे देखील सर्व कर्मचारी सदोदित हंसतमुख असायचे. मला  वाटतं की खूप काम करण्याची आवश्यकता, त्यामूळे निर्माण झालेली कामसू व्रुत्ती आणि आयुष्याकडून फारशा अपेक्षा न ठेवण्याची मनोव्रुत्ती ह्यामूळे आला दिवस सुखाचा ही भावना अधिकच जोपासली गेली असावी.


आपण बरे की आपले काम बरे’ अशा रोजच्या जीवनपध्द्तीमूळे, त्यांचा आयुष्याकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन एका निराळ्याच धाग्याने बांधला गेला आहे असं मला वाटलं. सकारात्मक आयुष्य असायला अथवा जगायला फारशी किंमत द्यावी लागत नाही, फक्त आपल्या विचारसरणीमध्ये ते ‘असावे’ लागते ही साधी गोष्ट, जी अनेक मंडळींना किंबहूना विचावंतांनाही आयुष्यांत जमत नाही ती, सहजा सहजी न जमणारी गोष्ट, ही सारी माणसं रोजच्या व्यवहारांत जगताहेत हे स्पष्टपणे दिसत होतं. त्यामूळे "धट्टी-कट्टी गरीबी बरी" असं माझे आई-वडील नेहमी सांगायचे त्याचा अर्थ आयुष्यात फारसा कळला नव्हता तो अचानक ईथे वयाच्या सत्तराव्या वर्षी कळला. स्वानूभवासारखा गुरू नाही हेच खरे.!
 
ह्याच ठिकाणी त्या Lodge ची जी मालकिण होती, तिची एक ३-४ वर्षांची अतिशय गोड मुलगी सगळ्या लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. रोज नविन नविन पाहूणे बघायची संवय झाली असल्याने म्हणा अथवा जात्याच ती धीट होती म्हणूनही असेल, पण सगळ्या ठिकाणी ती घीटपणे तुरू तुरू चालत असायची, ’फोटो घेवू कां?’ असे विचारले तर चक्क लाजत होती, जेवणाच्या ठिकाणी सर्व नोकर मंडळींच्या बरोबर धांवपळ करीत होती. तिला पाहून आम्हाला आमच्या नातींची सारखी आठवण येत होती. तिच्याशी थोडेबहूत बोलून आम्ही दूधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्नही करीत होतो. आम्ही त्या ठिकाणाहून निघालो तेव्हां, सर्व प्रवाशी मंडळींना बाय बाय म्हणायला देखील ती किना-यापर्यंत आली होती. त्या Lodge ची मालकिण  
आपल्या मुलीला अगदी लहानपणापासूनच Public Relations चे उत्तम धडे देत होती असे म्हटलं तर ते अना्ठायी ठरू नये. पूढे Los Angeles ला परत आल्यावर तिच्या आईच्या विनंतीवरून मी त्या मुलीचे घेतलेले फोटो तिला आठवणीने पाठविले आणि तिचे मोडक्या तोडक्या English भाषेतले उत्तर देखील आले तेव्हां त्या छोटीची परत एकदा आठवण आली. त्या रम्य अशा  ठिकाणाहून आमची बोट पूढील  प्रवासासाठी निघाली. तेथून  जवळ जवळ दोन तासांच्या  प्रवासानंतर आमच्या बसचा Driver जिथं थांबला होता तिथे आम्ही पोहोचलो आणि आमचा रस्त्यावरचा प्रवास Fortuna नांवाच्या गांवाकडे सुरू झाला.

ऊसाच्या, केळीच्या, आणि अननसाच्या लांबच लांब बागा रस्त्याच्या दूतर्फा, अनेक मैल पसरलेल्या होत्या. त्याचा आंनंद घेत घेत  आम्ही Fortuna ह्या गांवी पोहोचलो तेव्हां बरीच संध्याकाळ झाली होती. आमच्या बस मध्ये एकंदर ४३ प्रवासी होते, ज्या Hotel मध्ये आम्ही उतरलो होतो ते खूपच छान होते, बहूधा पंचतारांकितच असावे. बसमधून आम्ही खाली उतरतो न उतरतो तोंच आमच्या हातांत Welcome Drink देण्यासाठी सुहास्य वदनाने तेथल्या मुली हजरच होत्या. Miss Universe pageant मध्ये जसे Miss most photogenic अथवा त्या धर्तीचे अथवा ईतर अनेक प्रकारची बक्षिसें असतात, तसे Best Smile Award इथल्या मुलींना अशा Pageant मध्ये द्यायला परिक्षक अजिबात कुचराई करणार नाहीत अशी मला खात्री वाटते.

 
केवळ पाहूण्यांसाठी  ओढून ताणून आणलेले हास्य वेगळे  आणि मनाच्या प्रत्येक कोप-यांतून खट्याळ ओढ्यासारखे खळखळून येणारे हास्य वेगळे! आणि एव्हढा फरक सर्व सामान्य व्यक्तिला देखील जाणवेल असे ते होते. खूप खूप आनंदाची बातमी मिळाल्यानंतरही आंबट चेहरा करून ती ऐकणारी अथवा सांगणारी मंडळी कूठे आणि अत्यंत गरीबीत राहाणारी, आज खायला आहे पण उद्या ते मिळेलच ह्याची खात्री नसणारी ही मंडळी कूठे? मला वाटतं की ज्याची बाकी नेहमी शून्यच येणार आहे अशा त्यांच्या आयुष्याचं गणित त्यांना बरोबर कळलं आहे, की हास्याचं रहस्यच त्यांना कळलं आहे की हास्य हे चक्रवाढ व्याजासारखं असतं.! मुद्दलाचं मूळचं हास्य हे स्वत:च्या मनांत जसच्या तसं राहातं आणि रोजच्या नेहमीच्या हास्यानं त्याची दाम दुपटीने वाढ होत असते.  


त्या Welcome drinks चा आस्वाद घेतो न घेतो तोंच आमच्या खोल्या तयार असल्याची बातमी आमच्या गाईडने आणली आणि किल्ल्या आमच्या ताब्यांत दिल्या. खोलीवर जातो न जातो तोंच आमचे सामान पण खोलीपर्यंत आणून दिले गेले. त्यांच्या ह्या Efficiency वर एखादा लेख स्वतंत्र रित्या लिहिता येइल एवढी ती चांगली होती. 


हे ठिकाण अतिशय  निसर्गरम्य असे आहे. संपूर्ण  गांव Arenal Volcano ह्या भव्य अशा मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्या पर्वतांतून लाव्हांचा लोट जवळ जवळ ७५ वर्षांपूर्वी आला होता. तो अजून लवकरच परत येणार आहे असा तद्द्न्य मंडळींचा कयास असूनही ह्या गावांतील मंडळी त्याची फारशी दखल घेत आहेत असे वाटले नाही. किंबहूना दूस-या दिवशी सकाळी त्या Volcano मधून धूर येतांना दिसला आणि हा पर्वत आता "जागा" होतो आहे की काय असा संभ्रमही निर्माण झाला. असे असूनही "रोज मरे त्याला कोण रडे" ह्या न्यायाने ईथली सारी मंडळी त्याची फारशी दखल घेत होती असे मला तरी निदान वाटले नाही. संकटाच्या तोंडाजवळ ईतक्या जवळ राहूनही त्यांच्या दिनक्रमामध्ये काही बदल झालेला दिसला नाही. "एका अवाढव्य राक्षसाच्या मूखांत एक राजपूत्र मोठ्या घिटाईने प्रवेश करतो आणि राजकुमारीला सोडवितो" अशा अर्थाची एक, माझ्या लहानपणी ऐकलेली गोष्ट मला आठवली. लहानपणीच्या माझ्या बूद्धीला त्या कथेचे त्यावेळी जेवढे अप्रूप वाटले, जवळ जवळ तेव्हढेच अप्रूप मला त्या दिवशी वयाच्या ६९-७० व्या वर्षीही हे सारे पाहून वाटले. खूप खूप संकटांची आयुष्याला अशी संवय झाली की त्यांतला भित्रेपणा हळू हळू निघून जात असावा. अन्यथा त्यादिवशी त्या पर्वतांतून येणा-य़ा त्या धूरामूळे त्यांना नक्कीच भिती वाटायला हवी होती.
 
परंतू कधी कधी असं वाटतं की ह्या संकटांची देखील कमालच आहे.! पावसाच्या सरीप्रमाणे एकामागून एक संकटांची सर आली की माणूस स्व-संरक्षणासाठी आधार शोधीत असतो. आणि ईथे तर संकटांचा आधार घेत घेतच तो प्रवास करीत असतो, त्यामूळे त्या संकटांची त्यांना सवयच झाली असावी. आणि त्यामुळे एक प्रकारचा कणखरपणाच त्यांच्यांत आला आहे असं मला वाटतं. म्हणून ह्या संकटांविषयी ते कृतज्ञताच व्यक्त करीत असावे असं मला उगीच वाटून गेलं 

ज्या होटेल  मध्ये आम्ही उतरलो होतो ते ईतक्या अप्रतिम जागेवर वसले होते की तेथे काम करणा-या मंडळींचा खरं तर मला हेवाच  वाटला. होटेलच्या परिसरांतून कूठेही उभं राहिलं तरी, त्या ज्वालामूखीचा अतिशय मोहक असा भाग स्पष्ट दिसत होता. त्याच्या अगदी जवळ म्हणजे केवळ जेमतेम अर्धा मैल अंतरावर घरांची वस्ती होती. केवळ पन्नासच वर्षांपूर्वी एवढ्या जवळ असलेल्या ह्याच घरांमधून ह्या ज्वालामूखीने मोठ्या माणसांपासून ते अगदी लहान अर्भकांपर्यंतचे बळी घेतलेले असतांनाही एवढ्या जवळ वस्तीला राहाणा-या मनुष्यस्वभावाचे कौतुक करावे की ह्या निसर्गाच्या संकटाला समोरासमोर आव्हान देवून "तुला काय करायचे ते कर, मी येथून हलणार नाही" असं पाय रोवून राहाणा-या आणि बजावणा-या मानवाचं अभिनंदन करावं ह्या संभ्रमांतच मी अजूनही आहे. ईतक्या सूंदर दिसणा-या त्या पर्वताच्या अंतरंगांत सतत फोफावत असलेली आग धुमसत आहे हे खरं म्हणजे सांगूनही न पटणारे सत्य आहे.  


आणि त्या मानाने ५ फ़ूट ऊंचीचा त्या विराट  ज्वालामूखीला शह द्यायला  निघालेला साधा मानव,आणि त्याची जगण्यांतली बेदरकार व्रुत्ती ही एक विजोड तुलना आहे हे माहित असूनही निसर्ग आणि मानव ह्यांच्या नात्याचं एक निराळच न समजणारं स्वरूप आहे असं मला मनोमन जाणवलं. त्या ज्वालामूखीच निरोप घेतांना मी त्याला नमस्कार केला जसा आपण देवाला करतो तसा! आमच्या टूर मध्ये असलेली एक अमेरिकन मूलगी मला म्हणाली देखील: "Shashi, what are you praying for?" तिला काय उत्तर द्यावे तेच मला कळेना. मी फ्क्त एव्हढेच म्हणालो: "I am appreciating the grand scale of nature here and praying for safety of our brothers and sisters here." त्यावर तिने केलेल्या स्मितहास्यमध्ये "मला कळलं तुला काय म्हणायचं आहे ते" असाच भाव होता असं मला वाटलं.  


त्या निसर्ग रम्य स्थळाचा निरोप घेवून  आम्ही Costa Rica मधील सुप्रसिद्ध Hanging Bridges पहायला निघालो. आधी मला असं वाटलं होतं की आपण कसले जातो आहोत हे अर्धवट आणि हलणारे पूल पहायला?  साध्या जमिनीवर  चालतांना आपली घाबरगूंडी  ऊडते तर ह्या हलणा-या पूलावर आपण चालणार तरी कसे? आणि चालतांना सारखा धरणीकंप होतो आहे असच वाटेल, पायाखालची भूमीच हलते आहे तर आपण आयुष्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? अशा मनाच्या अवस्थेंत आम्ही तेथे पोहोचलो. अगदी शेवटच्या क्षणी मात्र विचार बदलला आणि त्या हलणा-य़ा पूलांवर जायचच असा निर्णय घेतला. एकतर आयुष्यांत ईथे परत येणं शक्य होईल असं वाटत नव्हतं. दूसरं म्हणजे स्वाभिमान आडवा आला.(खरं म्हणजे मदतीला आला असच म्हटलं पाहिजे) लहान लहान मूलं देखील त्यावरून बागडत बागडत चालतांना दिसली. मी मनांत विचार केला की आतां वयाच्या ६८-६९ व्या वर्षी घाबरून कसं चालेल? काय जे व्हायचं असेल ते होवू दे. आणि एकदां मनांत आलेला विचार हा पाटीवर खडूनं लिहिलेल्या शब्दांसारखा पूसून टाकतां येत नाही.


जगांत प्रत्येक वेळा झालेली क्रांति ही माणसाच्या मनांत आलेल्या अशाच विचारांपासून झालेली आहे नाही का? म्हटलं, आतापर्यंतच आयुष्य देवानं ठीक दिलं आहे तेव्हां आता ईथं जरी ते संपलं तरी काहीही हरकत नाही. आणि त्या हलणा-या पूलावर पाय ठेवला आणि काही क्षणांतच भिती गेली. आपल्याला वाटलं तेव्हढं हे फार कठिण नव्हतं ह्याची जाणीव झाली. आयुष्यांत पहिलं पावूल ऊचलण मोठं कठिण असतं नाही का? पण एकदा ते ऊचलण्याची हिंमत दाखवली की पूढचा रस्ता आपोआप दिसायला लागतो. आणि मग त्या ऊत्साहांत अजून दोन पूल ओलांडले. तिथून निसर्गाचं जे अत्यंत सूंदर रूप दिसलं ते मनांत साठवलं. निसर्गाच्या ईतक्या जवळ जावून त्याच्याशी अशी हात मिळवणी करण्याची संधी मी दवडली नाही म्हणून स्वत:चा स्वता:लाच खूप अभिमान वाटला.  


ही संधि मी सोडली  असती तर हे भाग्य माझ्या वाट्याला आलं असतं की नाही कूणास  ठावूक? मुख्य म्हणजे मन एक प्रकारच्या क्रुतद्न्यतेच्या भावनेनं भरून गेलं. ज्या प्रुथ्वीवर आपण राहातो, त्यावर ईश्वरानं काय काय निर्माण केलं आहे हे आपल्याला ऊभ्या जन्मांतही कळणार नाही कारण भू-गोलाच्या प्रत्येक कोप-यांत एका आयुष्यांत जाणं मानवाला शक्यच होणार नाही. आणि म्हणूनच अनेक लोकांकडून ऐकत असलेल्या ह्या सूंदर विश्वाच्या एव्हढ्या जवळ येवूनही हा भाग केवळ भितीपोटी पाहिला नाही असं व्हायला नको म्हणून घेतलेला निर्णय मला सुख देवून गेला यांत शंकाच नाही. आणि सुखाची भावना अशी सहजा सहजी हाती लागत नाही. ती एखाद्या फूलपांखरासारखी असते. ते पकडायचा मुद्दाम प्रयत्न केला की दूर ऊडून जातं आणि आरामांत स्वस्थपणे शांत बसलं तर ते स्वत:हून तुमच्याजवळ येतं आणि कधी कधी तर तुमच्या अंगा-खांद्यावर देखील बसतं.
 


विचारांच्या अशा  अनेक लहरी मनांत ऊठत होत्या. काही सह प्रवासी त्या निसर्गाच्या  दर्शनानं असेच भावनावश झालेले दिसले परंतू भाषेच्या फरकामूले त्याच वर्णन जरी एकमेकांना  करू शकले नाही तरी प्रत्येकाच्या  वागणुकीमध्ये त्याचे तंतोतंत  प्रतिबिंब पडले होते ह्यांत शंकाच नाही. ते सारं पाहून  मला असं वाटलं की एकमेकांशी  भांडणा-या जगातल्या सर्व देशांतल्या नेत्यांना असं जगाच्या  सूंदर प्रदेशाच्या सफरीला पाठवावं म्हणजे जगांतली  निदान अर्धी तरी भांडणं कमी होतील. 


समुद्राच्या किना-या---किना-या वरून आमची बस पूढील मुक्कामाकडे  घांवत होती. देवानं ह्या देशाला किती भव्य समुद्र किनारा दिला आहे? मात्र अगदी मोक्याच्या जागी देखील घरं अजून तरी ऊभारली गेली नव्हती. हाच किनारा जर अमेरिकेत असता तर, ईथं घरं बांधायला एक इंचभर तरी जागा ऊरू दिली असती की नाही कोण जाणे? अशा ह्या रम्य प्रदेशांत राहाणारी जी काही भाग्यवंत मंडळी आहेत त्यांचं मनोमन कौतुक करीतच आमचा प्रवास चालू होता. वाटेंत एका Super Market मध्ये आम्ही थांबलो. या देशांतली रम आणि काफी हे दोन पदार्थ खूपच लोकप्रिय आणि जग प्रसिद्ध असल्यामूळे ते आम्ही तेथेच घ्यायचे ठरवले.

मात्र प्रत्यक्षांत फक्त काफीच घेतली. नंतर रमची खरेदी आपण विमानतळावरूनच करू या का? ह्या सौ.वतीच्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणे हे क्रमप्राप्तच होते-कारण होकारार्थी उत्तरच मिळावे अशा पद्धतीनेच तो विचारला गेला होता- युनोमध्ये अथवा एखाद्या देशाची Ambasdor म्हणून तिला काम कां मिळू नये बरं? असो) त्या Super Market मध्येही आम्हाला आतापर्यंत आला तसाच अनूभव आला. आम्ही आंत मध्ये गेलो मात्र, आमच्या भोवती सदा हंसणा-या सतेज मुली हजरच होत्या. आमचं एव्हढं वैयक्तिक स्वागत पंचतारांकित  होटेलमध्येही कधी झालं नव्हतं. त्यांनी आम्हाला हव्या  त्या गोष्टी ज्या ठिकाणी होत्या तिथून आणून आमचा बराच त्रास  वांचवला.  



पूढचा मुक्काम Marriott Guanacaste ईथं होता. मला वाटतं आमच्या ह्या मुक्कामांतलं हे अतिशय सूंदर होटेल असावं. खोलीच्या बाहेर पडतांच समुद्राच्या वाळूवरच पाय पडावेत एव्हढं ते समूद्राच्या जवळ वसलेलं होतं. ज्या पद्धतीनं नोकरवर्ग पाहूण्यांची काळजी घेत होता त्यावरून ते निदान पंचतारांकित+ (म्हणजे शष्ठ-तारांकित की काय?) तरी असावं. जेवणाचे सभाग्रुह तर ईतके सजविलेलं होतं की जणू कुणाचं लग्न घरच आहे की काय असा भास व्हावा. आणि तिथेही असं स्वागत की काही विचारू नका. त्यांची भाषा जरी आम्हाला येत नव्हती तरी त्यांच्या दिलखूलास वागण्यामूळं आम्हाला अजिबात परक्यासारखं जाणवलं नाही.
 
ह्या वास्तुची एक निराळीच शान होती ह्यांत शंकाच नाही. हे होटेल जवळ  जवळ १०० एकर जागेवर वसले होते. त्यांच्या बागेत  जगांत असतील नसतील तेव्हढी  सारी फळ-फळावळ लावलेली  होती, अनेक प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या, ईतकेच नव्हे तर मसाल्याची झाडं देखील लावलेली होती. तिथं येणा-या प्रत्येक पाहूण्याला रोज बागेतली ताजी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात हा त्यांचा उद्देश्य! ईतकी गोड आणि मधूर फळे आयुष्यांत मी प्रथमच खाल्ली. ईतकेच नव्हे तर बसच्या ड्रायव्हरने बायकांच्या आग्रहाखातर तेथली आमराई दाखवली आणि मोठ्या मोठ्या कै-या तोडून प्रत्येकाला दोन दोन तीन तीन अशा काढून दिल्या. त्या जवळ जवळ प्रत्येकी दोन-तीन पौन्डाच्या तरी असाव्यात. तो खजिना आम्ही आमच्या खोलीत आणला खरा पण कस्टमच्या नजरेतून तो अमेरिकेत घरी कसा आणतां येईल ह्यावर आमची एक पूर्ण संध्याकाळ गेली आणि लहानपणी बाबुराव अर्नाळकरांच्या अथवा झुंझारच्या रहस्यकथा वाचण्याचा खूपच फायदा झाला असं प्रामाणिकपणे कबूल करतांना (अप्रामणिक मार्गानं) त्या आम्ही सही सलामत घरांपर्यंत आणू शकलो ह्यामूळे आमचं तोंड आंबट झालं की त्या कै-यांमूळ झालं हे आम्ही आतांपर्यंत गुलदस्तांतच ठेवलं आहे. आयुष्यांतली प्रत्येक शूर-गिरी (?) ही वर्णनाच्या लायकीची असतेच असं नाही हेही त्या निमित्ताने लक्षांत आलं हे ही नसे थोडके! 

परतीच्या प्रवासाच्या  शेवटच्या टप्प्याकडे आतां आमची बस भरधांव निघाली होती. आधीच्या हलणा-या पूलांवर चालून चालून दमछाक झालेले आणि थकलेले सह प्रवाशी थोडेसे शिथिल झालेले होते. त्यांना साथ देतां देतां माझेही डोळे हळू हळू मिटायला लागले होते आणि तरीही हा प्रवास लवकरच
संपणार ही भावना मनांत पिंगा घालीत होती. एखाद्या रंगलेल्या मैफिलीचे शेवटचे गीत आतां संपत आलेले आहे आणि आतां लवकरच भैरवीला सुरूवात होणार आहे हे जसं जाणवतं तसं! 

अशा भैरवीचे  स्वर बसमध्ये एकमेकांशी  बोलतांना लागायला सुरुवात  झाली होती. मला वाटतं की माणसाचं मन प्रत्यक्ष मैफिल  संपल्यानंतर जेव्हढं निराश  होतं त्यापेक्षा अधिक ते भैरवीच्या  सुरुवात व्हायच्या आधीच होतं. ही मैफिल कधीच संपू नये आणि त्यामूळे भैरवी  सुरू देखील होवू नये असं  आपल्या वेड्या मनाला नेहमी  वाटत असतं. ती होणारच आहे  हे माहित असून देखीलह्या जाणीवेमुळेच बहुधा बसमध्ये  थोडस गंभीर असं वातावरण  पसरलेलं होतं. एकमेकांचे  पत्ते लिहून घेणे, निरोपाच्या मिठ्या मारणे, एकमेकांना आपल्या घरी निमंत्रण देणे असे अनेक ऊद्द्योग सुरू झाले होते. त्यांत गेल्या दहा दिवसाचा देश पहाण्याची एक प्रकारची नशा होती.
 
जगाच्या कूठल्यातरी कोप-यांतून आलेल्या आणि  आयुष्यांत प्रथमच भेटलेल्या, केवळ दहा दिवसांचाच परिचय असला तरी जणू आपण सारे जन्मभर जवळचे मित्र आहोत ही भावना असणारा हा आता एकत्र राहाण्याचा शेवटचा दिवस आहे ह्याची दुखद जाणिव देणारा विचार सगळ्यांच्या मनांत येत होता. परिवर्तन हे जीवनाचे आवश्यक अंग असते हे त्याक्षणी सांगण्याचा हा प्रसंग नक्कीच नव्हता. कटू सत्य अथवा न पटणारी गोष्ट का होईना पण ते देखील माणसाला योग्य वेळ पाहूनच सांगायचे असते नाही का?  


त्या रात्री आम्हाला ज्या प्रवास कंपनीतर्फे आम्ही गेलो होतो ती आम्हाला  ह्या मुक्कामांतील शेवटचे जेवण देणार होती. ज्या ठिकाणी हे जेवण होते ते पंच तारांकित असल्यामूळे चांगल्यापैकी जामानिमा करून जायचे होते. बायकांना ही सुवर्ण-संधी होती आणि त्यांनी ती अजिबात दवडली नाही. उत्तम जेवणाबरोबर त्यांनी आमचे मनोरंजन करण्यासाठी एक Fasion show केला होता. त्यांच्या योजकतेचे ते एक उत्तम उदाहरण होते..Costa Rica हा देश निरनिराळ्या पक्षांनी भरलेला असल्यामूळे त्या Fasion show मध्ये त्या प्रकारचेच सारे कपडे होते. भारतांतून ईकडे परत येतांना जशी मित्र मंडळी अथवा आपले नातेवाईक आपल्याला पार्टी देतात तसे साधारण वातावरण होते. ती पार्टी आटोपली, सगळ्यांबरोबर group photo घेवून झाला. निरोप देवून झाले, घेवून झाले. केवळ दहा दिवसाच्या मैत्रीच्या धाग्याने बांधलेले हे कूणाचे कोण, पण आता परत भेट होणार नाही म्हणून जेव्हां एकमेकांना मिठ्या मारून रडू लागले तेव्हां माणसाच्या मनाची गुंतागुंत अशा रितीने घडविणा-या देवाचच दर्शन घेतो आहे की काय असा भास झाला. "हे विश्वचि माझे घर" असं सांगणा-या द्यानोबाचं परत एकदां नव्यानं अस्तित्व जाणवलं. आणि कां कोण जाणे पण अर्जूनाला महायुद्ध कां खेळायचं नव्हतं ह्या विचाराच्या जवळपास फिरकण्याची संधि मिळाली 

निरोपासारखी निराशेचा विचार करणारी अधिक कोणतीही  गोष्ट, एक मरण सोडले तर असूच शकत नाही. पण ही तुलना देखील ऊचित नाही. कारण मरण हे दुख्खदायक असले तरी अंतिम परिणांमाची पूर्ण कल्पना नक्कीच असते. निरोप त्या मानाने खूप क्लेषदायी असतो. आयुष्यांत निरोप देणारी व्यक्ती परत भेटेल की नाही ह्या संभ्रमांतच आपण एव्हढे झपाटलेलो असतो की, त्या संवेदनांत निरोपाचा क्षण देखील आपण पूर्णपणे अनूभवित नाही. पण हीच आयुष्याची रीत असावी.
 
Los Angeles जाणारं परतीचं विमान पकडतांना गेल्या दहा दिवसांचा हा मित्र मंडळींचा संग्रह मिळाला, ह्या समाधानांतच मी होतो. ह्या ट्रिपची खूप आठवण येते तेव्हां मी तिथे काढलेले फोटो पहातो, तिथे भेटलेल्या नविन मित्र मंडळींनी पाठविलेल्या इमैल्स वाचतो आणि पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. काळ हा फक्त पूढेच धांवत असतो हे माहित असल्यामुळे ते मंतरलेले दिवस पुन्हां परत येणे हे शक्य नाही ह्याची पूर्ण जाणीव मला आहे
त्यामूळे परत  अशी दूस-या देशाची सहल करणे एव्हढेच माझ्या हातांत आहे  त्यामूळे एक सफ़र पूर्ण  झाली की मी दूस-य़ा देशाच्या प्रवासाची पूर्व तयारी  करायला लागतो.



 
शशिकांत पानट
Los Angeles
shashi@panat.org
----------------------------------------------------------------------------------------------

एकटा

कुशल आहे आज मी
नाही कुणाची काळजी मज
मस्त माझ्या धुंदीत मी !!ध्रु!!

नाही कुणाचे बंध मजला, नाही स्वताचेही मला
कंठितो जो दिवस आला, सुख-दुख्ख ना त्याचे मला
तोल गेला माझा कधी जर, सांवरी माझाच मी!!!! ध्रु !!

प्रेम केले एकमार्गी, गवसले नाही कुणी
वाट सारी धुंडिली पण, भेटले नाही कुणी
आईन्यातून केले स्वतावर, प्रेम मग माझेच मी !!!!ध्रु!!

पडतो बिछान्यावर जधी, वाटतो मी एकटा
हात असूनी, पाय असूनी, शिथिल जणू मी थोटका
माझा, मला, मग मीच पुसतो, अस्तित्व माझे मन्मनी!!!!ध्रु!!

जगण्यास असते एक आशा, व्हावे कुणाचे कधीतरी
साधणे संवाद-भाषा, हीच ईच्छा अंतरी
एकपात्री खेळ माझा, तोही पाही, माझाच मी!!!!ध्रु!!

माझी नको चिंता कुणाला, धुंदीत माझ्या ग्रस्त मी
कुशल आहे आज मी, कुशल आहे आज मी


शशिकांत पानट, जून, २००९



" ह्या कवितांच्या Recording साठी शशिकांत पानट ह्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. shashi@panat.org ह्या ईमैल वर संपर्क साधावा"




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: